श्री रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः
दिनांक २५ नोव्हेंबर, मंगळवार – मार्गशीर्ष शुक्ल पक्ष, हा दिवस म्हणजे अयोध्येत उगवत्या सूर्याने स्वर्णकिरणांनी श्रीराम मंदिराच्या कळसावर पसरवलेले जणू श्रीरामांना अर्पण केलेले मानचिन्हच!
याच पवित्र क्षणाची प्रतिकृती म्हणून जे एम एफ शिक्षण संस्थेमध्ये देखील ढोल–ताशांच्या निनादात, लेझीमच्या तालात आणि “जय श्रीराम”च्या घोषात हा आगळावेगळा ध्वजारोहण सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला.
“दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला… राम जन्मला गं सखी, राम जन्मला...”
रामजन्माच्या त्या मंगलवेळेला दुपारी बारा वाजता अयोध्येत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते जसे ध्वजारोहण झाले, त्याच क्षणी जे एम एफच्या ब्रह्मा रंगातल्या प्रांगणात या अद्वितीय सोहळ्याचे आयोजन झाले.
भव्य मिरवणुकीने सोहळ्याची सुरुवात
संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, आणि खजिनदार जाह्नवी कोल्हे यांनी शाळेच्या प्रवेशद्वारापासून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, ऋषी–मुनी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांच्या वेशातील विद्यार्थ्यांसह मिरवणूक काढली.
लहान मुलांनी गदा हातात घेत वानरसेनेच्या रूपात “जय श्रीराम”च्या घोषात प्रांगणात प्रवेश केला.
पालखीत राम–लक्ष्मण–सीता–हनुमान यांच्या मूर्ती ठेऊन लेझीमच्या नादात आणि श्रीरामनामात तल्लीन होऊन मिरवणूक ध्वजारोहण स्थळी पोहोचली.
अंबाभवानी मंदिराचे पुजारी श्री श्रीधर पुजारी यांनी वेदमंत्रांच्या घोषात सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते कलशपूजन, तर संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांच्या हस्ते राम–लक्ष्मण–सीतेची प्रतिष्ठापना करण्यात आली.
त्यानंतर पंचवातीच्या समई प्रज्वलित करण्यात आली.
ध्वजारोहणाचा मंगल क्षण
भव्य भगवा ध्वज फुलांनी सजवण्यात आला होता.
पंतप्रधान व योगीजी यांच्या वेशातील विद्यार्थ्यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात ध्वजारोहण पार पडले.
या प्रसंगी मान्यवर डॉ. मोझेस, श्रीधर पुजारी, श्री रोहित राजगुरु, जाह्नवी कोल्हे, डॉ. नाडर यांनी भगव्या ध्वजाला वंदन केले.
हजारो पालक, जन गण मन सीबीएसई व स्टेट बोर्डचे विद्यार्थी, वंदे मातरम महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक यांच्या डोळ्यात भावनांचे अश्रू दाटले आणि सर्वांनी अयोध्या सोहळ्याचा जीवंत अनुभव घेतला.
आठ मजली भव्य जे एम एफची इमारत जणू श्रीरामाच्या घोषात न्हाऊन निघाली.
फुलांच्या वर्षावात, श्रीरामभजनांच्या सुरांमध्ये उन्हाची तमा न बाळगता उपस्थितांनी हा अभूतपूर्व सोहळा मनसोक्त साजरा केला.
संस्थेचे मार्गदर्शक विचार
संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे म्हणाले—
“‘राम’ हा दोन अक्षरी शब्द असला तरी त्या दोन अक्षरांत संपूर्ण ब्रह्मांड सामावले आहे. त्याचे उच्चारण होताच मनात आर्त भावना जागृत होतात. अशा दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होणे ही आजच्या पिढीची भाग्यलक्षणी गोष्ट आहे.”
सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे म्हणाल्या—
“भारत ही केवळ भूमी नसून देवभूमी आहे. त्या देवभूमीत जन्म घेणे हीच मोठी प्राप्ती. आमची जन गण मन शाळा ही जणू त्या रामरायाचेच आशीर्वाद घेऊन उभी आहे.”
ध्वजारोहणाची आकर्षक सजावट श्री. नरेश पिसाट व सौ. उषा पिसाट यांनी मनोभावे केली, तर कलात्मक शिक्षक अभिषेक देसाई, दीपा तांबे, कस्तुरी, श्री विठ्ठल कोल्हे यांनी भगव्या ध्वजावर कांचनवृक्ष, श्रीरामाचे सूर्यचक्र, तेजोमूर्ती यांची कलाकुसर करून सोहळ्यास दिव्यता प्राप्त करून दिली.
क्रीडा दिवस – २४ व २५ नोव्हेंबर
जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिरचा संयुक्त क्रीडा दिवस दोन दिवस ब्रह्मा रंगातल्या प्रांगणात उत्साहात पार पडला.
शिशुविहार ते इयत्ता दहावीपर्यंत एकूण सुमारे १,००० विद्यार्थ्यांनी धावणे, लंगडी, अडथळा शर्यत, चमचा–लिंबू शर्यत इत्यादी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
अनेक विद्यार्थ्यांनी ट्रॉफी, प्रशस्तीपत्रके व पदके जिंकून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
उद्घाटन प्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, क्रीडा शिक्षक रमेश वगे, सौ. वैशाली शिंदे, तसेच प्रमुख पाहुणे विनायक कांबळे यांनी मशाल प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धांना प्रारंभ केला.
शिशुविहारातील बालकांनी आकर्षक प्रात्यक्षिके, नृत्य सादर केले, तर इयत्ता १ आणि २ च्या विद्यार्थ्यांना सर्वांना विजेता घोषित करून हनुमानाची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली.
डॉ. राजकुमार कोल्हे म्हणाले—
“जिंकणे–हरणे ही नैसर्गिक बाब असली तरी दुसऱ्याच्या यशात सहभागी होणे म्हणजे अपयशालाही यशाची चव देणे होय.”
डॉ. प्रेरणा कोल्हे म्हणाल्या—
“खेळ मन आणि शरीर विकसित करतो. मानसिक–शारीरिक ताण दूर करण्यासाठी नियमित मैदानात उतरले पाहिजे. स्पर्धेपेक्षा खेळाचा आनंद अधिक महत्त्वाचा.”
क्रीडा दिवस यशस्वी करण्यासाठी प्राचार्य अलपेश व मयुरी खोब्रागडे, प्राचार्या ज्योति वेंकटरमण, प्राचार्या तेजावती कोटीयन, तसेच
सौ. श्रेया कुलकर्णी, अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, सपना यन्नम, स्नेहा डोळे, दीपा तांबे, दीपाली सोलकर,
क्रीडा शिक्षक रमेश वगे, वैशाली शिंदे, आणि सर्व वर्गशिक्षकांनी परिश्रम घेतले.

.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
0 टिप्पण्या