टि-20 विश्वचषक स्पर्धा जिंकणारे संघ..

 टि-२० विश्वचषक स्पर्धा -

 भारत विजेतेपद मिळविणार ?



               कोरोना महामारीमुळे भारतात होणारी सातवी टि२० विश्वचषक स्पर्धा १७ ऑक्टोबर पासून ओमान व युएईत हलविण्यात आली. परंतु स्पर्धेच्या संयोजनाचे अधिकार भारताकडेच कायम असणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात पात्रता फेरीचे सामने होणार असून यातून चार संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. मुख्य स्पर्धा २३ ऑक्टोबर पासून सुरू होणार असून स्पर्धेतील सर्वात हाय होल्टेज सामना २४ ऑक्टोबरला पारंपारीक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात होणार आहे.

               सन २००७ ला पहिली टि२० विश्वचषक स्पर्धा द. आफ्रिकेत झाली. ती धरून आतापर्यंत सहा स्पर्धा संपन्न झाल्या. शुभारंभाची स्पर्धा जिंकण्याचा मान भारताला मिळाला असून विंडीजने सर्वाधिक दोन तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका व इंग्लंडने प्रत्येकी एकदा विश्वकरंडक जिंकला आहे.

               यंदाच्या स्पर्धेत भारत, इंग्लंड व गतविजेता विंडीज हे संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. परंतु टि२० खेळ असा आहे की जो संघ उपलब्ध संधीचा अचूक लाभ घेईल तो बाजी मारून जातो. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यात जो संघ सरस खेळेल, प्रतिपक्षाच्या चुकांचा लाभ घेईल व दबावात खुलून खेळेल तोच विजेता बनेल.

               आखाती देशात प्रथमच खेळल्या जात असलेल्या या भव्यदिव्य स्पर्धेत विजेता कोण ठरेल हे येणाऱ्या एक महिन्यात आपण स्वतः अनुभव घेणार आहोतच. मात्र मागील सहा स्पर्धात विजेतेपदाचा कौल दिलेल्या अंतिम सामन्यांवर एक नजर टाकूया.

               मुळातच बीसीसीआयचा सुरूवातीला टि२० प्रकाराला विरोध होता. परंतु आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धेत सहभाग घेणे अनिवार्य असल्याने भारताने नवख्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली नवोदित खेळाडूंचा संघ पाठविला. सुरूवातीला भारताला कोणीच गांभिर्याने घेतले नव्हते. परंतु स्पर्धा जसजशी पुढे सरकत गेली तसतशी भारताची स्पर्धेवर पकड घट्ट होत गेली. भारताने करिश्माई कर्णधार महेंद्रसिंग धोनी, अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग, इरफान पठाण व सलामीवीर गौतम गंभीरच्या सातत्यपूर्ण खेळाने भारताने बाजी मारली.

              अंतिम सामन्यात भारताची लढत पाकिस्तानशी झाली. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकात ५ बाद १५७ धावा ठोकल्या तर पाकिस्तानला १९.४ षटकात १५२ धावांत उखडले व पहिली टि२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यात भारताकडून गौतम गंभीर ७५ धावा व इरफान पठाण व आर पी सिंग प्रत्येक ३ बळी घेवून चमकले.

              सन २००९ मध्ये दुसरी स्पर्धा इंग्लंडमध्ये झाली. २००७ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानाव्या लागलेल्या पाकिस्तानने यावेळेस युनुस खानच्या नेतृत्वात विजेतेपद मिळविले. पाकने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. तर गतविजेता भारत सुपर आठ मध्ये तीन सामने पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. इंग्लंड, विंडीज व द. आफ्रिका या तीन संघाबरोबर झालेले सामने भारताने गमावल्याने स्पर्धेतून बाद होण्याची वेळ भारतावर आली होती.

              सन २०१० ची तिसरी विश्वचषक स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये झाली. या स्पर्धेत पॉल कॉलिंगवुडच्या इंग्लंड संघाने त्यांचा चिर प्रतिद्वंद्वी ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामन्यात फडशा पाडून स्वतःचा पहिला आयसीसी करंडक पटकविला. या स्पर्धेतही भारत आपले तिनही सामने अनुक्रमे ऑस्ट्रेलिया, श्रीलंका व वेस्ट विरुद्ध हरल्याने सलग दुसऱ्यांदा सुपर आठ मध्येच गारद झाले.

              सन २०१२ ला चौथी स्पर्धा श्रीलंकेत संपन्न झाली. सलग चौथ्या स्पर्धेत नवा विजेता जगाने बघितला. या  वेळेस डॅरेन सामीच्या विंडीजने यजमान श्रीलंकेला चित करून विजेतेपद मिळविले. या स्पर्धेतही भारताची कामगिरी निराशजनक राहीली. खराब धावगतीमुळे भारताला सुपर आठ मध्येच गाशा गुंडाळावा लागला.

              पाचवी टि२० विश्वचषक स्पर्धा बांगलादेशात झाली. या स्पर्धेत एम एस धोनीच्या संघाने मागच्या तिन स्पर्धांच्या तुलनेत सरस कामगिरी केली, खरी परंतु अंतिम सामन्यात महेला जयवर्धनेच्या श्रीलंकेकडून भारताला पराभव पत्करावा लागल्याने सन २००७ ची पुनरावृत्ती करता आली नाही. त्या सामन्यात भारताने ठेवलेले १३० धावांचे लक्ष श्रीलंकेने सहा गडी राखून आरामात साध्य केले.

               सन २०१६ ची सहावी विश्वचषक स्पर्धा भारतात संपन्न झाली. डॅरेन सामीने त्याच्या नेतृत्वात दुसरे विजेतेपद विंडीजला मिळवून देताना चित्तथरारक अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केले. या स्पर्धेत भारताची कामगिरी बऱ्यापैकी झाली. परंतु उपांत्य सामन्यात विंडीजने भारताला धुळ चारून अंतिम फेरी गाठली.

               आतापर्यंत झालेल्या सहा स्पर्धांचा इतिहास बघितला तर यजमान देश या स्पर्धेचे विजेतेपद मिळवू शकले नाही. यंदाची मुख्य स्पर्धा युएईत जरी होणार असली तरी त्याचे यजमानपद भारताकडेच आहे, तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली आयसीसी स्पर्धा अद्याप एकदाही जिंकू न शकल्याने यंदाच्या विजेतेपदाबद्दल सर्वत्र कुतुहल आहे. त्यामुळे यजमान भारत व कर्णधार कोहली चक्रव्यूव्ह भेदतात का ? हे बघणे नक्कीच मनोरंजक ठरणार आहे.


लेखक : -  

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या