प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख:
नवी मुंबई : नेरुळ येथील जेष्ठ नागरिक संघ व यशवंतराव चव्हाण नवी मुंबई विभागीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी, एक ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व गांधी जयंती याचे औचित्य साधून ज्येष्ठांच्या आरोग्यावर कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झालायशवंतराव चव्हाण नवी मुंबई विभागीय केंद्राचे अध्यक्ष प्रमोदजी कर्नाड यांच्या पुढाकाराने खास ज्येष्ठांसाठी हा कार्यक्रम नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक भवन मध्ये आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात प्रमोद कर्नाड यांनी कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच अण्णासाहेब टेकाळे हे महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे अध्यक्ष झाले त्याबद्दल त्यांचा गुणगौरव करुन त्यांचा यथोचित सत्कार केला.
या कार्यक्रमात मुख्य व्याख्यात्या मानसशास्त्रज्ञ श्रीमती रिचिका गुप्ता यांनी जेष्ठांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सकारात्मक विचारसरणीमुळे माणसाचे आरोग्य चांगले घडू शकते व सर्व परिस्थितीमध्ये "स्वीकार" हा एक मुख्य घटक आहे, त्यामुळे जीवन सुखकर होते व दुःखाची धार बोथट होते असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, माणसाने भूतकाळ विसरून वर्तमानात जगल पाहिजे. ताणतणावापासून दूर राहिले पाहिजे, आपण माफ करायला शिकलं पाहिजे तसेच कृतज्ञता देखील व्यक्त केली पाहिजे, त्यामुळे मनावरचं ओझं कमी होतं.
अशा रीतीने मनाची गुंतागुंत त्यांनी हळुवारपणे अनेक कंगोऱ्यातून उलगडून दाखवली.
श्रोत्यांनी उत्सुकतेने त्यांचे व्याख्यान ऐकले व शेवटी श्रोत्यांच्या अनेक शंका, प्रश्न यांना मानसशास्त्रज्ञ रुचिका गुप्ता यांनी कुशलतेने उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी विकास साठे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार व्यक्त करताना सांगितले की मनाविषयी बोलताना बहिणाबाईंची कविता या ठिकाणी आठवते:
"मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर,
किती हाकला हाकला, फिरी येते पिकावर.
अशी ही मनाची गुंतागुंत आणि त्याचा थांग लागणे कठीण आहे. परंतु मानस शास्त्रज्ञ रुचिका गुप्ता यांनी तो गुंता नजाकतीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र वरिष्ठ महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, यशवंतराव चव्हाण विभागीय केंद्राचे अध्यक्ष श्री प्रमोदजी कर्नाड, ज्येष्ठ नागरिक मुंबई विभागाचे अध्यक्ष सुरेश पोटे, ज्येष्ठ नागरिक संघ, नेरूळचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, श्रीमती वृषाली मगदूम मॅडम, श्री. मगदूम सर, श्रीयुत कदम, एडवोकेट राजेश टेकाळे, प्रभाकर गुमास्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
-----------------------------------
0 टिप्पण्या