चिमुकल्यांची चिमुकली पण अवघड धडपड

 

(बाबू घाडीगांवकर)

कोकणात जन्मलेली एक चिमुरडी मुलगी तिच्या छोट्या व्हिडिओज आणि रील्समधून कोकणातील पारंपारिक प्रथा, रीतीरिवाज, निसर्ग, पर्यावरण आणि कोकणच्या संस्कृतीवर प्रकाश टाकत असते. तिचे बाबादेखील एक संवेदनशील कोकणकर असावेत. कारण तिच्या प्रत्येक निर्मितीत त्यांचा असलेला 'हात' ठळकपणे दिसतो, जाणवतो. यंदाच्या मे महिन्यापासून ते पुढे अगदी दीड महिनाभरात तिने तिचे कोकण छान एन्जॉय केलेय. या काळात तिने कोकणातील थोरामोठ्यांचे डोळे उघडणारे, झणझणीत अंजन घालणारे काही व्हिडिओजही शेअर केलेत. तिची प्रत्येक निर्मिती ती मला आवर्जून पाठवते. " बाबुकाका, हा विषय कसा वाटला? बघा आणि सांगा प्लीज." हा तिचा नेहमीचा आग्रह असतो. तिच्या अनेक 'स्टोरी'जमध्ये ती माझ्याही नावाचा कधी आवर्जून उल्लेख करते. 'कोकणातल्या मातीशी नाळ जुळलेला एक संवेदनशील लेखक' अशा शब्दांत ती माझा परिचयही करून देते. या चिमुकल्या वयातील तिचा सुजाणपणा पाहिला की नेहमीच तिचे कौतुक करावेसे वाटते. अस्सल मालवणी बोलीभाषेतील तिचे बोलणे, अस्खलित संवाद आणि हावभाव पाहिले की सांगायला अभिमान वाटतो की, जोपर्यंत अशी मुले आहेत, तोपर्यंत कोकणची संस्कृती  कधीच धोक्यात येणार नाही. अवघ्या आठ ते नऊ वर्षे वयाच्या या चिमुरडीचे नाव आहे, प्रांजल घाडीगांवकर. 

        दरवर्षी ती मे महिन्यातील उन्हाळी सुट्टीत तिच्या कोकणातील गावी येते. एकदा का तिचे गावात, गावच्या मातीत पाऊल पडले की ती गावची होऊन जाते. गावातल्या शेजारच्या पाजारच्या छोट्या मुलांना गोळा करते आणि तब्बल दीड महिनाभर इथले 'कोकण' अनुभवते. यंदाही तिने तिच्या सुट्टीत अस्सल कोकणच्या अस्सल संस्कृतीचा छान आस्वाद घेतला आहे. तिच्या समवयस्क मुलामुलींना सोबत घेऊन ती रानावनात फिरली, शेतात फिरली, रानमेवा खाल्ला, पारंपारिक शेतीची कामेही केली.

         प्रांजलने तिच्या सोबत्यांसोबत रायवळ आंब्याचे बाटे, फणसाच्या आठळ्या, शिवणीच्या बिया, जांभळाच्या बिया, चारोळ्यांच्या बिया गोळा केल्या. सगळ्या बिया तिच्या घराजवळच्या परड्यातल्या पडसार जमिनीत पेरल्या. पहिल्या पावसानंतर सगळ्या बियांना कोमल अंकुर आले. काही दिवसांतच त्यांची वीतभर उंचीची रोपे तयार झाली. आता प्रांजलने ठरवले की ही शेकडो बियांपासून अंकुरलेली शेकडो रोपे गावात कुठेही दिसेल त्या मोकळ्या बांधावर, वरकस जमिनीत लावायची. तिचे सारे सवंगडी या मोहीमेसाठी तयार झाले. खरे तर हा त्यांचा लहान तोंडी मोठा घासच म्हणायचा. पण जबरदस्त इच्छाशक्ती आणि उर्जा लाभलेला हा बालचमु या मोठ्ठया 'वृक्षारोपण' मोहीमेवर निघालाच. अर्थातच कोणीही मोठ्यांनी त्यांना विरोध केला नाही." आमच्या कुणग्यात कशाक गो लावतंस, आमच्या मळयेत लावू नको गो..." असेही कोणी म्हटले नाही. कुदळ, खोरे आणि घमेल्यात रोपे घेऊन या मुलांनी मनावर घेतलेली वृक्षारोपण मोहीम फत्ते केली. तसे पाहिले तर मोठ्यांच्या छोट्या कामांचेही फार कौतुक होते. त्यांना प्रसिद्धीही लाभते. मात्र छोट्यांच्या अशा एखाद्या 'मोठ्ठया' कामाकडे अनेकदा दुर्लक्ष होते, कधी डोळेझाकही होते. या कामात मोठ्या माणसांची अजिबात मदत न घेता या बालचमुने यंदा असे शेकडो रोपांचे 'रोपण' केले आहे. या चिमुकल्यांना खरेतर कोणी असे करायला सांगितले नाही. मात्र तरीही यांना एवढे शहाणपण येते कुठून याचे कौतुक वाटते. 


        गेल्या काही वर्षांपासून कोकणात बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. गृहनिर्माण प्रकल्प, चौपदरी महामार्ग वा इतर कारणांसाठी हिरवेगार डोंगर उजाड करून भुईसपाट केले जात आहेत. हिरवाई, वृक्षराजी, वनराई आता संपल्यातच जमा आहे. ठिकठिकाणी वृक्षतोड व सपाटीकरण, उत्खनन केल्याने जमिनीचा घट्टपणा आता कमकुवत झाला आहे. त्यामुळेच ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढले आहे. आता लवकर, अकालीच भरपूर फळे देणाऱ्या बुटक्या झाडांची लागवड केली जात असल्याने पुर्वीचे जुनाट आम्रवृक्ष, फणस कोठे दिसत नाहीत. पर्यावरणाचे उचित संतुलन राखण्यासाठी खरेतर अशा दीर्घायुषी वृक्षांची गरज आहे. मात्र मोठ्या माणसांना याचे भानच नाही हे जेव्हा लहानग्यांच्या लक्षात आले तेव्हा अशा चिमुकल्यांनी असे 'वृक्षारोपण' करण्याची मोहीम सुरु केली आहे. चिमुकल्यांच्या या चिमुकल्या धडपडीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या