सायबर गुन्ह्यांविरोधात विद्यार्थ्यांची सज्जता; साकरेत जनजागृती अभियान


साकरे, दि. ३ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक करून त्यांच्यामध्ये सुरक्षित डिजिटल वर्तनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने बा. च. भाटिया माध्यमिक विद्यालय, साकरे येथे विशेष सायबर जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासोबत येणाऱ्या सायबर धोक्यांविषयी माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र सायबर जनजागृती अभियानांतर्गत कार्यरत सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे आणि सायबर वॉरियर साक्षी तानाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध सायबर गुन्ह्यांची माहिती दिली. सोशल मीडिया फसवणूक, ऑनलाइन आर्थिक गुन्हे, फिशिंग, डेटा चोरी, बनावट अॅप्स आणि सायबर स्कॅमचे प्रकार यावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांचे स्वरूप समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे हॅकरचा मुखवटा वापरून करण्यात आलेले प्रात्यक्षिक. या माध्यमातून सायबर गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीचे वास्तव विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यात आले. विविध शैक्षणिक खेळ आणि संवादात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विषय अधिक प्रभावीपणे समजला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत अनेक प्रश्न विचारले.

सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी सतर्कता आणि जागरूकता हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका अनिता पाटील यांचे सहकार्य लाभले. आर. बी. आमले सर यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या