रोहीत शर्माने भारतीय क्रिकेटरसिकांचे स्वप्न पुर्ण करण्यास सुरुवात केली !
विराट कोहली भले कागदोपत्री भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असला तरी कोणत्याही कर्णधाराची खरी परीक्षा आयसीसीच्या स्पर्धात होते. जो पर्यंत असा कोणताही कर्णधार आयसीसी स्पर्धात यशस्वी होत नाही तो पर्यंत त्याच्या यशस्वीतेवर कोणीही शिक्का मारायला तयार होत नाही. तीच गत सन दोन हजार चौदापासून भारतीय संघाची व दोन हजार तेरापासून आयपीएल फ्रँचाईसी आरसीबीचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीची झाली. द्विपक्षीय मालिकांत कोहलीचे रेकॉर्ड जगभरातील अनेक कर्णधारांपेक्षा सरस आहे, परंतु आयसीसी स्पर्धांत त्याच्या नेतृत्वाची पाटी कोरीच राहीली. आयसीसी स्पर्धात सातत्याने अपयश येत असल्याने बीसीसीआयने विराट कोहलीला टि ट्वेटींच्या कर्णधारपदातून कार्यमुक्त केले व रोहित शर्माला त्या पदावर नियुक्त केले.
रोहित शर्मा हा कोहलीच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला. परंतु सुरुवातीच्या काळात त्याच्या खेळात सातत्याचा अभाव असल्याने त्याचे संघातील स्थान अस्थिर होते. परंतु सन दोन हजार तेराच्या चॅंपियन्स ट्रॉफीपासून त्याच्या नशिबाचे फासे पलटले. त्याच वर्षी तो आयपीएल फ्रँचायसी मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला. पाहता पाहता त्याने त्याच्या शांत स्वभाव, कल्पक नेतृत्व व आक्रमक खेळाच्या बळावर मुंबई इंडियन्सला विक्रमी पाच विजेतेपदे मिळवून दिले. तसेच वनडे व टि - ट्वेंटीमध्ये तो भारताचा उपकर्णधार असल्याने नियमीत कर्णधार कोहलीच्या गैरहजेरीत भारताचे नेतृत्व करताना आपल्या नेतृत्वगुणांची छाप पाडताना आशिया चषक, श्रीलंकेत निधास ट्रॉफी व द्विपक्षीय मालिकांत घवघवीत यश मिळवून दिले. जवळ जवळ ऐंशी टक्के इतकी त्याची यशाची सरासरी होती. त्यामुळे त्यालाच भारताचा सफेद चेंडूच्या खेळातील नियमीत कर्णधार करावे अशी मागणी जोर धरू लागली.
आपल्या संघ सहकाऱ्यांना हाताळण्याची योग्य पद्धत, संपूर्ण संघाला विश्वासात घेवून निर्णय घेणे, प्रत्येक खेळाडू कडून चांगली करून घेण्याची कला चांगल्या प्रकारे रोहितला अवगत असल्याने सर्वच खेळाडू त्याच्या हाकेला नेहमी साद देत असल्याने त्याची यशाची टक्केवारी कोहलीपेक्षा सरस आहे.
याच महिन्यात युएईत टि ट्वेंटी स्पर्धा विश्वचषक स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये टिम इंडिया साखळीतच गारद झाल्याने भारतीय क्रिकेट रसिकांचा मोठा हिरमोड झाला. त्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघात अमूलाग्र बदल केले. मुख्य प्रशिक्षक म्हणून चाणाक्ष राहुल द्रविडला आणले तर टिट्वेंटीचा कर्णधार रोहीत शर्माला केले. त्याचबरोबर राहुल द्रविडने आपल्या पसंतीचा सहाय्यक चमूही नियुक्त केला. तसेच अपयशी व अनफिट खेळाडूंना वगळले, वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला आणि नव्या दमाच्या खेळाडूंना संघात स्थान दिले.
टि ट्वेंटी स्पर्धा संपताच न्युझिलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला. प्रथम तीन सामन्यांची टि ट्वेंटी मालिका संपन्न झाली व त्यानंतर दोन कसोटींची मालिका होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ बिलकुल निष्प्रभ ठरल्याने व न्यूझिलंड संघ विश्वचषकात उप विजेता ठरल्याने नवा कर्णधार रोहित शर्मा पुढे आव्हान होते. परंतु रोहितने आपल्या सर्वांना समन्याय देण्याच्या पद्धतीचा अवलंब करत कल्पक नेतृत्व करताना फलंदाजीत शब्दशः आघाडीवर राहून संघाची धुरा वाहिली. तीनही सामन्यात त्याच्या बॅटने प्रतिपक्षाला फटकाराना टिम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. रोहीतने नवोदितांना प्रोत्साहीत करून त्यांच्याकडून श्रेष्ठ कामगिरी करून घेताना फलंदाजीत दोन्ही संघांकडून सर्वाधिक धावा जमविताना एकदा सामनावीर पुरस्कार मिळविला त्याचबरोबर मालिकावीराचा किताबही पटकविला. टि- ट्वेंटीमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनताना रोहीत सर्वाधिक अर्धशतके ठोकणारा जगातला अग्रक्रमाचा खेळाडूही बनला. शिवाय त्याच्या नेतृत्वात भारताला मायदेशात विरोधी संघाला मालिकेतील सर्व सामन्यात हरविण्याची कामगिरीही साधता आली. असा पराक्रम महेंद्रसिंग धोनी व विराट कोहलीलाही त्यांच्या नेतृत्व काळात जमला नव्हता.
एवढेच नाही तर रोहितचं नशिबही बलवत्तरच म्हणावं लागेल, कारण त्याने न्यूझिलंड विरूद्धच्या तीनही सामन्यात नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने मिळविला. रात्री होणाऱ्या सामन्यात दुसरे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दवाचा ( ड्यू ) चा त्रास होतो. परंतु तिसऱ्या सामन्यात रोहीतने नाणेफेक जिंकूनही प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत आपल्या गोलंदाजांना प्रतिकूल वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी दिली. रोहित सारखा निर्णय यापूर्वीचा भारताचा कर्णधार घेत नसल्याने विपरीत परिस्थितीत लढण्याचे बळ गोलंदाजांकडे नव्हते, याचा फटका विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान व न्यूझिलंड विरूध्द भारताला बसल्याने रोहितने त्या अनुभवातून बोध घेत कोलकात्यात धाडसी निर्णय घेतला.
रोहितचे हिच नेतृत्व शैली त्याला आतापर्यंत यशस्वी करत आली आहे. शिवाय भविष्यातही असेच भाग्य त्याला लाभो व गेली कित्येक वर्ष हुलकावणी देणारे आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद त्याच्या नेतृत्व भारताला मिळावे हि समस्त भारतीयांची अपेक्षा तो फलद्रुप करेल ! यासाठी त्याला शुभेच्छांसह हा लेख प्रपंच इथेच थांबवू या !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

0 टिप्पण्या