(सुभाष हांडे देशमुख नवी मुंबई यांजकडून)
नवी मुंबई : नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ ही संस्था नेहमीच ज्येष्ठांसाठी आगळे वेगळे, दर्जेदार कार्यक्रम सादर करीत आली आहे. गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहामध्ये प्राध्यापक अरुण सबनीस यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आणि अभ्यासपूर्ण रीतीने, उपस्थितांशी मोकळेपणाने संवाद साधत संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. अजय माढेकर, सचिव यांनी प्राध्यापक अरुण सबनीस यांचा श्रोत्यांना परिचय करुन दिला व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री सबनीस हे सुप्रसिद्ध सिने अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते सचिन पिळगावकर यांचे सासरे आहेत.
श्री सबनीस यांनी १०१ देशात प्रवास करून सातही खंडात त्यांनी भ्रमंती केलेली आहे. विशेषतः वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अंटार्टिकाची मोहीम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वासाने पूर्ण केली . ज्येष्ठ नागरिक संघाचे आर्थिक सल्लागार व मार्गदर्शक विकास साठे यांनी त्यांची अत्यंत समर्पक प्रश्न विचारून खुमासदार शैलीत मुलाखत घेतली. प्राध्यापक सबनीस यांनी देखील तितक्याच मार्मिक शैलीत आपल्या भ्रमंतीचा प्रवास उलगडून सांगितला. हे सांगताना त्यांच्या प्रखर स्मरणशक्तीचा, हरहुन्नरी स्वभावाचा प्रत्यय येत होता. विविध देशातील बरे वाईट अनुभव, प्रवासातील आव्हाने आपल्या खणखणीत आवाजात त्यांनी कथन करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
आपणास पर्यटनाची प्रेरणा कुठून मिळाली याविषयी सांगताना ते अत्यंत भावुक झाले व म्हणाले की लहानपणी आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. आजोबांनी अचानक नोकरी सोडल्याने माझ्या वडिलांच्या वर तरुणपणातच घराची आर्थिक जबाबदारी येऊन पडली. मी एम. ए. झाल्यानंतर मुंबईहून गावी घरी आलो होतो, त्यावेळी सहज वडिलांचे कपाट शोधताना मला वडिलांच्या कपाटात पर्यटनाची ब्राऊचर्स मिळाली. त्यामध्ये देशातील आणि विदेशातील पर्यटन स्थळाची माहिती होती आणि मी हे आश्चर्यचकित होऊन पाहत असताना अचानक वडील आले आणि विचारलं काय पाहतोस? त्यावर मी वडिलांना पर्यटनाची ब्राऊचर्स दाखवली. त्यावर वडील हताशपणे म्हणाले अरे मला इथे जायला कधीही जमलंच नाही.
माझ्या हृदयावर हा प्रसंग कोरला गेला, आणि मी वडिलांनी ठरवलेल्या त्या परदेशातल्या ठिकाणी जाऊन मी त्या घटनेचे स्मरण करून माझ्या डोळ्यांनी माझ्या वडिलांना ती पर्यटन स्थळ दाखवली.
पर्यटन करताना आर्थिक आणि पर्यटन स्थळ यांचा अभ्यास करुन त्याचे काटेकोर व्यवस्थापन, नियोजन करणे गरजेचे आहे असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. अशा ह्या मुलाखतीचा रंगतदार सोहळा खेळमेळीच्या वातावरणात ज्येष्ठ नागरिक संघामध्ये संपन्न झाला. उपस्थितांनीही त्यांस प्रश्न विचारून मनसोक्त दाद दिली.
अरुण सबनीस डोंबिवली महाविद्यालयात प्राचार्य होते तसेच ते सिडकोमध्ये २५ वर्ष कार्यरत होते, विपणन व्यवस्थापक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. त्यांची स्मरणशक्ती इतकी तल्लख होती की सिडको मध्ये कार्यरत असताना त्यांना चालता बोलता मानवी संगणक असे म्हटले जायचे असे त्यांनी सांगितले, आणि याविषयीचा एक गमतीदार किस्सा देखील त्यांनी कथन केला.
या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे सिडकोचे त्यांचे अनेक अधिकारी मित्रगण देखील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.
शेवटी संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांनी पाहुण्यांचे व श्रोत्यांचे मनःपूर्वक आभार मानले व राष्ट्रगीताने या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.
-----------------------------
0 टिप्पण्या