विद्यार्थ्यांनी घेतली सायबर सुरक्षिततेची शपथ; पी.आर. हायस्कूल व इंदिरा गांधी कन्या माध्यमिक विद्यालयात सायबर जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील सायबर वॉरियर्स *विद्या विशाल सोनवणे व साक्षी तानाजी पाटील* यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या जनजागृती अभियानांतर्गत पी.आर. हायस्कूल तसेच इंदिरा गांधी कन्या माध्यमिक विद्यालय येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्रांचे प्रभावी आयोजन केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल जगाचा सुरक्षित, जबाबदार आणि सजग वापर करण्याची जाणीव निर्माण करणे हा होता. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षा, बनावट वेबसाइट्स व लिंक, ओटीपी आणि पासवर्डची गोपनीयता, सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे उपाय, डिजिटल फूटप्रिंटचे महत्त्व तसेच सुरक्षित इंटरनेट वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. 
दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांच्या विविध प्रकारांची माहिती देत त्यावर प्रभावी उपाययोजनाही समजावून सांगण्यात आल्या. मोबाईलचा योग्य वापर, डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संवाद साधताना आवश्यक असलेली सतर्कता आणि सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करण्याचे धोके याविषयी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने प्रश्न विचारून चर्चेत सहभाग घेतला आणि सायबर सुरक्षेबाबत अधिक जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली. सत्राच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षिततेची शपथ घेत स्वतः सुरक्षित राहण्याबरोबरच आपल्या कुटुंबीय, मित्र आणि समाजालाही सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांनी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी आत्मविश्वास निर्माण झाला असून डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याची प्रेरणा मिळाली. 

आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. शाळा, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे सायबर सुरक्षेबाबत जनजागृती केल्यास सुरक्षित डिजिटल भारताचे स्वप्न अधिक बळकट होईल, असा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. हा उपक्रम आर. बी. आमले सर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. पी.आर. हायस्कूलचे प्राचार्य दिनेश पाटील सर तसेच इंदिरा गांधी कन्या माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य ए. ए. पाटील सर यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षित डिजिटल समाज घडविण्यासाठी अशा जनजागृती मोहिमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे सांगितले. दोन्ही शाळांतील शिक्षकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य केले. विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद, सक्रिय सहभाग आणि सायबर सुरक्षेबाबत दाखविलेली जागरूकता यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. समाजात सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता वाढविणे, सुरक्षित डिजिटल सवयी रुजविणे आणि जबाबदार डिजिटल नागरिक घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या