टि- ट्वेंटी विश्वचषकातील काही लक्षवेधी घटना !
युएईमध्ये सातवी टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन भारताकडे होते मात्र कोविड-१९ च्या गंभीर स्थितीमुळे ही स्पर्धा भारताऐवजी युएईत घेण्यात आली. विजेतेपदाच्या संभाव्य विजेत्यात अग्रस्थानी असलेली टिम इंडिया साखळीतच गारद झाली. हा या स्पर्धेचा सर्वात मोठा अजूबा होता. भारत पाकिस्तान व न्यूझिलंड विरूद्ध हरल्याने भारताचे आव्हान संपले परंतु याचा मोठा फटका आयसीसीच्या महसूल जमा होण्यालाही बसला. त्यानंतर वनडेत पाच वेळा विश्वकरंडक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने अंडर डॉग्ज बनून वर्ल्ड कप कॅनबेराला नेला. आता पुढच्या वर्षी हिच स्पर्धा त्यांच्या मायदेशात होणार असल्याने जेतेपद राखण्याची नामी संधी त्यांना उपलब्ध होणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या विजेतेपदासह अनेक लक्षवेधी घटना या स्पर्धेत घडल्या. टि ट्वेंटीचा प्रथमच विजेता बनलेल्या ऑस्ट्रेलियाने आपल्या विजयाचा जल्लोषही जरा अजब पद्धतीनेच साजरा केला. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने सर्वप्रथम स्वतःचा बूट काढून त्यात मद्य टाकून प्राशन केले. त्यानंतर मार्कस स्टोईनस, कर्णधार अरॉन फिंच व नंतर एक एक करून सगळ्यांनीच या अघोऱ्या व गलिच्छ पध्दतीचा अवलंब करत आनंद साजरा केला. ऑस्ट्रेलियात अति दुःख व आनंदाच्या क्षणी या पद्धतीने बुटात दारू टाकून पिण्याची प्रथा असल्याचे बोलले जाते.
मुख्य स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झालेेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात आयर्लंडचा वेगवान गोलंदाज कर्टिस कँम्फरने नेदरलँड विरूध्द हॅट्रीकसह सलग चार चेंडूवर चार फलंदाज बाद करत टि ट्वेंटी विश्वचषकात अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज बनला. तसे बघाल तर यापूर्वी टि- ट्वेंटीच्या सामन्यात राशिद खान व लसिथ मलिंगाच्या खात्यात असा पराक्रम जमा आहे.
या संपूर्ण स्पर्धेत जातीवाद व वर्णद्वेष यांच्याविरूध्द एकजूटता दाखविण्यासाठी सर्वांनीच सामन्यापूर्वी एक खास इशारा म्हणजे एका गुडघ्यावर बसून, छातीवर एक हात ठेवून किंवा एक हात उंचावून विशिष्ट काळ क्रिया केली. परंतु दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकने या पैकी कोणतीही क्रिया करण्यास नकार दिल्याने त्याला एका सामन्यातून वगळण्यात आले. त्यानंतर टिम मॅनेजमेंट व कर्णधार टेंबा बावुमा यांच्या सोबत डिकॉकने महाचर्चा केल्यानंतर सदर प्रकरणावर पडदा पडला व डिकॉक मुख्य प्रवाहात सामिल झाला.
न्यूझिलंडचा यष्टीरक्षक फलंदाज कॉनवे हा जगातला सर्वात मुर्ख माणूस सिद्ध झाला. संपूर्ण स्पर्धेत कॉनवेने आतिशय सुंदर फलंदाजी केली. त्या बळावरच न्यूझिलंडला अंतिम फेरीपर्यंत पोहोचणे शक्य झाले. परंतु याच कॉनवेने इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामन्यात सेहचाळीस धावांची शानदार खेळी केली असता महत्वाच्या क्षणी बाद झाला. त्यावेळी त्याने स्वतःवरच रागावताना बॅट स्वतःच्याच उजव्या हातावर मारली. नंतर वेदना होऊ लागल्याने त्याची तपासणी केली असता त्यात मोठे फ्रॅक्चर आढळले. त्यामुळे तो फायनल सामन्याला मुकला व अंतिम सामन्यात त्याच्या गैरहजेरीत वेगवान सुरुवात न झाल्याने न्यूझिलंडला पराभवाचा फटका बसला. शिवाय त्यामुळेच कॉनवेला आगामी भारत दौऱ्यावरही पाणी सोडावे लागणार आहे.
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी छातीत झालेल्या संसर्गामुळे ताप व वेदनांनी बेजार झाला असता त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. परंतु त्याची हालात बघता डॉक्टरांनी तो लवकर बरा होण्याबाबत सांशकता दाखविली. मात्र एका भारतीय डॉक्टरने जीवाचे रान करून रिझवानला खेळण्याइतपत तंदुरूस्त केले. त्यानंतर रिझवानने ६७ धावांची झुंजार खेळी करत पाकला समाधानकारक धावसंख्या उभी करण्यात महत्वाची भूमिका बजावली. मात्र सांघिक खेळ होऊ न शकल्याने पाकला पराभव स्विकारावा लागला.
वेस्ट इंडिजचे दोन प्रमुख खेळाडू ख्रिस गेल व ड्वेन ब्राव्हो आपली शेवटची टि- ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धा खेळले. ब्राव्होने तर या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. जगभर प्रसिद्ध असलेली हि जोडी ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या साखळी सामन्यात शेवटचे खेळले. त्या सामन्यात .सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत भावूक वातावरण होते.
श्रीलंकेचा मिस्ट्री स्पिनर वानेंदू हसरंगाने या स्पर्धेत आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. आठ सामन्यात सर्वाधिक सोळा बळी घेताना दक्षिण आफ्रिकेविरूध्द हॅट्रीक घेऊन त्याने आपली कलाबाजी दाखविली. मात्र श्रीलंकेला उपांत्य फेरीत पोहोचविण्यास त्याचे प्रयत्न अपुरे पडले. परंतु त्याचे भविष्य उज्वल असल्याचे संकेत यातून मिळाले आहे.
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोश बटलर या स्पर्धेत शतक ठोकणारा एकमेव खेळाडू ठरला. श्रीलंकेविरूद्ध अठ्ठेचाळीस धावात एकशे एक धावांची खेळी साकारताच बटलर क्रिकेटच्या तिनही प्रारूपांत शतक ठोकणारा पहिला इंग्लिश खेळाडू बनला.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

0 टिप्पण्या