अवयवदान चळवळ उभी राहणे राहणे महत्वाचे आहे-रविराज इळवे
------------------------------------------
मुंबई : (वार्ताहर)
नॅशनल सर्व्हिस स्कीम डायरेक्टोरेट, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र, V 4 ऑर्गन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या पुढाकाराने अवयवदान जनजागृती ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे झूम मिटद्वारे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करणेत आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी अवयवदान चळवळ उभी राहणे आवश्यक असून, आपण आपले अनमोल अवयव जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी ! चिरंतन ठेवले पाहिजेत असे प्रतिपादन केले. सध्या या चळवळीस अनुसरून ज्या अंधश्रद्धा आहेत त्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने सहकार्य केले जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली. यशोदर्शन फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी हेल्दी ऑर्गन डोनेशनसाठी सर्वांनी मिळून एकत्र काम करण्याचा संकल्प केला. हिरेश चौधरी यांनी अवयवदान चळवळीस प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र उपसमितीचे आधारस्तंभ डॉक्टर अरुण हळबे यांनी अवयवदान चळवळीचा इतिहास सांगून फॉर्म भरणे ते पुढील पिढीला त्याची माहिती होणेसाठी आपण कोणती काळजी घ्यायची याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉक्टर कुटे यांनी अशाप्रकारच्या कार्यक्रमांमुळे अवयवदान चळवळीस बळकटी मिळून रुग्णांना दिलासा मिळणार आहे मत व्यक्त केले. डॉ. मीरा यांनी देखील अशा कार्यक्रमातून अवयवदान चळवळ समाजात अधिक गतिमान होईल असा आशावाद व्यक्त केला. राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी जिल्हा, राज्य व देश पातळीवर समाजाप्रती कृतज्ञता जोपासत राज्यभर सुरू असलेल्या कार्याचा आढावा सांगून कोल्हापूरमध्ये सातत्याने अवयवदान व देहदान चळवळीबाबत जनजागृती सुरु असलेची माहिती दिली. V4 ऑर्गन फाउंडेशनचे आपटे काका यांनी आपण एकाच ईश्वराची लेकरे आहोत. फक्त नावे वेगवेगळी आहेत. इतरांना देणेत आनंद मानला पाहिजे तसेच उपस्थित सर्वांना अवयवदानावरती आधारीत कविता ऐकवून सर्वांनी या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भावनिक साद घातली. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात उपस्थितांची प्रश्नोत्तरे व शंकांचे निरसन करणेत आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपटे काका यांनी केले तर स्वागत व प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी केले. या ऑनलाइन कार्यक्रमासाठी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी, विविध कंपनींचे व्यवस्थापकीय अधिकारी, संघटना प्रतिनिधी, गुणवंत कामगार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व जिल्हा कार्याध्यक्ष व विभागीय प्रतिनिधी यांनी मेहनत घेतली. असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.


0 टिप्पण्या