शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन!

शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन!



आपल्या देशाच्या विकास प्रक्रियेत वृत्तपत्रांचे विशेषतः जिल्हा स्तरावरील वृत्तपत्रांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे ग्रामीण जीवनाशी वृत्तपत्रांचे अतूट नाते प्रस्थापित झाले आहे. वृत्तपत्रे आणि अन्य प्रसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांबाबत समाजात अत्यंत आदरभाव वृद्धिंगत होत आहे. पत्रकार कसा असतो? या बाबत सर्वांना औत्सुक्य असते.


आजचे पत्रकारितेचे विश्व म्हणजे सर्वत्र मंगलमय, चांगले, रोमहर्षक आहे, असे नव्हे. येथेही धंदा, स्पर्धा, डावपेच, कुरघोड्या यांना उधाण आले आहे. त्यामध्ये "ब्लॅकमेलिंग" चा किडारूपी 'करोना' फैलावत चालला आहे. त्याची मजल सुपारीबाज गुन्हेगार पाळून मनुष्यवधाच्या खेळी खेळण्यापर्यंत पोहचली आहे. पण आजच्या पत्रकारदिनी त्यावर चर्चा करणे औचित्यपूर्ण ठरणार नाही. 


पत्रकार कसा असतो? या विषयावर जगभरातील मान्यवरांनी खूप लिहिले आहे. अमेरिकेतील जेष्ठ पत्रकार जॉर्ज होएनबर्ग यांनी आपल्या, "प्रोफेशनल जर्नालिस्ट" या ग्रंथात पत्रकाराबाबत केलेले वर्णन पत्रकारिता क्षेत्रात एक मापदंड ठरले आहे.


आदरणीय जॉर्ज होएनबर्ग यांनी म्हटले आहे, "समाजजीवनाचा विचार करणारा पत्रकार शांतपणे-मंदपणे फिरत असतो. आपल्या हालचालींचा गाजावाजा करत नाही. बातमी मिळवण्याचे काम तो निमुटपणे करतो. प्रश्न विचारताना तो गैरलागू पल्हाळ करत नाही. नेमके प्रश्न विचारतो. भावी घटनांची अचूक अंदाज करण्याची कला त्याला साधलेली असते. प्रसंग कसे घडतील? कोणाची पावले कशी पडतील? त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया काय असतील? यांचा यथोचित अंदाज करण्याचे कसब त्याने आत्मसात केले असते. 


रोजची बातमी त्याच्या नजरेतून कधी सुटत नसते. वृत्तपत्रे, मासिके, नानाविध विषयांवरील पुस्तके, ग्रंथ वाचण्यात तो कधी कुचराई करत नाही. आकाशवाणी, दूरदर्शन वरील सर्व महत्वाची भाषणे, वृत्तांत तो कटाक्षाने ऐकतो. चालू घडामोडींवर त्याची बारीक नजर असते. त्याने अनेक विषयांचे ज्ञान मिळविलेले असते. ती चांगला बहुश्रुत असतो; एखादी बातमी मिळवताना, काय घडले? याचीच तो चौकशी करत नाही, तर जे काही घडले ते 'का घडले' याचाही तपास तो करतो आणि आता 'पुढे काय घडेल' याचीही चाचपणी तो करत असतो.


हा पत्रकार उद्योगी असतो, पण भलते सलते उद्योग करणारा नसतो, तो मर्मग्राही असतो, पण कोणावरही मर्मघात करणारा नसतो. तो सर्वांचा विश्वास संपादन करणारा असतो पण कोणाचा विश्वासघात करणारा नसतो. तो वस्तुस्थिती अचूक हेरणारा असतो पण कुडमुड्या ज्योतिषा सारखा होरा सांगणारा नसतो. तो विचारी असतो, पण बथ्थड नसतो. तो संशयखोर असतो, पण श्रद्धाहीन नसतो. तो कोणत्याही गोष्टीचा पूर्ण छडा लावणारा असतो, पण अकारण थकणारा नसतो. तो दमदार असतो पण कचखाऊ नसतो. तो गंभीर तर्कनिष्ठ असतो, पण वाचाळ बकवास करणारा नसतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, "त्याच्या अंगात घरंदाज आदरभाव , आतिथ्य शिलता, रीतिभातींची लीनता  असते, पण दारात अंथरलेल्या पाय पुसण्याची दीनता कधीही नसते!"


एखादी गोष्ट, घटना यांचा वृत्तांत सादर करून पत्रकाराचे काम संपत नसते. प्रसंगानुसार आणखी खूप काही करावे लागत असते. सर्वांच्या दैनंदिन जीवनातील एक मूलभूत प्रेरक शक्ती असे त्याचे स्वरूप असते. प्रचलित घडामोडी, उद्याचा वेध घेणाऱ्या कल्पना, शोध यांचा सर्वदूर प्रसार करणे, त्यांचे स्पष्टीकरण देणे आणि बऱ्याचदा तर त्या घटना, चळवळी-आंदोलन याना स्वतःच चालना देणे हे 'पत्रकार शक्ती' चे कार्य असते. त्याचा शब्द जिथपर्यंत जाऊन पोहचतो, तेथपर्यंतच्या क्षेत्रातील जनतेच्या मनावर अफाट नि अगणित प्रभाव तो गाजवीत असतो!


जॉर्ज होएनबर्ग हे थोर विचारवंत, तत्ववेते आणि द्रष्टे पत्रकार होते. त्यांचे सूक्ष्म निरीक्षण जगाच्या पाठीवरील कुठल्याही भागातील पत्रकारास लागू पडते. आपल्या आजूबाजूला असलेल्या पत्रकार बांधवास हे सर्व अलिखित नियम पाळून आपले काम करावे लागते. वरवर सोपी दिसणारी ही दिनचर्या किती अवघड आहे? याची जाणीव " जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे!" अशी आहे.


पत्रकारितेचा प्रवास प्रतिदिनी वेगवेगळी वळणे घेऊन चालू असतो. त्या प्रवासात पत्रकारास जे चांगले, मंगलमय भेटेल त्याचा शब्द सुमनांच्या हारांनी सत्कार करावा लागतो तर वाईट प्रवृत्तीवर शब्दांचेच प्रहार करून प्रतिकार करावा लागतो. थकल्या-भागल्या जीवांना शब्दांचाच दिलासा द्यावा लागतो. एखाद्या मुक्कामावर मोकळ्यावेळी क्रीडा, नाट्य, चित्र आदी सांस्कृतिक क्षेत्रात फेरफटका मारावा लागतो - तोही शब्दांचाच! मनशांती समाधानासाठी थोर संत, महात्मे, मोठी माणसे यांच्या शब्दांचेच चिंतन-मनन उपयोगी पडते. या अखंड प्रवासात उपजीविकेसाठी आधारभूत शब्दचच असता... मानधनाच्या रूपाने!


"शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन।

शब्द वाटू धनजन लोका।।"


संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे हे वचन म्हणजे पत्रकारितेच्या पाईकांची म्हणजे पत्रकारांची जीवन धारणा ठरली आहे. 


धन्यवाद!

- सुधाकर कराळे

देवळाली प्रवरा

९४२०९५१८८७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या