हसन अली बनला पाकिस्तानमध्ये खलनायक !

 



                   सातव्या टि ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा झटका बसल्यानंतर पाकचे अंतिम फेरी गाठून विश्वचषक जिंकण्याचे दिवास्वप्न उध्ववस्त झाल्याने संपूर्ण पाकिस्तान शोकसागरात डुबले आहे. परंतु या सर्व वातावरणात पाकिस्तानी जनतेने या पराभवाचे सगळे खापर एकटया हसन अलीच्या माथी फोडून त्याला या पराभवाबद्दल अक्षरशः खलनायकच बनवून टाकले.

                 संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानचा संघ अपराजित असल्याने पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू, क्रिकेट पंडित व तेथील जनतेने पाकिस्तान विश्वविजेता बनणारच असे ग्रहीत धरून टाकले होते. त्यामुळे पाकिस्तानमध्ये हा पराभव प्रत्येकाच्या जिव्हारी लागला. या पराभवाने पाकमधील पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील अनेकांनी अन्नही वर्ज केले आहे तर बरेच जण आपल्या उद्योगधंद्यावरही जायला तयार नाहीत. तसे बघाल तर त्यांचंही खरंच आहे. त्याचं कारण म्हणजे पाकचा संघ या स्पर्धेच्या संभाव्य विजेत्यांमध्ये नव्हता. एवढेच नाही तर त्यांना पाकचा संघ उपांत्य फेरी गाठेल याचीही खात्री नव्हती परंतु भारताविरूद्ध मिळालेल्या अनपेक्षित विजयाने त्यांची लॉटरीच लागली, आत्मविश्वास वाढला व खेळात नवीन झळाळी आली. त्यानंतर पुढे त्यांचा खेळ कसा सुधारला हे आपण बघितले आहेच.

                 ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करून एकशे श्यहाहत्तर धावा फटकविल्या. शिवाय त्यांच्या गोलंदाजांनीही उत्कृष्ठ मारा करत कांगारूंचा अर्धा संघ स्वस्तात माघारी धाडल्याने पाकच बाजी मारेल असे चित्र होते. शिवाय शेवटच्या चार षटकात बासष्ठ धावांचे अवघड आव्हान कांगारूंसमोर होते.  एकोणाविसाव्या षटकात शाहिन आफ्रिदी गोलंदाजी करत असताना त्याच्या तिसऱ्या चेंडूवर डावखुऱ्या मॅथ्यू वेडने लेग साईडला हवेत फटका मारला व तो चेंडू थेट हसन अलीच्या हातात गेला, परंतु गोंधळलेला हसन तो चेंडू पकडू न शकल्याने झेल सुटला व त्यानंतरच्या तीनही चेंडूवर सलग तीन षटकार ठोकत मॅथ्यू वेडने सामना तर संपविलाच पण पाकचे अंतिम फेरीचे तिकीटही छाटले.

                   त्यानंतर पाक कर्णधार बाबर आझमने हसन अलीने सोडलेल्या त्या झेलालाच पराभवाचे कारण सांगितले आणि त्यानंतर हसन अलीला व्हिलन ठरविण्याची संधी कोणीही सोडली नाही. वास्तविक हसन अली या संपूर्ण स्पर्धेत फॉर्मातच नव्हता. त्यामुळे त्याला संघात निवडणेच चुक होते. शिवाय सर्वच सामन्यात त्याची वेगवान गोलंदाजी पूर्णपणे निस्तेज झाली. इतकेच नाही तर या सामन्यात त्याने नोबॉलच ही खिरापत वाटताना त्याच्या वाटयाच्या चार षटकात चव्वेचाळीस धावा दिल्या व त्याची बळींची पाटीही कोरीच होती.

                   हसन अली हा पाकचा प्रमुख वेगवान गोलंदाज व चांगल्या पैकी फलंदाजी करणारा खेळाडू असून या पूर्वी त्याने पाकला अनेक विजय मिळवून दिले आहेत. शिवाय सन दोन हजार सतरामध्ये भारताला हरवून चॅंपीयन्स ट्रॉफी जिंकलेल्या पाकच्या विजयाचा शिल्पकारही तोच होता. परंतु तो पाकिस्तानमध्ये तो हलक्या मानल्या जात असलेल्या शिया पंथाचा असल्यामुळे तो टिकाकारांच्या रोषाचा धनी बनला आहे. शिवाय त्याची पत्नी समिया आरजू ही भारतीय महिला असल्याने आगीत आणखी तेल पडले.

                       हसनच्या पत्नीला पाकिस्तानच्या काही महाभागांनी भारताची गुप्तचर संस्था रॉ ची सदस्य असल्याचाही जावईशोध लावत हसन अली मॅच फिक्सर असल्याच्या वल्गना केल्या आहेत. वास्तविक हसनने अनेक वेळा समाज माध्यमात भारत व भारतीय क्रिकेटवर जहरी ट्विटही केले आहेत.

                       झेल सुटणे - पकडणे हा खेळाचा भाग असून त्यावर खेळाडू कोणत्याही देशाचा असो ते खेळ भावनेनेच घ्यायला हवे. त्यामध्ये त्याच्या कुटुंबीयांना ओढणे चुकीचे असून हसनलाही तोच मापदंड लावला पाहिजे.

                        हसन अलीवर पाकमध्ये चोहोबाजूने टिका होत असली तरी भारतातील क्रिकेटशौकिन, माजी क्रिकेटपटूंनी हसनच्या समर्थनार्थ मत दिले असून पाकचा माजी कर्णधार व वाचाळवीर शाहीद आफ्रिदीने हसनचे समर्थन करताना हसनकडून झेल सुटणे हा खेळाचा एक भाग असल्याचे सांगून त्याचा होणारा जावई शाहीन आफ्रिदीवरही त्याने सडकून टिका करताना हसनने झेल सोडल्यानंतर पुढील तीन चेंडू जर शाहीनने डोकं वापरून टाकले असते तर तीन षटकार बसले नसते व पर्यायाने सामना पाकिस्तान जिंकलेही असते असे म्हटले. 

                       याच स्पर्धेत पाककडून भारत पराभूत झाल्यानंतर काही लोकांनी मोहम्मद शमी मुस्लीम असल्याबद्दल त्याच्यावर चुकीच्या कमेंट केल्या होत्या. त्याचं पाक प्रसारमाध्यमांनी मोठं भांडवल बनवलं होतं आणि मग आता हसनला भारत धार्जिणा ठरवताना ते चुकीची मोजपट्टी वापरत आहे याच त्यांना भान नाही. हिंदू - मुस्लीम वाद चिघळवण्याची पाकची जुनी खोड क्रिकेटमध्येही सुरू असून ती थांबण्याची गरज आहे. कारण क्रिकेट हा खेळ आहे. त्याच्याकडे खेळ म्हणूनच बघितले गेले पाहिजे.




लेखक : -  

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

प्रतिनिधी भारत. 

Email:  dattavighave@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या