कसोटी कर्णधार म्हणून कोहलीचा वारसदार रोहीत शर्माच होणार ?
मागील सात वर्ष भारताच्या कसोटी संघाची धुरा वाहत असलेल्या विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर अचानक कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. वास्तवित विराटचे कसोटी कर्णधार म्हणून रेकॉर्ड अतिशय सुरेख असून या पराभवामुळे त्याचे कर्णधारपद काढून घेतले जाईल असे काहीही नव्हते. परंतु त्याने त्याच्या सदसद विवेक बुध्दीला पटला तो निर्णय घेऊन टाकला. विराटचे वय सध्या ३३ वर्ष असून आणखी तीन ते चार वर्ष तो आरामात खेळू शकतो, हा सारासार विचार करून तरूण खेळाडूंपैकी कोणालाही खास तयार केले नव्हते. त्यामुळे त्याच्या अवेळी नेतृत्व त्यागामुळे नवा कर्णधार नेमण्याचा मोठा यक्षप्रश्न निवड समितीसमोर ठाकला आहे.
विराटचा उत्तराधिकारी म्हणून जवळ जवळ सात खेळाडूंचे नावं समोर आले असून त्यावर निवड समितीच्या बैठकीत चर्चा होऊन एक जणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. तसे बघाल तर सध्या भारताचे कसोटी सामने लगेच नाहीत, मात्र फेबुवारी महिन्यात श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार असल्याने नवा संघनायक निवडून त्याला संघ बांधणीसाठी पुरेसा कालावधी देणेही गरजेचे असल्याने त्यासाठी निवड समितीनेही कंबर कसले असणारच !
ज्या सात खेळाडूंचे नावं पुढे आले असून त्यामध्ये रविंद्र जडेजा, रविचंद्रन आश्वीन, जसप्रित बुमराहा, अजिंक्य राहाणे, रिषभ पंत, के.एल राहुल व रोहीत शर्मा यांचा समावेश आहे. आता आपण प्रत्येक जणाच्या पात्रते विषयी थोडक्यात ऊहापोह घेऊ या !
रविंद्र जडेजा हा डावखुरा फलंदाज, दर्जेदार फिरकी गोलंदाज व शानदार क्षेत्ररक्षक असून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून क्रिकेटच्या तिनही प्रारूंपासाठी तो एक परफेक्ट पॅकेज आहे. मात्र त्याला राष्ट्रीय पातळीवर तसेच आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याचा काडीमात्र अनुभव नसल्याने चाळणीच्या पहिल्या फेरीतच त्याचे आव्हान संपणार असे वाटते.
दुसरे नाव येते ते भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्वीनचे. उपयुक्त फलंदाजी बरोबर तल्लख क्रिकेटींग ब्रेन ही त्याची खासीयत. पेशाने इंजिनियर असलेल्या आश्वीनने आयपीएलमध्ये पंजाबचे अपयशी नेतृत्व केले असून त्या अपयशानंतर पंजाबने त्याला संघातूनही वगळले होते. तापट स्वभाव असलेला आश्वीन भारतीय खेळपट्टयांवर कमालीचा यशस्वी असला तरी परदेशात त्याची कामगिरी असमाधानकारक आहे. त्यामुळे बाहेरच्या देशात गेल्यावर त्याला संघातच स्थान मिळणे मुश्किल असते. मग त्याला कर्णधार करणे हे अविवेकाचेच ठरेल.
तिसरे नाव पुढे येत आहे ते जसप्रित बुमराहाचे. हा जलदगती गोलंदाज त्याच्या चार वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत कमालीचा यशस्वी ठरला असून जगातील आघाडीच्या गोलंदाजात त्याची गणना होते. मात्र त्याने खेळलेल्या चोवीस पैकी केवळ दोनच सामने तो मायदेशात खेळला असल्याने तसेच त्याच्याही तंदुरूस्तीचा प्रश्न असल्याने तो तिनही प्रारूपांत खेळू शकेल का ? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्याकडे भावी कर्णधार म्हणून बघणे जरा अतिशोयक्तीचेच वाटते.
चौथे नाव येते अजिंक्य राहाणेचे. कोहलीच्या कार्यकाळात उपकर्णधार असलेल्या अजिंक्यने कोहलीच्या गैरहजेरीत सहा कसोटयात भारताचे नेतृत्व केले असून अपराजित राहाण्याचा पराक्रम त्याच्या नावे असल्याने कर्णधार पदासाठी तो प्रबळ दावेदार ठरतो. मात्र त्याचा फलंदाजीतील फॉर्म अतिशय खराब असल्याने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याकरीता त्याचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले होते. शिवाय तेथे तीन कसोटयात त्याची बॅट विशेष कामगिरी न करू शकल्याने सध्या तरी त्याच्या संघातील स्थानालाच धोका असल्यामुळे पात्रता असूनही कर्णधारपदाची माळ त्याच्या गळ्यात पडण्याची शक्यता बिलकुल दिसत नाही.
