सिंधुवैभव साहित्य समूह आणि अनादी मी अनंत मी, सामाजिक मंच , कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन व्याख्यान.

 बाबासाहेब सर्व समाजाचे उद्धारकर्ते



डॉ चंद्रकांत पुरळकर.



सिंधुवैभव साहित्य समूह आणि अनादी मी अनंत मी, सामाजिक मंच , कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  ऑनलाईन व्याख्यान.


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त सिंधुवैभव साहित्य समूह आणि अनादी मी अनंत मी, सामाजिक मंच , कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात " बाबासाहेब हे केवळ दलितांचे कैवारी नसून सर्व समाजाचे, तळागाळातील व्यक्तींचे उद्धार कर्ते होते. त्यांनी सामान्य माणसाला देशाचे नायक बनवले"  असे प्रतिपादन प्रसिद्ध धन्वंतरी डॉ चंद्रकांत पुरळकर यांनी केले.


माणूस हा केंद्रबिंदू मानून अगदी तळाच्या माणसासाठी बाबासाहेबानी काम केले. केवळ दलितांचे कैवारी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बसलेला शिक्का हा चुकीचा असून ही प्रतिमा सुधारायचा फारसा प्रयत्न झाला नाही, हे दुःखद आहे. 


लोकशाही म्हणजे केवळ निवडणूक नसून संविधानाची प्रास्ताविका हे बाबासाहेब यांनी देशाला दिलेले मूलभूत तत्वज्ञान आहे. संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये लिहून बाबासाहेबानी सामान्य माणसाला देशाचे नायक बनवले. श्रीमंत किंवा गरीब, शिक्षित किंवा अशिक्षित, स्त्री किंवा पुरुष यांच्या मताला त्यांनी सारखी किंमत दिली.


बाबासाहेबांच्या कार्यामुळे स्त्रिया, कामगार तसेच बहुसंख्य जनतेला चांगले दिवस आले. तरीही हा वर्ग बाबासाहेबांचे नाव घेताना दिसत नाही, ही खंत डॉ चंद्रकांत पुरळकर यांनी व्यक्त केली.


बाबासाहेब हे व्यक्ती नसून जगण्याचे तत्वज्ञान आहे, माणुसकीचा विचार आहे. शोषित वंचितांच्या उत्थानाचा विचार आहे. 


बाबासाहेबांचा विचार हा संपूर्ण मानवतेला कवेत घेणारा विचार आहे. जात, धर्म आणि देश यापलीकडे जाणारा हा मानवतेचा विचार आहे. हे समतेचे, स्वातंत्र्याचे, करुणेचे तत्वज्ञान आहे. 


आजही दुर्दैवाने आपण माणसाकडे केवळ माणूस म्हणून पाहत नाही. त्याच्या आडनावात आपल्याला जास्त रस असतो.  " थेट माणसाकडे जावे असा रस्ताच नाही मित्रा. तू आंबेडकर चौकात थांब. तुला प्रत्येक माणूस स्पष्ट दिसेल! " अशी प्रा सिद्धार्थ तांबे यांची कविता त्यांनी उद्धृत केली. 


माणसाला माणसाशी जोडणारे तत्वज्ञान, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजेच आंबेडकरवाद आहे. हा माणुसकीचा विचार सर्व ठिकाणी पोचण्याची फार गरज आहे. हीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली असेल असे सांगून त्यांनी आपले व्याख्यान संपवले.


डॉ चंद्रकांत पुरलकर हे कणकवली तसेच कोळोशी पंचक्रोशी इथे वैद्यकीय आणि आहारतज्ञ म्हणून सेवा देतात. क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात सुध्दा त्यांचा मोठा वावर आहे.


सदर व्याख्यानासाठी अनादी मी अनंत मी सामाजिक मंच कणकवली आणि सिंधूवैभव साहित्य समूह कणकवली यांचे शुभांगी पवार, स्नेहलता राणे सरंगले, डॉ सतीश पवार तसेच नामानंद मोडक, स्वामी आर्ट स्टुडिओ  यांनी मेहनत घेतली. हे व्याख्यान फेसबुक आणि YouTube वर उपलब्ध आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या