वार्ताहर ( नवी मुंबई ) सुभाष हांडे देशमुख :
नवी मुंबई : नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विद्यमाने जागतिक महिला दिन रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी संघाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फेसकॉम आणि आयस्कॉन चे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात उद्योजिका श्रीमती साधनाताई वझे या
प्रमुख अतिथी तसेच शिक्षणतज्ञ मीना ताई कुलकर्णी या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रसंगी व्यासपीठावर बालरोगतज्ञ डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर तसेच विद्या भवन शाळेचे डायरेक्टर दिनेश मिसाळ उपस्थित होते.
श्रीमती अपर्णा दाबके आणि सह गायिकांच्या स्वागत गीताने सुरू झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रेरणास्थान आदरणीय स्व .डॉक्टर किंजवडेकर यांना त्यांच्या जयंती निमित्त प्रथम आदरांजली वाहण्यात आली.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांनी आपल्या प्रस्ताविकात संघातर्फे जागतिक महिला दिन २०११ सालापासून नियमित साजरा केला जात असल्याची माहिती देऊन संघ करीत असलेल्या कामाचा सखोल आढावा घेतला.
या समारंभात विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या नव्या मुंबईतील श्रीमती छाया ढेरे, रेखा अरविंद वाळवेकर, सुशीला अण्णासाहेब टेकाळे, प्रिया प्रवीण घेवडे, शुभांगी मालुसरे, मंजू गुप्ता, उषा रेणके, यश मेहरा आणि सोनिया गुप्ता आदी कर्तबगार महिलांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते "हिरकणी " पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मंचावर उपस्थित मान्यवरांनी "हिरकणी " पुरस्कार प्राप्त महिलांच्या कर्तृत्वाचे कौतुक करुन महिलांच्या विविध विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
संघाचे सचिव श्री दीपक दिघे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर गुमास्ते आणि श्रीमती रजनी कलोसे यांनी नेटकेपणाने केले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
------------------------------------

.jpeg)
0 टिप्पण्या