*उच्च न्यायालयाचे आयोगाला निर्देश*
मुंबई - शालेय कामकाजाच्या वेळेत शिक्षकांना निवडणूक काम न देण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिले आहेत.मुंबई महानगरपालिका शिक्षक सेनेने यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
शिक्षक सेनेचे अध्यक्ष के.पी.नाईक यांनी सांगितले की,२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिक्षकांना बीएलओची ड्युटी बंधनकारक करीत पालिकेच्या शिक्षण विभागाने तीन परिपत्रके जारी केली होती.त्या परिपत्रकांना आव्हान देत शिक्षक सेनेने याचिका दाखल केली होती.त्यावर उच्च न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निर्णय दिला आहे.सुनावणीदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने सेंट मेरी स्कूल प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले जाईल, शिक्षकांना सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शालेय कामकाज वेळेव्यतिरिक्त निवडणूक ड्युटी दिली जाईल,अशी हमी दिली.उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे शिक्षक सेनेने पत्रकार परिषद घेऊन स्वागत केले.यावेळी शिक्षक सेनेचे सरचिटणीस हणमंत देसाई,हरीष गिरीगोसावी,सुरेंद्र वाघ, संतोष गंगावणे,महिला आघाडीप्रमुख दर्शना राऊत आदी उपस्थित होते.यावेळी आम्ही सुट्टीच्या दिवसांत काम करण्यास तयार आहोत. त्या बदल्यात पर्यायी रजा मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली.
0 टिप्पण्या