संतोष बोराटे यांचे किर्तन प्रवचन समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम



लोक सत्यवाणी न्यूज/सातारा प्रतिनिधी:बापुना आत्राम 


सध्याच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात अध्यात्म,संस्कार आणि समाज प्रबोधनाची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.अशा काळात आपल्या प्रभावी वाणी, अभ्यासपूर्ण निरूपण आणि समाज जागृतीच्या संदेशातून जनमानसालानवी दिशा देणारे 
ह.भ.प. संतोष बोराटे हे आज किर्तन-प्रवचन क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात आहेत. त्यांच्या किर्तन-प्रवचन आणि व्याख्यानमालेतून समाजाला संस्कार, विचार आणि सकारात्मकतेचा संदेश मिळत असून अनेक श्रोते त्यांच्या विचारांनी प्रेरित होत आहेत. 

ह.भ.प. संतोष बोराटे यांच्या प्रवचनाची शैली अत्यंत साधी, ओधवती आणि मनाला भिडणारी आहे. अध्यामत, संत साहित्य, सामाजिक जाणीवा,
कुटुंब व्यवस्था, युवकाचे संस्कार आणि मानवतेचे मूल्य यांसारख्या विषयांवर ते प्रभावीपणे भाष्य करतात.
त्यांच्या कीर्तनात विनोद, उदाहरणे, संतवाणी आणि वास्तव जीवनातील प्रसंग यांचा सुंदर संगम आढळून येतो. त्यामुळे त्यांचे प्रवचन केवळ 
धार्मिक कार्यक्रम न राहता समाज प्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ बनले आहे.
अनेकांनी त्यांच्या कीर्तन-प्रवचनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असून"प्रवचन ऐकल्यानंतर प्रसन्न होते, विचारांना सकारात्मक दिशा मिळते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो,"अशा भावना श्रोत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. विशेष म्हणजे युवकांना पासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक त्यांच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. त्यांच्या वाणीतील साधेपणा आणि विचारातील, प्रामाणिकपणा लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतो. 

संतोष बोराटे हे केवळ धार्मिक प्रवचनकार नसून समाजातील विविध प्रश्नांवर ही ते संवेदनशील पणे भाष्य करतात. 
व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, कुटुंबातील नातेसंबंध, शिक्षणाचे महत्व, संस्कारक्षम पिढी घडवण्याची गरज यावर ते प्रभावी उदाहरणांसह मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्यांना"किर्तन प्रबोधनकार "म्हणूनही संबोधले जाते. त्यांच्या कार्यक्रमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. 

त्यांच्या व्याख्यानमालेत संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत गाडगेबाबा, संत नामदेव यांच्या विचाराचा प्रभाव जाणवतो. संत साहित्याचा सखोल अभ्यास आणि जीवनातील अनुभव यांच्या जोरावर ते श्रोत्यांना सहजपणे विचार प्रवृत्त करतात.
अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्थांकडून त्यांना विविध कार्यक्रमांसाठी निमंत्रित 
केली जाते. ग्रामीण भागासह शहरांमध्येही त्यांच्या प्रवचनांना मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळते.

आजच्या पिढीला संस्काराची जोड देण्यासाठी आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी अशा प्रबोधनकारांची आवश्यकता असल्याचे मत अनेक नागरिक व्यक्त करतात. समाजातील वाढती नैराश्याची भावना, तणाव आणि चुकीच्या प्रवृत्ती यावर मात करण्यासाठी अध्यात्मिक विचारांची गरज असून संतोष बोराटे यांचे किर्तन -प्रवचन त्या दृष्टीने प्रेरणादायी ठरत असल्याची भावना श्रोत्यातून व्यक्त होत आहे. 

लोकांच्या मनात श्रद्धा, संस्कार आणि सामाजिक जाणीव जगविण्याचे कार्य सातत्याने करणारे ह.भ.प. संतोष बोराटे यांचे योगदान निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी मानले जात आहे. त्यांच्या प्रवचनातून मिळणारा बोध अनेकाच्या जीवनात सकारात्मक बदल 
घडवीत असल्याचे बोलले जात आहे. अध्यात्म आणि समाज प्रबोधन याचा मेळ घालत त्यांनी उभारलेले कार्य आज अनेकांसाठी मार्गदर्शन ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या