डोंबिवलीत पत्रकारावर हल्ला करणारे अटकेत, हल्ल्यामागील कारण अस्पष्ट
डोंबिवली ( शंकर जाधव ) गुरुवारी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कांदू यांच्यावर हल्ला करुन पसार झालेल्या चौघांना कल्याण गुन्हे अन्वेषन विभागाने दोन दिवसात शोधून अटक केली. यामध्ये एका तरुणीचाही समावेश असून दोन जण अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशाल उर्फ बबन खांडेकर, अमोल सावंत, श्याम उर्फ हिरु रेवणकर आणि किर्ती अमोलकर अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर श्याम उर्फ हिरू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ७ गुन्हे दाखल आहेत.कांदु यांच्यावरील हल्ला कोणत्या हेतूने करण्यात आला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
गुरूवारी दुपारी ३ च्या सुमारास श्रीराम कांदू यांच्या नामदेव पथावरील आरती स्वीट मार्टमध्ये 3 अज्ञात व्यक्तींनी घुसून दुकानाची नासधूस करत त्यांच्यावर हल्ला करत पळ काढला. यात कांदू जखमी झाले. या प्रकरणी टिळकनगर पोलिस आणि कल्याण गुन्हे अन्वेषन पथकाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक भूषण दायमा, पोलिस उपनिरिक्षक मोहन कळमकर, हवालदार बेलदार, माने, जरग यांच्या पथकाने सीसीटिव्ही व गुप्त बातमीदारामार्फत तपास करत विशाल, अमोल, श्याम, किर्ती यांना ठाणे व दिवा येथून अटक केली.अटक आरोपींनी घटनेची कबुली दिली असून यातील मुख्य आरोपी गौरव शर्मा याचाही सहभाग असल्याचे सांगितले. पोलिस त्याचाही शोध घेत असून त्याला अटक झाल्यानंतर या घटनेचे कारण उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले.
0 टिप्पण्या