#सकला - मालवणी कविता संग्रहाचे प्रकाशन -डॉ सतीश पवार, कणकवली

 #सकला - मालवणी कविता संग्रहाचे प्रकाशन -डॉ सतीश पवार, कणकवली



#सकला ही एक वैश्विक संकल्पना - डॉ भालचंद्र मुणगेकर ,अर्थतज्ज्ञ, माजी खासदार - माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ


डॉ. पवारांच्या कवितेतील #सकला आपल्या प्रत्येकाच्याच काळजाचा कप्पा कधी ना कधी हलवून गेलेली असते - 'वस्त्रहरण' कार - ज्येष्ठ रंगकर्मी मा. गंगाराम गवाणकर काका


#सकला ... डॉ सतीश सदाशिव पवार , राहणार कणकवली यांच्या मालवणी कवितासंग्रहाचे प्रकाशन आज कोकण नाऊच्या सौजन्याने प्रभाते मनी या अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या काव्योत्सवात अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडले.  

       मालवणी मुलखातील एक अल्लड प्रेमकथा असं जरी या कवितांचं स्वरूप असलं तरीही  इथला 25-30 वर्षांपूर्वीचा मालवणी मुलुख अगदी रसरशीतपणे जिवंत झाल्याची अनुभूती आपल्याला यातील प्रत्येक कविता वाचताना येत राहते. 

      या मालवणी मातीतील अनेकांना स्वतःच्या हळव्या, तरल भूतकाळात आवर्जून परत एकदा डोकवायला लावणाऱ्या या कविता... या मातीपासून दूर असलेल्याना पुन्हा एकदा या मातीची ओढ लावणाऱ्या या कविता.... आणि प्रत्येकाच्याच आयुष्यात एकदातरी येऊन गेलेल्या त्याच्या त्याच्या सकल्याच्या आठवणीने मोहरून यावं अशा या #सकल्याच्या कविता....

      ज्यांनी कवी डॉ. सतीश पवार याना मालवणी कविता लिहिण्यास प्रवृत्त केले असे कोकण नाऊचे वरिष्ठ पत्रकार मा विजय शेट्टी याना अर्पण केलेल्या या कविता संग्रहाचे प्रकाशन सन्मा. भालचंद्र मुणगेकर सर , माजी खासदार - माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ तसेच वस्त्रहरणकार - ज्येष्ठ रंगकर्मी मा. गंगाराम गवाणकर काका यांच्या सन्माननीय उपस्थितीत झाले.

       सोबतच सिंधुदुर्गचे लाडके डॉक्टर आणि लेखक मिलिंद कुलकर्णी तसेच लेखिका , कवयित्री अंजली मुतालिक ... या मित्रद्वयीची आश्वासक उपस्थिती होती.

        #सकला या काव्यसंग्रहाची डिजिटल बांधणी करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मा अमर पवार हे सुद्धा उपस्थित होते.

      मैत्रीण लेखिका, कवयित्री अंजली मुतालिक हिने अगदी थोडक्या पण नेमक्या शब्दांत दिलेल्या शुभेच्छा मुळे कार्यक्रमाचा प्रसन्न शुभारंभ झाला..

       डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी #सकल्याचे विविध पैलू आणि सकल्याला बिलगलेला इथल्या मातीचा गंध अगदी यथोचित शब्दांत रसिकांपर्यंत दरवळत ठेवला.

      सकल्याच्या काव्यरूपा विषयी डॉ सतीश पवार यांनी थोडक्यात मांडणी केली. डॉ पवार यांनी #सकल्याच्या माध्यमातून खरोखरच या मालवणी मुलुखातील एक मोठा कालपट या शब्दांद्वारे काळाच्या भाळी गोंदवून ठेवलाय असं म्हटलं तर अतिशयोक्ती नाही ठरणार

      सर्वांचे लाडके गंगाराम गवाणकर काका यांना... ज्यांनी अत्यंत सुंदर आणि यथायोग्य शब्दांत या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहिली आहे. त्यांनी आपले शुभाशीर्वाद देताना #सकल्याचे प्रत्येकाच्याच आयुष्यात असलेले अढळ स्थान त्यांच्या मिश्किल शैलीत विशद केले आणि आपल्या आयुष्यातील #सकल्याच्या आठवणींना दिलखुलासपणे उजाळा दिला. प्रत्येकाच्याच काळजाचा कप्पा कधी ना कधी हलवून सोडणारी ही #सकला प्रत्येक घराघरात, मनामनात पोचू दे, असे शुभाशीर्वाद त्यांनी दिले.

          सन्मा. भालचंद्र मुणगेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत कविता संग्रहाचे प्रकाशन झाले हा खरंच केवळ या काव्यसंग्रहाच्याच नव्हे तर  मालवणी साहित्याच्याच दृष्टीने एक गौरवाचा क्षण ठरला. 

        "#सकला ही केवळ एक व्यक्ती नाही तर ती संपूर्ण भारतीय संस्कृतीची, वांडमयाची, साहित्याची, नाट्यकृतीची, कादंबरीची नायिका आहे. #सकला ही एक वैश्विक संकल्पना आहे. ती एक जबाबदारी आहे. ती नुसती प्रेमिका नाहीय..  तिच्यातील स्वाभिमान जागा करणं, तिच्यातील स्वतंत्र व्यक्तित्व मान्य करणं, तिला सन्मानाने वागवणं हा #सकल्याचा अर्थ आहे."

      अशा अत्यंत भावस्पर्शी शब्दांत डॉ भालचंद्र मुणगेकर सर यांनी या काव्यासंग्रहाप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या.

          टीम कोकण नाऊ आणि वरिष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आणि अत्यंत सुंदर पद्धतीने रंगलेल्या या काव्य सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याची आणि या सर्व दिग्गज व्यक्तिमत्वांशी संवाद साधण्याची संधी मला समृद्ध करून गेली... 


     डॉ सतीश पवार यांची #सकला सर्व हळव्या मनाच्या कानाकोपऱ्यांत राज्य करेल हे निःसंशय... 🌹🌹🌹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या