जाह्नवीज मल्टी फाउंडेशन संचलित जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूल येथे मुख्य विद्यार्थी (Head Boy) व मुख्य विद्यार्थिनी (Head Girl) पदासाठी प्रथमच डिजिटल विद्यार्थी निवडणुकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
शालेय स्तरावरील ही अभिनव डिजिटल निवडणूक संकल्पना श्री. अभिषेक देसाई सर व श्री. संकेत कुपाटे सर यांनी विकसित करून प्रत्यक्षात साकारली. या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे सर, सचिव डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे मॅडम तसेच मुख्याध्यापिका सौ. ज्योती वेंकटरामन मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल मतदान बूथ उभारण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी डिजिटल पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावला. तर इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मतपेटी (Ballot Box) आणि मतपत्रिकांद्वारे मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती.
या निवडणुकीत १५ हून अधिक विद्यार्थी उमेदवारांनी विविध पदांसाठी आपले नशीब आजमावले. वास्तविक निवडणुकीचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी मतदान केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या बोटावर अमिट शाईची खूण करण्यात आली.
लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि सुजाण नागरिकत्वाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मनापासून स्वागत केले. शालेय स्तरावर डिजिटल मतदानाची यशस्वी अंमलबजावणी करून जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूलने नाविन्यपूर्ण शिक्षणाचा आणखी एक आदर्श निर्माण केला.

0 टिप्पण्या