पाचवे नाव येते तरूण तडफदार व अतिउत्साही यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे. धुमकेतू सारखे कधीतरी फलंदाजीत चमकणे, बेजबाबदार फटके मारून बाद होणे. महत्वाच्या क्षणी झेल सोडणे. स्टंप्स मागे वायफळ बडबड करणे, विरोधी खेळाडूंना डिवचणे, तसेच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून म्हणावी इतकी लक्षवेधक कामगिरी नसणे. या बाबी त्याच्या विरोधात जाते. परंतु वय व शिकण्याची वृत्ती बघता तो भविष्यातील कर्णधार नक्कीच बनू शकतो. मात्र त्याला लगेच कसोटी कर्णधारपदा इतकी मोठी जबाबदारी लगेच मिळण्याची शक्यता कमी वाटते. परंतु उपकर्णधारपद देऊन त्याला नेतृत्व करण्याचा अनुभव जवळून घेता येऊ शकतो. मात्र सध्या ती शक्यताही नजरेच्या कक्षेत दिसत नाही.
सहावे नाव येते लोकेश राहुलचे. सहा महिन्यांपूर्वी कसोटी संघात स्थानही पक्के नसलेल्या राहुलला इंग्लंड दौऱ्यात शुभमन गिल व मयंक अग्रवाल जखमी झाल्यानंतर सलामीवीराची जबाबदारी मिळाली. तिचे त्याने दोन्ही हाताने सोने केले आणि बघता बघता त्याचे नशिब चांगलेच फळफळले. कोहलीने वनडे व टि-२० चे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहीत शर्मा सफेद चेंडूच्या खेळाचा कर्णधार बनला. तर उपकर्णधारपदाची माळ आपोआप राहुलच्या गळ्यात पडली. इतकेच नाही तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वनडेचा नियमीत कर्णधार रोहीत शर्मा दुखापतीमुळे जाऊ न शकल्याने राहुलकडे कर्णधारपद निसर्ग नियमाने चालत आले. शिवाय रोहीत शर्माच कसोटीचा उपकर्णधार नियुक्त केला गेला होता. परंतु त्याच्या अनुपलब्धतेमुळे कसोटीचे उपकर्णधारपदही त्याच्याकडे आपोआप चालत आले. एवढेच नाही तर वॉन्डरर्स येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत कर्णधार कोहली तथाकथीत पाठीच्या दुखण्याने खेळू न शकल्याने राहुलला कसोटी कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाली. दुर्देवाने तेथे नेतृत्व गुणात त्याचे पितळ उघडे पडले व भारत जिंकू शकणारा सामना हारला. शिवाय आयपीएलमध्ये पंजाबचे दोन वर्ष नेतृत्व केले असून तेथेही त्याच्या नेतृत्वात पंजाब एकदाही प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. फलंदाज म्हणून तो सध्या जोरदार फॉर्मात आहे. परंतु फलंदाजी व नेतृत्व या दोन वेगळ्या गोष्टी असल्याने लगेच त्याला कर्णधार बनविणे संघाच्या बिलकुल हिताचे नसेल. त्याला उपकर्णधार करून शिकण्याची संधी जरूर द्यावी. तसेच ती त्याला मिळणारच आहे कारण नशिब व त्याच्या कर्नाटक राज्याचा राहुल द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक असल्यामुळे सॉफ्ट कॉर्नर राहुलला मिळणार यात कुठलाच वाद नसेल.
शेवटचं नाव शिल्लक राहातं ते रोहीत शर्माचं. सध्या तो वनडे व टि२० चा नियमीत कर्णधार आहे. त्याचबरोबर तो कसोटीचा उपकर्णधारही आहे. तसेच तोच संघातील वयाने व अनुभवाने सर्वात वरिष्ठ व कर्णधारपदाचा अनुभव व गुणवत्ता असलेला खेळाडू असून फलंदाज म्हणूनही उत्कृष्ठ फॉर्मात आहे. त्यामुळे निसर्ग नियम त्यालाच कर्णधार बनवावे हेच सांगतो. सध्या तंदुरूस्तीच्या कारणामुळे तो संघाबाहेर असला तरी तो लवकरच फिट होऊन संघात परतेल. चौतीस वर्षीय रोहीत अजून किमान दोन ते तीन वर्ष सहज खेळू शकतो. त्यामुळे त्याच्या छत्रछायेत तरूण खेळाडू कर्णधार म्हणून तयार होऊ शकतात. त्यामुळे सध्या तरी नव्या खेळाडूकडे न जाता रोहीत कडेच तिनही संघांचे कर्णधार पद देणे फायदेशीर व सोयीस्कर ठरेल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.

0 टिप्पण्या