*मुंबईच्या वाटेवर निघालेला चाकरमानी आणि नरवडे एसटी स्टॅन्ड वरील भाव विश्व*
*गाव, माणसं आणि नात्यांचा अविस्मरणीय निरोप संघर्षाच्या प्रवासाला भावनांची साथ*
लोकसत्यवाणी न्यूज/विशेष वृत्त सातारा प्रतिनिधी: बापुना आत्राम
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सिंधुदुर्ग तालुका कणकवली नरवडे गावाच्या जीवन पद्धतीवर एक दृश्य असे आहे की, ते कितीही वेळा पाहिले तरी मनाला स्पर्श करून जाते. गावातील एखादा चाकरमानी रोजगार, व्यवसाय किंवा
उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे ठाणे अथवा इतर महानगरांत कडे निघाला की, त्याला निरोप देण्यासाठी संपूर्ण कुटुंब एसटी स्थानकावर जमा होते. हा केवळ प्रवासांचा क्षण नसतो, तर तो त्यांचा जिव्हाळ्याचा, विश्वासाचा आणि जबाबदारीच्या जाणिवेचा एक भावनिक सोहळा असतो.
गावातील घरातून निघताना
आईच्या हाताचे शेवटचे धास,
वडिलांचा धीर देणारा सल्ला,
भावंडाचे प्रेम आणि शेजाऱ्यांच्या शुभेच्छा यांची शिदोरी घेऊन चाकरमानी एसटी स्टँड कडे येतो, त्यांच्या एक बॅग असते, पण त्या बॅगेपेक्षा जास्त ओझे त्यांच्या मनात असते. घरापासून दूर राहण्याचे दुःख आणि कुटुंबासाठी काहीतरी करण्याची जिद्द यांचा संघर्ष त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतो.
एसटी स्थानकावरून पोचवल्यानंतर वातावरण आणखी हळवे होते. आई वारंवार विचारते,"जेवण वेळेवर कर","स्वतःची काळजी घे", तर वडील मोजक्या शब्दांत जीवनाचे धडे देत असतात.
लहान भाऊ किंवा बहिण मोठ्या भावाकडे आशेने पाहत असतात. काही वेळा कुणी रडत नाही, मग सर्वाच्या डोळ्यांत न बोललेले शब्द
आणि मनातील काळजी स्पष्ट दिसून येते.
एसटीची लाल परी स्थानकात येते आणि काही क्षणांत
निघण्याची सूचना होते. तेव्हा निरोपाचा तो क्षण अधिकच
गंभीर होतो. कुणी हात मिळवतो, कुणी मिठी मारतो,
तर कोणी फक्त हसून निरोप
देण्याचा प्रयत्न करतो. परंतु
त्या हास्यामागे असंख्य भावना दळलेल्या असतात. हा क्षण
अश्रुंनी भरलेला असतोच असे नाही, परंतु तो मनाच्या अतिशय जवळचा आणि संवेदनशील असतो.
चाकरमानी बसमध्ये बसल्यानंतर खिडकीतून बाहेर पाहत असंख्ये बाहेर उभी असलेले आई वडील, भावंडे, नातेवाईक आणि शेजारी हात हलवून निरोप देत असतात.
बस हळूहळू पुढे सरकते आणि अंतर वाढत जाते. मात्र
नात्यांमधील प्रेमाचे अंतर कधीच वाढत नाही उलट त्याक्षणी प्रत्येकाच्या मनात
एकच भावना असते-"लवकर परत ये".
ग्रामीण महाराष्ट्रातील हजारो कुटुंबाचे हे वास्तव आहे.
रोजगाराच्या शोधात अनेक युवक गाव सोडून महानगरांत कडे जातात त्यांच्या पाठीशी उभे असते ते त्यांचे कुटुंब आणि गाव एसटी स्थानकावर घडणारा हा निरोपाचा प्रसंग समाजातील
कौटुंबिक एकात्मता, परस्पर
प्रेम आणि जबाबदारीची जाणीव अधोरेखित करतो.
आजच्या आधुनिक आणि वेगवान युगात संवादाची अनेक
साधने उपलब्ध झाली असली तरी प्रत्यक्ष भेटीतून मिळणारी
उब आणि निरोपातील आपुलकी यांना पर्याय नाही.
एसटी स्टँडवर उभे राहून आपल्या माणसाला निरोप देताना अनुभवला जाणारा तो क्षण हा केवळ प्रवासाचा आरंभ नसून, संघर्ष, आशा, कर्तव्य आणि प्रेम यांच्या संगमाचे जिवंत चित्र असते.
मुंबईच्या दिशेने धावणारी एसटी पुढे निघून जाते, गर्दीतले
चेहरे विसरून जातात; पण त्या काही मिनिटांमध्ये निर्माण झालेल्या भावना अनेक दिवस मनात घर करून राहतात.
म्हणूनच गावातून मुंबईला निघालेल्या प्रत्येक चाकर मान्याच्या प्रवासामागे एक कुटुंब, एक गाव आणि असंख्य शुभेच्छा ठेवा कायम उभा असतो.
बापुना आत्राम (सातारा प्रतिनिधी,- लोकसत्य वाणी न्यूज)

0 टिप्पण्या