सोमवार दि.१२ जानेवारी २०२६ रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला . छत्तिसगढ राज्यामधील बस्तर भागात वंचित, उपेक्षित समाजामधील आदिवासींसाठी वैद्यकीय सेवा करणारे आयुर्वेदाचार्य सन्माननीय श्री. रामचंद्र त्रिंबक गोडबोले यांना हया वर्षीचा २७ वा स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान सोहळा संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, छत्रपती भवन, आयरे रोड, दत्तनगर, डोंबिवली पूर्व या ठिकाणी पार पडला.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी यांनी सन्माननीय डॉ. श्री. रामचंद्र त्रिंबक गोडबोले यांना 27 वा स्वामी विवेकानंद पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुरस्काराचे स्वरूप शाल ,श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह , रोख रक्कम आणि पुष्पगुच्छ असे होते. मानपत्र वाचन व लेखन विष्णुनगर माध्यमिक शाळेचे पर्यवेक्षक डॉ .श्री.सुनील पांचाळ यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती डॉ.श्री. रामचंद्र त्रिंबक गोडबोले , संस्थाध्यक्ष डॉ.संजय कुलकर्णी, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ.सौ.सरोज कुलकर्णी , कार्यवाह श्री. शिरीष फडके, सहकार्यवाह श्री. प्रमोद उंटवाले, कोषाध्यक्ष श्री. संजय दीक्षित उपस्थित होते.
यावेळी बस्तरचे आनंदयात्री व ध्येयपूर्तीसाठी अविरत काम करणारे डॉ. गोडबोले यांची मुलाखत प्रसिद्ध निवेदिका सौ. मधुरा ओक यांनी घेतली.
पुरस्काराला उत्तर देत असताना डॉ. गोडबोले म्हणाले की आदिवासी क्षेत्रात काम करत असताना कधीतरी मनामध्ये निराशा निर्माण होते, अज्ञात भागात काम करतोय असं वाटायला लागतं अशावेळी आपल्याकडून दिला जाणारा हा पुरस्कार प्रेरणादायी ठरतो व यातूनच प्रोत्साहन मिळते मनातील निराशेचे मळभ यामुळे निघून जाते, शहरापर्यंत कार्य पोहोचवता येते.
आदिवासी भागांमध्ये कुपोषण,मलेरिया आणि सिकलसेल ऍनिमिया अशा प्रकारच्या समस्या असून अंधश्रद्धा व अज्ञानामुळे यामध्ये वाढ होत आहे. शासनाचे सर्व प्रकारचे प्रयत्न व वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य यामुळे यामध्ये खूप फरक पडतोय. परंतु अजूनही खूप काम बाकी आहे असे म्हटले. तेथे प्रथमोपचार कसे करावेत याविषयी सजगता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे असे ते म्हणाले.
लग्नानंतर दहा दिवसातच बस्तर या आदिवासी भागात काम करायला गेलो यामागे डॉ. गोडबोले यांच्या पत्नी सौ. सुनीताताई गोडबोले यांचा दृढनिश्चय असल्याचे देखील ते म्हणाले.
नक्षलवादी भाग असून देखील आपणाला कसे स्वीकारले गेले? यावर बोलताना ते म्हणाले की आरोग्य क्षेत्रातील काम हे सर्वांना जोडणारे काम असून या माध्यमातून आदिवासींशी संवाद साधता येतो व कुपोषणावर काम करीत असल्याने आदिवासींना या कामाची गरज लक्षात येते त्यामुळे आम्हाला स्वीकारले गेले.
भाषेच्या अडचणी बद्दल बोलताना वनवासी कल्याण आश्रमामध्ये कार्य करणाऱ्या दहा मुलींमुळे माडिया व गोंडी भाषा शिकता आल्या व हिंदी भाषा येत असल्याने अडचण आली नाही.
यावेळी डॉ. गोडबोले यांच्या पत्नी सौ. सुनीताताई म्हणाल्या की अशा कार्यक्रमामधून बस्तर सारख्या आदिवासी भागाबद्दल सर्वांना माहिती होईल . तेथील मनुष्यबळाचा प्रश्न सोडवता येईल. आपल्या महाराष्ट्राला सामाजिक कार्याचा इतिहास आहे. मराठी समाज हा सेवाभावी वृत्तीचा असून आपण वेळ काढला तरच हे कार्य पुढे जाऊ शकेल. ही भावना मनामध्ये ठेवूनच पुढे जावे असे देखील त्या म्हणाल्या.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा ठाणे जिल्ह्यातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम असलेला "रामानुजन गणित उद्यान " या गणित प्रदर्शनाला सत्कारमूर्ती डॉ.श्री गोडबोले यांनी भेट दिली व या उपक्रमाचे कौतुक केले.यामध्ये संस्थेच्या सर्व स्वामी विवेकानंद शाळांमधील माध्यमिक व प्राथमिक विभागातील प्रत्येकी दहा प्रकल्प सादर करण्यात आले.गणित प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे.
स्वामी विवेकानंद पुरस्कार सोहळ्याचे हे सत्ताविसावे वर्ष आहे. संस्थाध्यक्ष डॉ.श्री. संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. मेघा कांबळी यांनी व आभार आभार संस्थेचे कार्यवाह श्री. शिरीष फडके यांनी मानले. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी "महन्मंगला परमसुंदरा" ही ईशस्तवन तर विष्णुनगर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी "विवेक नगरी सजली धजली" हे स्वागतगीत सादर केले. सत्कारमूर्ती डॉ. रामचंद्र गोडबोले यांचा परिचय संस्था कार्यकारीणी सदस्या ॲड.सौ. ललिता जोशी यांनी करून दिला. पुरस्कार सोहळ्याचा समारोप विष्णूनगर शाळेतील विद्यार्थीनी कु. ओवी दत्ताराम मोंडे हिने म्हटलेल्या संपूर्ण वंदे मातरम् गीताने झाला.
व्याख्यानमालेला माजी मंत्री श्री.जगन्नाथ पाटील यांसह संस्थेचे सर्व आजी व माजी पदाधिकारी, पालक,रात्र महाविद्यालय व विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक प्रतिनिधी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला व पुरस्कार सोहळा सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक यांच्या मेहनतीने आणि सहकार्याने नियोजनाप्रमाणे पार पडला याबद्दल संस्थास्तरिय प्रमुख डॉ. श्री. सुभाष वाघमारे आणि सर्व व्यवस्था प्रमुख डॉ .श्री.सुनील पांचाळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
कृपया वरील बातमी प्रसिद्ध करावी ही विनंती.



.jpeg)
0 टिप्पण्या