कराड तालुक्याच्या बामणवाडीतील लक्ष्मी देवीची यात्रा १ एप्रिल रोजी


*अखंड हरिनाम सप्ताह सोहळा उत्साहात सुरू*


मुंबई- कराड तालुक्यातील कराड- ढेबेवाडी रोडवर तारूखजवळ असलेल्या आदर्श गाव बामणवाडीत ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीची वार्षिक यात्रा मंगळवार १ एप्रिल रोजी पारंपरिक जल्लोषात साजरी होणार आहे.त्यानिमित्त बामणवाडी  ग्रामस्थांच्यावतीने अखंड हरिनाम सप्ताह सोहळा २३ मार्चपासून सुरू झाला आहे. 


या ज्ञानेश्वरी पारायण  सोहळ्यात दररोज काकड आरती,पांडुरंगाची पूजा, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन, हरिपाठ,कीर्तन आदी कार्यक्रम होत आहेत. महाराष्ट्रातील नामवंत  कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेला भाविकांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे. रविवार ३० मार्च रोजी सकाळी माऊलींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक, १० वाजता काल्याचे कीर्तन  होऊन पारायणाची सांगता होणार आहे.त्यानंतर दुसर्‍या दिवशी यात्रेनिमित्त सोमवार ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता नैवेद्य व औषधाचा म्हणजेच फटाक्याच्या आतिषबाजीचा कार्यक्रम  आणि वगनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.तसेच मंगळवार १ एप्रिल रोजी लक्ष्मीदेवीची पालखी मिरवणूक,दुपारी तमाशा आणि सायंकाळी कुस्त्यांचा फड आयोजित केला आहे. तरी बामणवाडी पंचक्रोशीतील नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा,असे आवाहन मुंबईस्थित ग्रामस्थ,नवाकाळचे पत्रकार शंकर कडव यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या