बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचा भव्य मेळावा; प्रलंबित देणी तातडीने अदा करण्याची जोरदार मागणी


-----------------------------------------
डोंबिवली, दि. २७ जुलै : बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीच्या वतीने आज डोंबिवली येथील पौर्णिमा सभागृहात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास शेकडो बेस्ट सेवानिवृत्त कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लावली. उपस्थितांनी बेस्ट प्रशासन, महापालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर तसेच महाराष्ट्र शासन यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
      मेळाव्यात जुलै अखेरपर्यंत सर्व बेस्ट सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युटी व इतर प्रलंबित देणी एकरकमी अदा करण्याचे दिलेले आश्वासन बेस्ट प्रशासनाने पूर्ण केले नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. एकीकडे बेस्ट प्रशासन सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना, दुसरीकडे आपल्या हक्काच्या ग्रॅज्युटी व इतर सेवानिवृत्तीच्या लाभांसाठी बेस्टचे सेवानिवृत्त कामगार रस्त्यावर उतरून संघर्ष करत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. 
       मेळाव्यात सर्वानुमते ठराव मंजूर करून बेस्ट दिनाचे औचित्य साधून सर्व सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युटी व इतर सर्व प्रलंबित देणी तात्काळ एकरकमी अदा करावीत, अशी मागणी करण्यात आली. तसेच सेवानिवृत्त कामगारांना मोफत वैद्यकीय सुविधा, मोफत बस पास आणि त्यांच्या **मुलांना बेस्टच्या भरती प्रक्रियेत प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.
           यावेळी बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई पानवडीकर यांनी सांगितले की, बेस्ट प्रशासनाने तातडीने सर्व मागण्या मान्य करून प्रलंबित देणी एकरकमी अदा करावीत. अन्यथा सर्व बेस्ट सेवानिवृत्त कामगार आपल्या कुटुंबीयांसह मुंबईतील आझाद मैदानावर भव्य आक्रोश मोर्चा काढून बेस्ट भवनावर धडक देतील. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी बेस्ट प्रशासनाची असेल."
  बेस्ट सेवानिवृत्त कामगारांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करून त्यांना न्याय देण्याची मागणी यावेळी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. 

प्रतिनिधी रविंद्र जाधव डोंबिवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या