संघांच्या कामगिरीचा आढावा.
सातवी टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा मुळतः भारतात होणार होती. परंतु स्पर्धेची अंतिम तारीख निश्चित होण्यापूर्वी भारतातील कोविड-१९ ची परिस्थिती किचकट असल्याने आयसीसीने ही स्पर्धा भारताच्याच संयोजनात युएईमध्ये घेण्याचे ठरविले. मग बीसीसीआयने आपल्या उत्तम संयोजनाद्वारे स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडली. हा बीसीसीआयचा नैतिक विजयच म्हणावा लागेल.
ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टि -ट्वेंटीचा विश्वचषक जिंकला. गेली चौदा वर्ष व सहा स्पर्धा प्रलंबित असलेले विजेतेपद मिळवून आपले एकंदर आठवे आयसीसी विजेतेपद मिळवित ऑस्ट्रेलियन क्रिकेट अद्यापही अव्वल दर्जाचे असल्याचे समस्त क्रिकेट जगताला दाखवून तर दिलेच शिवाय त्यांना कमजोर ठरविणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजनही घातले.
न्यूझिलंडचा संघ या स्पर्धेत उपविजेता ठरला. आयसीसीच्या मागील सहापैकी चार स्पर्धात अंतिम फेरी खेळण्याची अविश्वसनीय कामगिरी त्यांनी केली असली तर वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिप हिच त्यांची यशस्वी कामगिरी केली आहे. मात्र तीनदा ते फायनल हरले असले तरी त्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये आपला एक वेगळाच दरारा निर्माण केला आहे. एक गोष्ट मात्र नक्की की कोणतीही स्पर्धा असो वा द्विपक्षीय मालिका असो न्युझिलंडला येथून पुढे कोणीही हलक्यात घेणार नाही.
या स्पर्धेत पाकिस्तान भले विजेतेपद मिळवू शकले नाही मात्र त्यांनी उंपात्य फेरीपर्यंत जो तडफदार खेळ केला त्याने त्यांच्या प्रत्येक खेळाडूत आत्मविश्वास निर्माण तर केलाच शिवाय नैराश्य आलेल्या पाकिस्तान क्रिकेटला जणू नवसंजीवनीच दिली. पारंपारीक प्रतिस्पर्धी भारताची आयसीसी स्पर्धात पाकला हरविण्याची जी प्रथा मागील एकोणतीस वर्षांपासून सुरू होती ती पाकिस्तानने यंदा मोडीत काढत भारताला या स्पर्धेतून बाहेर काढण्यात महत्वाची भूमिका बजावली. हाच विजय पाकला नवीन उत्साह देऊन गेला.
इंग्लंड या स्पर्धेत सर्वांचा हॉट फेव्हरीट संघ होता. साखळीत इतर संघांपेक्षा उजवी कामगिरी करत त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजलही मारली. परंतु न्यूझिलंडचे आव्हान त्यांना पेलता न आल्याने त्यांचे विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न अंतिम सामन्यापूर्वीच उध्वस्त झाले. तरीही जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, जेसन राय( शेवटचा सामना ) यांच्या अनुपस्थितीत त्यांची कामगिरी चांगली झाली.
यजमान भारताला स्पर्धेपूर्वीच प्रत्येकाने विजेते ठरवून टाकले होते. तसेच सराव सामन्यात त्यांची कामगिरीही सरस होती. परंतु प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाली आणि त्यांच्या खेळाची लयच बिघडली. आपल्या गटातील प्रमुख संघ पाकिस्तान व न्यूझिलंड विरूध्द झालेले पराभव भारताचं स्पर्धेतील आव्हान संपविण्यास पुरेशे ठरले. या स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अमूलाग्र बदल करण्यात आले हे कदाचित भविष्यातील यशाची नांदीही ठरू शकतात.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाला कमनशिबीच म्हणावं लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद त्यांना सातत्याने हुलकावणी देत आहे. या स्पर्धेत अ गटात त्यांचे इंग्लंड व ऑस्ट्रेलिया इतकेच प्रत्येकी आठ गुण झाले होते परंतु सरासरीत ते कमी पडले आणि त्यांची उपांत्य फेरी हुकली. मर्यादित फौजफाट्यासह त्यांनी चांगली कामगिरी केली. हीच बाब त्यांना पुढे जात प्रेरणादायक ठरू शकते.
गतविजेता व विक्रमी दोन विजेतेपद मिळविलेल्या विंडीज संघात मोठमोठया नावाचे प्रभावशाली खेळाडू होते. परंतु त्यांची कामगिरी नाव मोठे लक्षण खोटया या उक्तीप्रमाणे झाल्याने स्पर्धेत एकच सामना जिंकता आला. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीचं तिकीट तर मिळालं नाहीच परंतु पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टिट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार नाही. कारण त्यांचं मानांकन घसरून नववे झाले आहे. आयसीसीच्या नियमानुसार विशिष्ट मुदतीपर्यंतच्या पहिल्या आठ संघानांच थेट प्रवेश मिळतो. आता विंडीजवर पात्रता फेरी खेळण्याची नौबत आली आहे.
हिच गत सन दोन हजार चौदाच्या विजेत्या श्रीलंका संघावर आली आहे. यंदाही ते पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत आले होते. तर पुढच्या स्पर्धेसाठीही त्यांना पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. परंतु या स्पर्धेतून त्यांना असलंका, निसंका व हसरंगा सारखे चमकदार खेळाडू मिळाल्याने त्यांना भविष्यात आशावादी राहाता येऊ शकते.
मायदेशात भल्याभल्या संघांना लोळविण्यासाठी स्वतःच्या सोयीच्या खेळपट्टया बनविणाऱ्या बांगलादेशचे पितळ युएईतील खेळपट्टयांवर उघडे पडल्याने त्यांची मोठी फजिती झाली. ठराविक खेळाडूंवर अवलंबून राहाणे त्यांना महागात पडले.
अफगाणिस्तानचा संघ प्रगतीकडे वाटचाल करत असून या स्पर्धेत त्यांच्या गटातील भारत, पाक व न्यूझिलंडविरूध्द ते पराजित झाले असले तरी त्यांची कामगिरी त्यांना पुढील वाटचालीस चालना देणारी अशीच आहे.
नामिबीया प्रथमच एवढया मोठया स्पर्धेत खेळत असले तरी त्यांचं भविष्य उज्वल असल्याचं त्यांच्या खेळावरून सिद्ध झालं. स्कॉटलंडला मात्र अजून खूप काही शिकावं लागणार आहे. तर पात्रता फेरीतच गारद झालेल्या आयर्लंडला आपला कसोटीचा दर्जा सांभाळण्यातही अपयश आले. पुढील स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी त्यांनाही खडतर प्रयत्न करावे लागणार आहेत.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

0 टिप्पण्या