आयसीसी स्पर्धात अपयशी ठरणारी कोहली-शास्त्री जोडी झाली पडद्याआड !
प्रशिक्षक व कर्णधार म्हणून मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या रवी शास्त्री व विराट कोहली यांच्या एकत्रीत युगाचा अस्त झाला. सातव्या टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान व न्यूझिलंड या बलाढय संघाकडून पराभव पत्करावा लागल्याने टिम इंडियांचे आव्हान साखळीच समाप्त झाले हे आपणास माहिती आहेच. भारताने आपले शेवटचे तीन साखळी सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड व नामिबिया या तुलनेने दुबळ्या व कमजोर संघांविरूध्द लिलया जिंकून आपली धावगती ब गटातील इतर सहभागी संघापेक्षा सरस केली एवढेच एकमात्र समाधान या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना मिळाले.
सोमवारी नामिबिया या पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत स्थान मिळविलेल्या संघाविरूध्द भारताने आपला शेवटचा साखळी सामना खेळला. विश्वचषकाचे उपांत्य फेरीत खेळणारे संघ आधीच निश्चित झाल्यामुळे या सामन्याला कोणतेही महत्व नसल्याने भारत प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन संधी न मिळालेल्या इतर खेळाडूंना खेळवेल असे वाटत असताना केवळ राहुल चहारला संधी दिली व तीही नवोदित वरूण चक्रवर्तीच्या जागेवर ! भारताने आपली बेंच स्ट्रेंग्थ अजमावण्याची यामुळे मोठी संधी गमावली.
भारताचे फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा व रवीचंद्रन आश्विन यांनी प्रभावी मारा करत प्रत्येकी तीन बळी घेतले तर जसप्रित बुमराहाने दोन बळी घेत आपली जबाबदारी पार पाडली. तर फलंदाजीत केएल राहुल व रोहीत शर्माने व्यक्तीगत अर्धशतके झळकवित भारताला मजबूत सुरुवात करून दिली. तर सुर्यकुमार यादवनेही पंचवीस धावांची सुंदर खेळी केली. कर्णधार कोहलीने टि- ट्वेंटीतील आपल्या नेतृत्वातील शेवटच्या सामन्यात आपल्या नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला स्वतः न येता सुर्यकुमार यादवला पाठविल्याबद्दल त्याचे मोठे कौतुक झाले. मात्र या मागे शेवटच्या सामन्यात स्वतः अपयशी होऊ नये याचीही भिती कोहलीला असण्याची चर्चाही सुरू होती.
भारतीय संघाने कमजोर संघांविरुद्ध जो तडफदार खेळ केला त्यापेक्षा निम्मी तडफही पाकिस्तान व न्यूझिलंड विरुद्ध दाखविली असती तर भारताला नऊ वर्षानंतर प्रथमच आयसीसी स्पर्धेत सेमीफायनलच्या आधीच स्पर्धेतून बाद होण्याची वेळच आली नसती. चला आता वेळ निघून गेली आहे. त्यावर काथ्याकूट करण्यात आता काही अर्थही नाही.
आता राहुल द्रविडच्या रूपात टिम इंडियाला नवा प्रशिक्षक लाभणार असून रोहीत शर्मा सुरुवातीला टि ट्वेंटीचे नेतृत्व करताना दिसेल व त्याचबरोबर वनडेचीही जबाबदारी त्याच्याकडे येण्याची शक्यता आहे.
साठ वर्षीय रवी शास्त्री मागील चार वर्षांपासून सातत्याने भारतीय संघासोबत होते. त्या दरम्यान त्यांनी क्रिकेटच्या तीनही प्रारूपांत टिम इंडियाला देशांत व परदेशातही अलौकिक यश मिळवून दिले. त्यापैकी ऑस्ट्रेलियात सलग दोन मालिका जिंकण्याची अद्वितीय कामगिरीही समाविष्ठ आहे. मात्र त्यांच्या कालखंडात आयसीसी स्पर्धात आलेले अपयश त्या कामगिरीला गालबोट लावून गेले आहे.
कोरोना मुळे खेळाडूंना सतत जैव सुरक्षा कवच ( बायो बबल ) मध्ये राहावे लागत आहे. त्यामुळे खेळाडू मानसिक दृष्टया थकून गेले आहेत. खेळाडू म्हणजे मशिन नाहीत की, जे पेट्रोलवर चालतात. बीसीसीआयने आयपीएल व टि- ट्वेंटी वर्ल्ड कप दरम्यान अंतर ठेवायला पाहिजे होते. असे रवी शास्त्री यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी म्हंटले.
शास्त्रीबुवांचे हे म्हणणे तंतोतंत खरे आहे. पण ते एवढया मोठ्या अधिकार पदावर असताना या संदर्भात बीसीसीआयला का बोलले नाही. त्यांनी वेळीच बीसीसीआयला सांगितले असते तर कदाचित बीसीसीआयने त्यांच्या मताचा विचार केलाही असता. परंतु शास्त्रींनी गाडी गेल्यावर हात दाखविण्याप्रमाणे सर्व काही संपल्यानंतर आपल्या अपयशाची जबाबदारी झटकण्यासाठी बीसीसीआयवर ताशेरे ओढणे चुक आहे.
खेळाडूंनीही त्यांना मानसिक थकवा आला, बायो बबलमध्ये जीव गुदमरतो या बाबी बीसीसीआयला सांगणे गरजेचे होते. बीसीआयने त्यांच्या नियोजनात बदलही केला असता. परंतु खेळाडूंनाही आयपीएल व आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या माध्यमातून मिळणारा कोटयावधी रूपयांचा मोह आवरला कुठे ?
इंग्लंडच्या बेन स्टोक्सने ज्याप्रमाणे मानसिक थकवा आल्याचे सांगून मानसिक विश्रांतीसाठी अधिकृतपणे संघातून माघार घेतली. तशी भारतीय खेळाडूही घेऊ शकत होते. परंतु त्यांना पक्के ठाऊक आहे की, बीसीसीआयकडे नऊ हजारापेक्षा जास्त खेळाडू अधिकृतपणे नोंदणीकृत आहेत. बीसीसीआयने त्यातील काहींना संधी दिली व त्यांनी चांगली कामगिरी केली तर आपल्यासाठी टिम इंडियाचे दरवाजे कायमसाठी बंद होतील. म्हणून खेळाडूंनी केवळ वैयक्तीक स्वार्थासाठी देशाच्या मानसन्माचा बळी दिला व विश्वचषकात खेळले. त्यामुळे टिम इंडियाच्या विश्वचषकातील खराब कामगिरी व मानहानीकारक पराभवाला खेळाडू, प्रशिक्षक, कर्णधार व त्यांचे समर्थन करणारे विघ्नसंतोषी लोकच जबाबदार आहेत.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

0 टिप्पण्या