उपांत्य फेरीतील पराभवाने संपूर्ण पाकिस्तान डुबले दुःख सागरात !

 उपांत्य फेरीतील पराभवाने संपूर्ण पाकिस्तान डुबले दुःख सागरात !



                  भारताला हरवल्यानंतर आभाळ ठेंगणं झालेल्या पाकिस्तानला टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने हरविले व धुमधडाक्यात अंतिम फेरी गाठली. येत्या रविवारी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा मुकाबला त्यांचा शेजारी देश न्यूझिलंडशी होणार आहे. किवीज संघाने पहिल्या उपांत्य सामन्यात विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार इंग्लंडला धुळ चारून बुधवारीच अंतिम फेरी गाठली आहे हे आपणास ज्ञात असेलच.

                  गुरूवारी झालेल्या एका रोमहर्षक सामन्यात हवेत उडत असलेल्या पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाने जमिनीवर आदळवल्यानंतर पाकिस्तानला भारताच्या पराभवाची किंमत समजली असेल. युएईत नाणेफेकीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले असून या निर्णायक सामन्यात कांगारूंच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला, परंतु पाकिस्तानच्या फलंदाजांनी सन्मानजनक धावसंख्या उभारून आपल्या गोलंदाजांना पाठबळ दिले खरे, परंतु लेगस्पिनर शादाब खान सोडून एकही गोलंदाज प्रभावी ठरला नाही.

                    रोहीत शर्मा व केएल राहुलचे बळी घेणारे दोन सर्वोत्तम चेंडू टाकल्यानंतर शाहिन आफ्रिदीचा टिआरपी वधारला होता. परंतु ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने आफ्रिदीला जोरदार तडाखा देत एकोणाविसाव्या षटकात सलग तीन षटकारांसह बावीस धावा कुटून आफ्रिदीच्या गर्वाचा फुगा फोडलाच शिवाय पाकिस्तानचाही नक्षा उतरविला.

                      पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी या सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षणाचा जणू परिपाठच केला. अनेक झेल सोडले, तीन वेळा धावबादच्या संधी गमावल्या. यातील दोनदा तर सामन्याला निर्णायक कलाटणी देणाऱ्या मॅथ्यू वेडलाच जीवदान दिले. यावरच मॅथू वेड नशिबवान ठरला नाही तर एकोणाविसाव्या षटकात हसन अलीने त्याचा हातातला झेल धरणी मातेला अर्पण केला. याच हसन अलीने अतिशय गचाळ गोलंदाजी करत नोबॉलची खिरापतच वाटली. कर्णधार बाबरसह समस्त पाकिस्तानी लोक हसनला या सामन्याचा खलनायक ठरवत असून काहींनी तर तो मॅच फिक्सर असल्याचे ठरवून त्याची कायदेशीर चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

                      एकोणतीस वर्षात बारा सामन्यानंतर विश्वचषक स्पर्धेत भारताला हरविल्यानंतर अखिल पाकिस्तानात जल्लोष केला गेला. त्यांच्या माजी खेळाडूंनी भारताची खिल्ली उडविण्याची कोणतीही संधी दवडली नाही. मिळेल त्या टिव्ही चॅनेलवर, युट्यूब चॅनेलवर , प्रसिध्दी माध्यमात भारताला कमी लेखणारे वक्तव्य करण्यात तेथील अनेक नामवंत खेळाडू सहभागी होते. त्यात प्रामुख्याने शोएब अख्तर, वकार युनुस, वासिम अक्रम, इंझमाम उल हक, मिसबाह उल हक व इतर अनेक जणांचा समावेश होता. यातील वकार युनुसने तर याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करून आपली खरी लायकीही दाखविली. भारतातल्या प्रसिध्दी माध्यमात, मार्केटमध्ये स्वतःचे काळे चेहरे नकली बुरखा घालून चमकवणारे व पैसा कमावणारे शोएब अख्तर, वकार युनुस सारखे महाभाग तर एका टिव्ही चॅनेलच्या लाईव्ह शोमध्ये अक्षरशः नाचत होते.

                      मोहम्मद अमिर सारखा मॅच फिक्सर भारताच्या हरभजन सिंगशी सोशल मिडीयावर जुगलबंदी करत होता तेंव्हा हरभजनने त्याची असली लायकी दाखविल्या नंतर तो जमीनीवर आदळला. जवळजवळ पंधरा दिवस पाकमध्ये भारतावरील विजयाचा जल्लोष दिवाळीसारखा साजरा केला गेला.

                        न्यूझिलंडविरूध्द भारताचा झालेला पराभव बघून पाकड्यांच्या आनंदाला तर पारावाराच उरला नव्हता. भारताचे उपांत्य फेरीचे दरवाजे बंद होत असल्याचे बघून त्यांच्या आनंदाला उधाण आले होते. तर अफगाणिस्तानवर भारताने मिळविलेला मोठा विजय पाकड्यांना तर मॅच फिक्स असल्याचेच वाटत होते. अफगाणिस्तानला त्यांनी गद्दार म्हणूनही घोषित केले तर अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालीबान सरकारला अफगाण खेळाडूंच्या चौकशीची मागणीही पाकिस्तानकडून केली गेली.

                          त्यांनतर न्यूझिलंडला साखळी सामन्यात अफगाणिस्तानने हरविले तर भारतासाठी उपांत्य फेरीचा दरवाजा उघडू शकतो हे माहीती झाल्यानंतर आख्ख्या पाकिस्तानमध्ये भारताच्या पराभवासाठी नमाज पढले गेले, मन्नत मागितल्या गेल्या. अफगाणचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या आनंदाला तर उधाण आले होते. याचे मोठे कारण म्हणजे त्यांना माहिती होते की अंतिम सामन्यात त्यांची गाठ भारताशी झाली तर भारत त्यांना नक्कीच चित करेल.

                        ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी पाकिस्तानात ते अंतिम फेरीत जाणारच असे ग्रहीत धरले जात होते. परंतु कांगारुंनी पाकच्या सर्व आशांवर पाणी फेरल्याने समस्त पाकिस्तानमध्ये मातम सुरू आहे.

                          विश्वचषकच स्पर्धेत साखळीतच भारताला गाशा गुंडाळावा लागला व त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठे फेरबदल झाले, यामुळे पाकिस्तानमध्ये मोठा समज पसरला की भारतातील क्रिकेटच संपले. परंतु पाकड्यांना एक गोष्ट माहीती नाही की त्यांनी भारताला पराभूत केल्याने भारतीय क्रिकेटमधील घाण साफ करून क्रिकेटला नवीन संजीवनी देण्याचे काम सुरू झाले आहे. आता एक मात्र नक्की की, विश्वचषकात पाकच्या पराभवाची खंडीत झालेल्या मालिकेचा येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टिट्वेंटी विश्वचषकात नव्याने अध्याय लिहीला जाणार आहे.

लेखक : -  

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

प्रतिनिधी भारत. 

Email:  dattavighave@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या