कविता: अमिषाला बळी पडू नको रे !
सावध रहा गड्या सावध रहा, अमिषाला बळी पडू नको रे l
अस्तित्व तुझे पुसण्या निघाले, त्यांची संगत करू नको रे ! ll धृ ll
पूर्वजांची ही मालमत्ता, उदारतेने तू देशील सोडून l
बदल्यात तुला किती काय मिळाले, स्वमनाशी हे घे जाणून ll
अधिकाऱ्यांच्या गप्पा नेत्यांच्या थापा, त्यांशी भुलून जाऊ नको रे ! ll १ll
अस्तित्व तुझे पुसण्या निघाले, त्यांची संगत करू नको रे ! l
कष्टकरी तू शेतकरी तू, जगाचा तू असशी पोशिंदा l
तरी छातीवरी ठेवती पाय तुलाच करती रे शरमिंदा ll
सत्य आवाज दाबणाऱ्या असुरांशी संगत करू नको रे! ll२ll
अस्तित्व तुझे पुसण्या निघाले, त्यांची संगत करू नको रे! l
झाल्या यातना सहन होईना, बळीराजा मागतो न्याय l
विश्वासू यंत्रणा विकाऊ झाल्या,नाही उरला काही पर्याय ll
एकजुटीच्या या वज्रमुठीने दृष्ट प्रवृत्तीला हाणून पाडू रे ! ll३ ll
अस्तित्व तुझे पुसण्या निघाले, त्यांची संगत करू नको रे ! l
हे गोविंदा,मूर राक्षसाचा वध करणारा तूच रे मुरारी l
द्रौपदीची लाज राखणारा शाम तूच आहेस श्रीहरी ll
म्हणे सागोसुत श्रीहरीस आता फक्त विश्वास तुझ्यावरी रे ! ll ४ ll
अस्तित्व तुझे पुसण्या निघाले, त्यांची संगत करू नको रे! l
**********
कवी: श्री.संतोष सावित्रीबाई गोपाळ सावंत उर्फ (सागोसूत हरिसंतोष) मो . 9324389918
दिनांक : २ जुलै २०२५
वेळ : सकाळी ८.३० ते ९.३० वाजता दरम्यान रचलेली ही काव्य रचना
0 टिप्पण्या