नवी मुंबई: नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघ आपल्या सभासदांसाठी, सातत्याने ज्येष्ठांचे प्रबोधन व्हावे, त्यांच्या सुप्त कलागुणांना अधिक वाव मिळावा म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक, सामाजिक, स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. त्याचबरोबर विविध विषयावर मान्यवरांची व्याख्याने, सदस्यांचे वाढदिवस साजरे करणे, विविध तज्ञ डॉक्टरांबरोबरच गरजूंना वैद्यकीय उपकरणे मोफत उपलब्ध करून देऊन ज्येष्ठांना शारीरिक मानसिक आधार देणे. अशा प्रकारचे उपक्रम सतत राबवीत असते.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणजे नेहमीप्रमाणे ज्येष्ठांना एकत्र करून, त्यांना नैसर्गिक स्थळी नेऊन त्यांच्या जीवनातील आनंद अधिक द्विगुणित करण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांच्यासाठी रायगड जिल्ह्यातील खालापूर मधील मेंटेरिया रिसॉर्ट येथील आयोजित केलेला आनंद मेळावा होय.
रविवार दिनांक २५/०२/२०२४ रोजी ज्येष्ठ नागरिक संघ, नेरुळनी नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केलेल्या, अतिशय सुंदर आणि रम्य अशा "मोंटेरिया रिसाॅर्ट" खालापूर येथील सहलीत ९० ज्येष्ठ महिला व पुरुष सहभागी झाले होते. कार्यकारी मंडळाने सभासदांसाठी दोन आरामबसची अतिशय उत्तम व्यवस्था केली होती. मोंटेरिया रिसाॅर्ट येथे सकाळी ९-३० वाजता पोहोचल्यावर सर्व ज्येष्ठ नागरिक सभासदांनी "मोंटेरिया रिसाॅर्ट" चा उत्कृष्ट चविष्ट नाष्टा घेऊन तेथील सुंदर जलतरण तलावात (स्विमिंग पूल) मध्ये पोहोण्याचा, रेन डान्सचा तसेच काही ॲडव्हेंचर गेम्सचा मनसोक्त आनंद घेतला.
संघाचे गायक कलाकार श्री. सोमशेखर आणि त्यांचे गायक सभासद यांनी सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत सहलीस आलेल्या आपल्या सभासदांना सुंदर सुंदर गाणी गाऊन मंत्रमुग्ध केले आणि सर्वांना जणू आनंदाची मेजवानीच दिली.
रिसॉर्टच्या हाॅलमधील गाण्यांचा कार्यक्रम इतका रंगतदार झाला आणि रंगात आला होता की ज्येष्ठ नागरिक सभासद उत्स्फूर्तपणे प्रत्येक गाण्याला अगदी मनसोक्त दाद देऊन, नाच करुन फक्त आणि फक्त आनंद घेऊन सहलीची मजा लुटत होते. विशेष म्हणजे अगदी वयाची ८० वर्षे पार केलेल्या जेष्ठांनीही आपल्या वयाचा विचार न करता यामध्ये सहभाग घेतला. सहलीस आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी "मोंटेरिया रिसाॅर्ट" मधील मोठ्या एसी हाॅलमध्ये दुपारी सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला.
या आनंद मेळ्यात संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य सर्वस्वी अरविंद वाळवेकर, प्रभाकर गुमास्ते, रणजित दिक्षित, नंदलाल बॅनर्जी, दीपक दिघे, अंकुश हाडवळे, अजय माढेकर, विजय सावंत, दत्ताराम आंब्रे, दत्तात्रय म्हात्रे, सुनिल आचरेकर, श्रीमती कल्पना मोहिते यांनी संगीत खुर्ची, बम बार्डींग, चेंडू पास करणे, ॲक्शन करणे असे विविध प्रकारचे हाॅलमधील गेम घेऊन सहलीस आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांमध्ये चैतन्य, उत्साह व आनंद निर्माण करुन तो सतत तेवत ठेवला.
असा ह्या मोंटेरिया रिसाॅर्ट सहलीचा दिवसभर आगळावेगळा सुंदर अनुभव सर्व ज्येष्ठ नागरिक संघ, नेरूळच्या सभासदांनी घेऊन, ही गोड आठवण हृदयात ठेवून सायंकाळी नेरुळकडे प्रयाण केले.
सुभाष हांडे देशमुख
नेरुळ
-----------------------------------

.jpeg)
.jpeg)

0 टिप्पण्या