शिंदे समर्थकांनी डोंबिवलीत काढली आनंदोत्सव रॅली


शिंदे समर्थक व शिवसैनिक यांच्यात जोरदार घोषणाबाजी


 

डोंबिवली  ( शंकर जाधव ) एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्याने डोंबिवलीतील शिंदे समर्थकांनी बुधवारी सायंकाळी आंदोत्सव रॅली काढून आनंद व्यक्त केला. या रॅलीच्या माध्यमातून शिंदे समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी काही शिंदे समर्थक डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोरील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शिवसैनिक आणि शिंदे समर्थक यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाल्याने थोडा वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती .डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेबाहेर विवेक खामकर, सतीश मोडक, अभय घाडीगांवकर,श्याम चौगुले, राजेंद्र सावंत, कविता गावंड, किरण मोंडकर,ममता घाडीगांवकर,शिल्पा मोरे, शुभदा देसाई आदीसह अनेक शिवसैनिकांनी शिवसेना शिवसेना , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगे बडो, आदित्य ठाकरे आगे बडो'अश्या घोषणा दिल्या.


     महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून प्रथमच ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्री पद लाभले आहे . दुसरीकडे शिवसेनामुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्ववादी  विचार  आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण जपणारे शिवसेनेचे  एकनाथ  शिंदे साहेब यांची  राज्याच्या मुख्यमंत्री पदी बहुमताने निवड झाल्याने शिंदे समर्थकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे .त्यांचा आनंद गगनात न मावणारा असल्याने बुधवारी शिंदे समर्थकांनी आनंदोत्सव रॅली काढली .डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानच्या मंदिरात जावून शिंदे समर्थकांनी मुख्यमंत्र्यांची पुढील कारकीर्द यशस्वी होण्यासाठी यावेळी गणरायाला साकडे घातले .त्यानंतर  गणेश मंदिर ते इंदिरा चौक पर्यंत ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली .


     या रॅलीत अनेकांनी हातात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे  यांचे फोटो घेऊन 'शिंदे साहेब आगे बढो'च्या घोषणा दिल्या. फडके रोड , मदन ठाकरे चौक, बाजीप्रभू चौक, इंदिरा गांधी चौक आदी ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. या रॅलीच्या समारोपाच्या वेळी काही शिंदे समर्थक शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोर असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यासाठी व अभिवादन करण्यासाठी गेले होते .त्यावेळी शिंदे समर्थक व शिवसेना शाखेबाहेर जमा झालेले शिवसैनिक यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली .त्यामुळे थोडावेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती .मात्र कोणीही एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्या नाहीत .प्रत्येक गट आपल्या नेत्याचा व पक्षाचा जयजयकार करीत होता .त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने हि घोषणाबाजी काही वेळातच थांबली . एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर राजेश कदम ,शरद गंभीरराव,सागर जेधे ,संतोष चव्हाण तसेच इतर पक्षातून आलेले माजी नगरसेवक  नितीन पाटील, रवी पाटील, रणजित जोशी, वृषाली जोशी, डॉ.सुनीता पाटील,  सुजित नलावडे, योगेश जुईकर, जतीन पाटील यांचा अपवाद वगळता अनेक नगरसेवक व शिवसेनेचे पदाधिकारी उघडपणे शिंदे यांचे समर्थन करण्यास  पुढे येत नव्हते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या