राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्यावतीने अवयवदान जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन

 



राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्यावतीने अवयवदान जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन


प्रतिनिधी ( नवी मुंबई ) सुभाष हांडे देशमुख:


नवी मुंबई : राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या विद्यमाने कोल्हापूर येथील आंतरभारती शिक्षण मंडळ उत्तूर संस्थेच्या अंतर्गत असलेल्या उत्तूर विद्यालय व ज्युनियर कॉलेज उत्तूरच्या सभागृहात शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी अवयवदान जनजागृती अभियान विद्यालयाचे मुख्याध्यापक शैलेंद्र आमणगी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात पार पडले. कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून यशोदर्शन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश अग्रवाल लाभले होते. प्रसंगी फाउंडेशनच्या संचालिका सौ.  रेखा बिरंजे तसेच सर्वश्री संदीप बादरे,  इंद्रजीत बंदसोडे, श्रीमती कविता व्हनबट्टे , श्रीमती लता तरवडेकर आदी शिक्षकवृंद तसेच कर्मचारी वर्ग आणि सुमारे २५० विद्यार्थी उपस्थित होते.


उपस्थितांना मार्गदर्शन करताना योगेश अग्रवाल म्हणाले की, मोठी स्वप्ने साकारण्यासाठी योग्य पावले उचलावी लागतात. श्रम घ्यावे लागतात. तरच ती स्वप्ने सत्यात उतरतात. आगामी काळात भारताला आर्थिक महासत्ता बनवायचे असेल तर, आजची युवा पिढी कुशल व सक्षम होणे गरजेचे आहे. यासाठी मोठी स्वप्ने पाहायला हवीत, पण त्यासाठी आधी पाया भक्कम असावा लागतो. शाळांमध्येच जर शिक्षणाचा दर्जा, व्यक्तिगत आणि सर्वांगीण जडणघडण होत असेल तर, त्या शाळेतील सर्व शिक्षकवृंदांचे आभार हे मानावेच लागतात. अशाप्रकारे सातत्याने समाजातील सर्वच घटकांप्रती कृतज्ञता जोपासत तसेच विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित, भावी पिढी आदर्शवत करण्याचे कार्य आंतरभारती शिक्षण मंडळ यांच्या माध्यमातून उत्तूर विद्यालय व जूनिअर कॉलेजच्यावतीने घडत आहे, असे प्रशंसोद्गार काढून ते पुढे म्हणाले की, द ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन मुंबई, यशोदर्शन फाउंडेशन, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचेवतीने सातत्याने समाजप्रबोधनाचे व लोकहिताचे विविध उपक्रम आयोजित केले जातात. 




 याच उपक्रमाचा एक भाग म्हणून अवयवदान, त्वचादान, देहदान, नेत्रदान, रक्तदान हे दान करणे सद्यस्थितीत किती महत्त्वाची आहे, याचे महत्त्व जाणून अवयवदान विषयावर जनजागृत्तीचे व्याख्यान आज आयोजित करण्यात आले आहे.


कोणत्याही प्रकारे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे अवयव किंवा मृतदेह यांचा मानवी कल्याणासाठी उपयोग करता येतो. त्यामुळे प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विशेषतः वारस नातेवाईकांनी जर अवयवदान व देहदान यास संमती दिली तर, अनेक रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती योगेश अग्रवाल यांनी देऊन उपस्थित सर्वांचेच प्रबोधन केले. आजपर्यंत फाउंडेशनच्या माध्यमातून अवयवदान व देहदान याबाबत व्याख्याने, पथनाट्ये, पदयात्रा व मेळावे घेऊन जनजागृती केली असल्याची महत्त्वपूर्ण माहिती विषद केली व यापुढील काळात जनजागृतीसाठी कटिबध्द असलेचे अभिवचन दिले. 



यावेळी कॉलेजचे प्राचार्य शैलेंद्र आमणगी यांनी राज्य व केंद्र सरकार संपूर्ण देशात जनतेच्या आरोग्याशी निगडित अनेक योजनांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत असून आपणही त्यांना चांगला प्रतिसाद देणे आवश्यक असलेचे सांगितले. मरावे परी, अवयवरूपी उरावे ! याप्रमाणे आज देशासमोर अवयवदान व देहदानाच्या माध्यमातून ज्या गंभीर समस्या उभ्या राहिलेल्या आहेत, याबाबत सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सामाजिक संस्था तसेच समाजातील सर्वच घटकांनी  सहकार्य करून ही चळवळ जनताभिमुख होणेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. आंतरभारती शिक्षण संस्था प्रणीत उत्तूर विद्यालय व ज्यूनिअर कॉलेजच्यावतीने सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नती व प्रगती करीता नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना बाहेरील जगाचे आकलन व्हावे व त्यांची मजबूत जडण घडण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सांगितले.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्यावतीने योगेश अग्रवाल यांचा प्राचार्य शैलेंद्र आमणगी यांच्या हस्ते पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजीराव एकशिंगे यांनी केले तर, आभार सौ. उमराणी जाधव यांनी मानले. अवयवदान विषयक चळवळीवर आधारीत प्रतिज्ञा घेवून सदर व्याख्यानाची सांगता झाली. 


सदर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे नियोजन राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी उत्कृष्टपणे केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या