कनेडी : ( प्रतिनिधी : मिलिंद डोंगरे) मित्र-मैत्रिणींचे आपल्या जीवनात काय महत्व आहे आणि बालपणीचे मित्र-मैत्रिणी एकत्र आल्यानंतर एक सकारात्मक नवऊर्जा देऊन जातात व नवचैतन्याचा अविष्कार कसा होतो याचा प्रत्यय मुलुंड येथे आयोजित केलेल्या कनेडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कनेडी-सांगवे विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळाव्यात आला. त्यावेळी माजी व आजी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावेळी श्री.मसुरकर सरांचे निवेदन, तेजश्री व चैतन्यचे सुत्रसंचालन प्रशंवसनीय होते. "गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवु हा पुढे वारसा" ह्या गीता प्रमाणे त्याच शाळेतुन शिक्षण घेतलेले शिक्षक सुमंत दळवी शाळेला मुख्याध्यापक म्हणुन लाभले. अध्यक्ष सतिश सावंत व इतर मान्यवरांच्या मोलाच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळेचे पहिले विद्यार्थी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन लाभले. उच्च शिक्षित असलेले जेष्ठ माजी विद्यार्थी अशोक देवजी सावंत यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
त्यांच्यामुळेच माध्यमिक विद्यामंदिरमधील जेष्ठ उच्चशिक्षितांची माहिती नव्या पिढीला मिळाली. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाची सुरूवात गणेश वंदनेने केली. मंगळागौर पासुन लावणी पर्यंत व धनगरनृत्य पासुन शिवराज्याभिषेक पर्यंत सर्वच सादरीकरण अप्रतिम होते. नृत्य सादर होत असताना मुलांनी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी खुप मेहनत घेतली हे लक्षात येत होते. या कार्यक्रमात शिवाजी सावंत यांनी भिरवंडेकर मराठा समाजाच्या महिला कलामंचला संधी दिली. गीतकार, संगीतकार व ध्वनीमुद्रक श्रीकृष्ण सावंत यांच्या गीताला भिरवंडेकर महिला कलामंचच्या सौ.रंजना, साक्षी, उज्वला व शुभांगी यांच्या सुमधूर स्वरात स्वरबद्ध केलेल शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे गीत सादर केले.
माजी विद्यार्थीनी कल्याणी, स्नेहल, संजिवनी व शिल्पा यांनी व आजी विद्यार्थ्यींनी सहभागी झाल्या होत्या. भिरवंडेकर महिला कलामंचने कोकणच सौदर्य व संपन्नता दर्शवणार दुस-या एका गीतावर बहारदार नृत्य सादर केले. त्याचे नृत्य दिग्दर्शन सौ.उज्वला यांनी केले. या नृत्य सादरीकरणात दिपाली, शुभांगी, कल्याणी, उज्वला, राजश्री, अस्मिता, सुचिता, स्नेहल, अक्षया, मंजिरी, भक्ती, कविता, सुप्रिया, ज्योती, संजीवनी, निधी, मिनाक्षी, प्रज्ञा, शिल्पा, सुनिता, स्वाती, निहारीका या सहभागी झाल्या होत्या.
आजच्या धकाधकीच्या जीवनात एक समाधानकारक संगितमय सहवास हे मित्र-मैत्रिणीच देऊ शकतात, याचा सुखद अनुभव मुलुंडच्या मराठा सभागृहात अनेकांनी घेतला. आठवणींच्या या सुखद गारव्यात कनेडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कनेडी-सांगवे विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.
0 टिप्पण्या