पाकिस्तानी खेळाडूंचा मुजोरपणा ; बांगलादेशात करत आहेत दादागिरी व मस्तवालपणा !
पाकिस्तान हा जागतिक क्रिकेटमधील एक प्रमुख संघ. अंतर्गत राजकारणामुळे गुणवत्ता असूनही हा संघ मागील दोन वर्षात विशेष चमक दाखवू शकला नाही. परंतु दोन महिन्यांपूर्वी माजी क्रिकेटपटू रमिज हसन रजा याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( पीसीबी ) चे अध्यक्षपद स्विकारले आणि त्याने पाक क्रिकेटच्या ढाच्यात अमलाग्र बदल करत टिम मॅनेजमेंट पासून ते संघातील खेळाडूंसह स्वतःच्या पसंतीचे लोक आणले व त्यांच्यातील सकारात्मक उर्जा जागृत करण्यासाठी अनेक प्रेरणादायी कार्यक्रम राबवून त्यांना खेळाकडेच एकाग्र राहाण्याचा मंत्र दिला.
या सर्व गोष्टींचा पाकिस्तानी खेळाडूंवर अतिशय मोठा प्रभाव पडला. मागील एकोणतीस वर्ष जे कोणत्याच पाकिस्तानी संघाला जमले नाही ते भारताला हरविण्याचं अति कठिण कार्य यावेळच्या पाकिस्तानी संघाने युएईत झालेल्या टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत करून दाखविले. या विजयाचा फायदा पाकिस्तानला इतका झाला की त्यांच्या संघाने त्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. मात्र तेथे विजेतेपद मिळविलेल्या ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत पाकला हरविले. मात्र एक वेळ रसातळाला गेलेल्या पाकने उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी केल्यामुळे पराभवानंतरही संघाला मायदेशात सहानुभूती मिळाली.
मात्र या शानदार कामगिरीमुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचा मस्तवालपणा चांगलाच वाढला. आपण जगातील सर्वोत्तम आहोत या आवेशात त्यांचे वागणे सुरू झाले. या स्पर्धेनंतर लगेचच पाकचा संघ एकेकाळी त्यांचाच भाग असलेल्या परंतु आता स्वतंत्र देश म्हणून गणल्या जाणाऱ्या बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला. तेथे तर पाकिस्तानने जग जिंकल्याप्रमाणे आपल्या राष्ट्रध्वजाचा उपयोग करायला सुरुवात केली. जगातला कोणताही संघ परदेश दौऱ्यावर करत नाही ती चुक पाकिस्तानने केली. संघाच्या सरावा दरम्यान पाक संघाने चक्क आपला भला मोठा राष्ट्रध्वज सराव स्थळी लावला. याचे तीव्र प्रतिसाद बांगलादेशमध्ये उमटले व तेथील लोकांनी पाकिस्तानी संघाला हाकलून देण्याची मागणी तेथील सरकारकडे केली. परंतु बांगलादेश सरकारने खिलाडूवृत्ती दाखवत पाकिस्तान संघावर कुठलीही कारवाई केली नाही.
या दोन संघात शुक्रवार व शनिवार या दोन दिवशी झालेले तीन टि- ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने पाकिस्तानने जिंकून बांगलादेशवर आपले वर्चस्व सिद्ध करत मालिकेत विजयी आघाडी घेतली. परंतु या दरम्यान पाकिस्तानी खेळाडूंनी आपल्यातील हिनवृत्तीचे विदारक दृश्य जगासमोर सादर करून स्वतःचेच हसे करून घेतले. इतकेच नाही तर क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसीलाही कारवाईचा बडगा उगरावा लागला.
शुक्रवारी झालेल्या पहिल्या टि- ट्वेंटी सामन्यात पाकच्या विजयात सामनावीर ठरलेल्या हसन अलीने आपल्या असभ्य वर्तनाने स्वतः बरोबरच पाकचीही नाचक्की करून टाकली. बांगलादेश फलंदाजी करत असताना हसन अलीने सतराव्या षटकाच्या सुरुवातीलाच बांगलादेशी फलंदाज नुरूल हसनला बाद केले. त्यानंतर नुरूल हसन तंबूत परत जात असताना हसन अलीने त्याच्याकडे बघत अश्लिल हावभाव केले. हसन अलीचे हे कृत्य आयसीसीचे कलम दोन पूर्णांक पाच ( २.५ ) चे उल्लंघन करणारे आहे. त्यासाठी आयसीसीने हसन अलीला एक डिमेरीट पाँईट दिला व एका सामन्याची बंदी घातली.
टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत रोहीत शर्मा, केएल राहुल व विराट कोहलीला बाद केल्यानंतर हवेत उडत असलेला शाहिन आफ्रिदी सध्या रागावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असून त्याचा दुष्परिणाम त्याच्या खेळावर होत आहे. शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहिन शहा आफ्रिदीने तर मुर्खपणाचा कळसच गाठला.
सामन्याच्या तिसऱ्या षटकात बांगलादेशी फलंदाज अफीफ हसनने आफ्रीदीच्या चेंडूवर जोरदार षटकार ठोकला. याचा आफ्रिदीला भयंकर राग आला. त्याच्या पुढच्या चेंडूला अफीफने सुरक्षात्मक पद्धतीने खेळून चेंडू सरळ तटवला व आपल्या क्रिझमध्येच उभा राहीला. मात्र गोलंदाज आफ्रिदीने जाणून बुजून चेंडू त्याच्याकडे जोरात फेकला. तो चेंडू लागताच फलंदाज आफिफ धाडकन खेळपट्टीवर कोसळला व वेदनेने विव्हळू लागला. त्यानंतर भले पाकिस्तानी खेळाडूंनी अफीफची चौकशी केली. मात्र आफ्रिदीचे वर्तन अतिशय घृणास्पद होते. आफ्रिदीचे नशिब इतके बलवत्तर की भडक माथ्याच्या बांगलादेशी खेळाडू व प्रेक्षकांनी त्याला फोडून काढला नाही. या दौऱ्यात एक ट्वेंटी व दोन कसोटी सामने अजून शिल्लक असून पुढे जर असे काही कृत्य पाकिस्तानी खेळाडूंकडून घडले तर त्यांची धडगत होणार नाही हे मात्र नक्की !
टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक क्षणी हसन अलीने आफ्रिदीच्या चेंडूवर मॅथ्यू वेडचा झेल सोडला होता. त्यानंतर आपल्या डोक्यावरचे नियंत्रण हरविलेल्या आफ्रिदीने नंतरचे तीन चेंडू स्वैर मारा केला व त्यावर वेडने सलग तीन षटकार ठोकत पाकच्या हातातील सामना ओढून नेला. यानंतर पाकमध्ये हसन व आफ्रीदी विषयी तीव्र प्रक्षोभ उठला होता. परंतु बांगलादेशमध्ये त्यांचा मस्तवाल पणा कमी होण्याचे नावच घेईना. आधीच मलीन असलेली पाकची इभ्रत घालविणाऱ्या या दोघांना पाकमध्ये गेल्यानंतर वेगळाच पाहुणचार भेटल्यास नवल मानू नये.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

0 टिप्पण्या