विक्रोळी टागोर नगर येथील महात्मा फुले रुग्णालयाचा अनागोंदी कारभार
मुंबई (प्रतिनिधी )विक्रोळी पूर्व टागोर नगर येथे क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचा अनागोंदी कारभार सुरू असून याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याने रुग्णालय प्रशासनाला विक्रोळी विभागातील मनसे कार्यकर्त्यांनी जाब विचारत अशी पुन्हा चूक झाली तर रुग्णालयाला टाळे ठोकू असा इशारा मनसे उपविभागप्रमुख किसन गांवकर वार्ड क्रमांक 118 चे अध्यक्ष जयंत दांडेकर व 119 चे वार्ड अध्यक्ष संतोष देसाई व अनेक मनसे सैनिकांनी दिला असल्याचे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे .
त्या संदर्भात अधिक माहिती अशी की विक्रोळी कन्नमवार नगर 2 लक्ष्मण रामचंद्र घाडगे( वय ८६) छातीत व अजून काही त्रास होता म्हणून त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी तपासणी करता महात्मा फुले रूग्णालय टागोर नगर येथे घेऊन गेले होते या रुग्णालयात त्यांची ईसीजी तपासणी व इतर व्यवस्थित तपासणी न करता त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचार करण्याचा सल्ला दिला. या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका ही आला त्यामुळे फुले रुग्णालयाचा दुर्लक्षित व अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
श्री घाडगे यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे ईसीजी तपासल्यावर समजले . ईसीजी मशीन व्यवस्थित असून सुद्धा त्यांच्यावर उपचार केला नसल्याचा आरोप करत नातेवाईकाने व मनसे कार्यकर्त्यांनी फुले रुग्णालय प्रशासनाचा जाहीर निषेध करत यापुढे अशा घटना घडल्यास रुग्णालयाला टाळे ठोकू असा इशारा ही निवेदना द्वारे मनसेचे वार्ड अध्यक्ष संतोष देसाई यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .

0 टिप्पण्या