शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संत झेवियर महाविद्यालयात डॉ. केदारनाथ फाळके यांचे 'आज्ञापत्र आणि श्री शिवछत्रपतींची राजनीती' विषयावर व्याख्यान





संत झेवियर महाविद्यालय, मुंबई, येथे सोमवारी २१ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठा इतिहासाचे अभ्यासक व छत्रपती शिवाजी महाराजांवरील अनेक ग्रंथांचे लेखक डॉ. केदारनाथ फाळके यांनी - आज्ञापत्र आणि श्री शिवछत्रपतींची राजनीती या विषयावर व्याख्यान दिले. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने आयोजित केला होता. तिथीनुसार साजरा  करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमाला विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानाच्या माध्यमातून डॉ. फाळकेनी सर्व श्रोत्यांना आज्ञापत्राचे ऐतिहासिक महत्व व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यधोनारणाची ओळख करून दिली. या कार्यक्रमाचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शासनदृष्टी आणि विचार यांचे आजच्या सामाजिक वास्तवात असलेले चिरंतन महत्त्व अधोरेखित करून नव्या पिढीसमोर त्यांची समकालीन उपयुक्तता मांडणे हा होता.

डॉ. फाळके मराठा इतिहास या विषयात विद्यावाचस्पती असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. इतिहास विषयात त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत.


डॉ. केदारनाथ फाळके यांनी 'आज्ञापत्रा'चा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांची न्याय्य शासनव्यवस्था, कार्यक्षम प्रशासन, लष्करी रणनीती, नौदलाची ताकद, कृषी व महसूल क्षेत्रातील सुधारणा आणि लोककल्याणाप्रती असलेली अटळ निष्ठा यांविषयीची दूरदृष्टी स्पष्ट केली. विश्वसनीय ऐतिहासिक दस्तऐवज आणि राजदरबारातील पत्रव्यवहाराचा आधार घेत त्यांनी शिवाजी महाराजांच्या तत्त्वांचे आजही असलेले महत्त्व अधोरेखित केले; त्यांनी नमूद केले की, "शिवाजी महाराजांचे आदर्श केवळ इतिहासापुरते मर्यादित नाहीत, तर आजही ते शासन, नेतृत्व आणि समाज यांच्यासाठी मार्गदर्शक ठरत आहेत."


संत झेवियर महाविद्यालयाचे मराठी वाङ्मय मंडळ अशा अनेक उपक्रमांमधून मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा समृद्ध वारसा पुढे नेत आहे व विद्यार्थ्यांना आपले कलागुण आणि विचार सादर करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या