नवी मुंबई ( सुभाष हांडे देशमुख )
नवी मुंबई : नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघ संस्थेचा जागतिक महिला दिन सोहळा गुरुवार दिनांक १३ मार्च २०२५ रोजी संस्थेच्या श्री गणेश सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा झाला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राज्य सरकार पुरस्कार विजेत्या श्रीमती फुलन ज्योतिराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या डॉक्टर श्रीमती वृषाली मगदूम, साहित्यिक श्रीमती सुनंदा भोसेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते. जेष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून सहभाग दर्शविला. प्रसंगी विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांचा हिरकणी पुरस्कार - २०२५ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दीप प्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन सुरू झालेल्या या कार्यक्रमात श्रीमती अपर्णा दाबके ताई यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत गीत व प्रार्थना म्हटली. त्याचप्रमाणे नंदलाल बॅनर्जी यांच्या शंखनादाने वातावरण अधिक मंगलमय झाले. आपल्या प्रास्तविक भाषणात अरविंद वाळेकर यांनी महिलांच्या चळवळीला ५० वर्ष झालेली आहेत असे नमूद करुन जेष्ठ नागरिक संघ करीत असलेल्या कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली.
उपस्थितांशी संवाद साधताना श्रीमती वृषाली मगदूम यांनी गेल्या पन्नास वर्षात स्त्रियांच्या झालेल्या चळवळीचा आढावा घेतला. आज देखील स्त्रियांची प्रगती तितकीशी बदललेली नाही, आज देखील ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांना समान वेतन मिळत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले तसेच फातिमा शेख या भारतीय पहिल्या महिला शिक्षकांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख करुन भंवरी देवी, बिलकिस बानू तसेच निर्भया केस यांचा आपल्या भाषणात उल्लेख केला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाने विविध क्षेत्रात योगदान दिलेला महिलांचा हिरकणी पुरस्कार - २०२५ देऊन त्यांनी सत्कार केला.
"हिरकणी पुरस्कार" प्राध्यापिका प्रतिभा सराफ, (साहित्य) , श्रीमती मनीषा वळकुंडे, (व्यसनमुक्ती ), श्रीमती रेहान पटेल राणे , (कलाक्षेत्र) ,श्रीमती कमल आंगणे (वैद्यकीय क्षेत्र) ,श्रीमती सुवर्णा मिसाळ , (शैक्षणिक क्षेत्र ),श्रीमती बाला सिताराम रोकडे, (क्रीडा क्षेत्र) ,श्रीमती बिना भरत साळेकर, (सामाजिक कार्य) , श्रीमती रुक्मिणी जोसेफ पॉल, (स्वच्छता दूत ) श्रीमती लता शिरसाट, (पोस्ट वूमन) यांना अनुक्रमे देण्यात आला. उत्कर्ष ज्येष्ठ महिला मंडळाच्या माध्यमातून श्रीमती रेखा वाळवेकर यांनी जे अनमोल सामाजिक कार्य केले या कार्याचा उचित गौरव त्यांना "जीवन गौरव " पुरस्कार देऊन करण्यात आला. प्रसंगी रणजीत दीक्षित यांनाही वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर गुमास्ते यांनी छान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले व रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले. श्रीमती फुलन ज्योतिराव शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महिलांच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच आपल्या स्वानुभवावरून योगाचे महत्त्व प्रतिपादन केले. महिला दिनाच्या या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्रीमती रजनी कलोसे व अजय माढेकर यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विकास साठे यांनी केले. संस्थेच्या कार्यकारिणी मंडळातील सर्व सदस्यांनी मेहनत घेऊन संपूर्ण कार्यक्रम यशस्वी केला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
------------------------------------
0 टिप्पण्या