मुंबई- माटुंग्यातील सुमारे ४०० वर्षाची परंपरा लाभलेल्या मरूबाई देवीचा नवरात्रोत्सव यंदाही त्याच पारंपरिक पद्धतीने आजपासून सुरू झाला. त्यानिमित्ताने आज गुरुवार ३ ऑक्टोबर ते शनिवार १२ ऑक्टोबरपर्यंत या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत,अशी माहिती या मंदिराचे विश्वस्त अनिल गावंड यांनी दिली.
आजपासून सुरू झालेल्या नवरात्री उत्सवात पुढील १० दिवसांत अभिषेक,भजन,दुर्गाष्टमी भजन, कुमारी पूजा अष्टमी होम-हवन,सामूहिक प्रार्थना,विजयादशमी आणि शमी पूजन आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.हे कार्यक्रम शेजारील शंकरमठाच्या ट्रस्टीच्या सहकार्याने होत असतात. या ४०० वर्षे जुन्या असलेल्या या मंदिरातील मरूबाई देवी ही देवी दुर्गा,लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप असल्याची आख्यायिका आहे.या मंदिरात मराठी,गुजराती,मल्याळी आणि दक्षिणात्य असे सर्व भाषिक भक्त येत असतात.आपल्या लेकराचे मरणापासून रक्षण करणारी आई अशी ख्याती या देवीला मिळाल्याने तिचे नाव मरूआई किंवा मरूबाई असे पडले आहे. हे मंदिर पूर्वी टेकडीवर होते.त्यामुळे या भागाला मरूबाई टेकडी गाव असे म्हटले जायचे. त्याचाच अपभ्रंश होऊन या गावाचे नाव माटुंगा झाले आहे.याच ठिकाणच्या या मंदिरात नवरात्र काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते.या मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.भक्तांकडून मिळणाऱ्या देणग्यांमधून रूग्णांना मदत,अन्नदान आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याला मदत केली जाते.
0 टिप्पण्या