कामरा आणि अंधारेंविरोधात परिषदेत आ. प्रविण दरेकरांनी मांडला हक्कभंग





मुंबई- स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली होती. तिच कविता, त्याच चालीत, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना बोलून दाखवली होती. याचे पडसाद आज विधानपरिषदेच्या सभागृहात उमटले. भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी कामरा आणि अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. 


आ. दरेकर म्हणाले कि, हा एक प्रकारे सभागृहाचा किंबहुना सभागृहातील सगळ्या सदस्यांचा अवमान आहे. त्यांनी एकप्रकारे सभागृहातील सदस्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय, ही बाब अत्यंत गंभीर आहे. हे सभागृह सर्वोच्च आहे आणि या सभागृहाचा अवमान आम्ही सहन करणार नाही. शिवसेना उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी कामरा यांचा स्टुडिओ फोडल्याप्रकरणी यूट्यूब, सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करताना चुकीची भाषा वापरली होती. त्यांनी आपल्या निवेदनात संस्कृती आणि शाब्दिक मर्यादांचे उघडपणे उल्लंघन केलेय. आपण राज्याच्या उपमुख्यमंतत्र्यांविषयी बोलत आहोत, याचे भानही त्यांनी ठेवले नाही. तथाकथित प्रसिद्धीसाठी उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे भाष्य करणे नैतिक मूल्यांचे अवमुल्यन आहे. अंधारे यांनी बोलताना वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा आणि कुणाल कामराने हेतूपूरस्पर उपमुख्यमंत्री यांच्यावर वैयक्तिक व उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एकप्रकारे सभागृहाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती दरेकरांनी केली. त्यावर सभापती राम शिंदे यांनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे योग्य त्या कारवाईसाठी पाठवीत असल्याचे जाहीर केले.


00000

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या