" माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके l मेळवीन ll
संत ज्ञानेश्वर पासून ते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला अलौकिक दर्जा प्राप्त करून ती समृद्ध केली आहे.
दिनांक २७ फेब्रुवारी रोजी जे एम एफ शिक्षण संस्थांतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये सकाळ आणि दुपारच्या सत्रात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या गौरवात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे, सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांचे स्वागत करण्यात आले.ग्रंथ हेच आपले गुरू आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी लेझीम व ढोल ताशांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व स्वागत गीत गाऊन सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.मराठी शिक्षिकांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. मराठी शिक्षिका स्मिता काटकर यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व सांगितले तर इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनींनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवी गाऊन त्याचा अर्थ देखील सांगितला. आजच्या दिवशी सर्व मुले मुली हे साहित्यिक , कवयित्री च्या वेशभूषेमधे आली होती.इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यानी त्यांच्या मराठी शिक्षिका सौ मानसी शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली सांग सांग भोलानाथ हे बालगीत सादर केले तर पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी शिक्षिका स्मिता काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारुड सादर केले. तर दुपारच्या सत्रात सौ. वर्षा पवार, सौ.स्वाती सोनवणे या मराठी शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मराठी नाटक, नृत्य ,गायन सादर केले.कविता वाचन , मराठी म्हणी यांची जणू आज मेजवानीच होती. नृत्य शिक्षक अभिषेक देसाई, नाट्य शिक्षक प्रमोद पगारे व नितेश मेस्त्री यांनी देखील विद्यार्थांना दिग्दर्शन केले.
मराठी भाषा ही मराठी माणसाचा आत्मा आहे.आजच्या स्पर्धायुक्त जगात माणूस नाविन्याचा ध्यास घेत पुढे जाण्याच्या शोधात आहे तर AI सारख्या अत्याधुनिक प्रणीलाचा वापर करून टीकून राहण्याचा प्रयत्न करतो आहे, असे जरी सर्व असले तरी मराठी माणूस शेवटी मराठी विचारामधून च आपल्या बुद्धिमत्तेला वाव देतो, असे संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
" आयुष्याचा पेपर खूप कठीण गेला, कारण अभ्यास भावनांचा केला परंतु पेपर मात्र व्यवहाराचा निघाला "
शेवटी आहे काय अन् नाही काय...ही स्वरचित कविता संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे यांनी वाचून दाखवून त्याचा अर्थ देखील सांगितला.
ज्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे अशा सचिव डॉ प्रेरणा कोल्हे ह्या दरवेळीच नवनवीन मराठी काव्य लिखाण करीत असतात आजच्या दिवशी देखील त्यांनी स्वरचित काव्य पंक्तींचे वाचन करून कवी कुसुमाग्रज यांना आदरांजली अर्पण केली.प्रत्येक मैलावर मराठी भाषेची उच्चार पद्धती म्हणजेच भाषेचा लहेजा बदलत जातो , असे असले तरी आपल्या पर्यंत पोहोचणाऱ्या भावनांचा अर्थ हा एकच असतो जो आपल्या हृदयापर्यंत भिडतो म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेला रसाळ वाणी संबोधून अमृतापेक्षाही गोड आहे असे १५ व्या शतकातच लिहून ठेवले आहे .असेही सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
सकाळ आणि दुपारच्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्साहाने मराठी अभिमान गीत गाऊन मराठी भाषा गौरव दिन साजरा केला तर विद्यार्थ्यांनी शुद्ध मराठी भाषेतून सूत्रसंचलन केले. संगीत शिक्षका सौ श्रेया कुलकर्णी यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमांची सांगता केली. संपूर्ण कार्यक्रमाची सजावट श्री.नरेश पिसाट यांनी केली होती.

.jpeg)

0 टिप्पण्या