भारताचा इंग्लंडवर सोपा विजय ; परंतु तयारी अपूर्णच ?

 " टि २० विश्वचषक स्पर्धा - दिवस क्रं.-२ "

भारताचा इंग्लंडवर सोपा विजय ; परंतु तयारी अपूर्णच ?



              सातवी टि२० विश्वचषक स्पर्धा वास्तविक २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार असली तरी सध्या सुरू असलेल्या पात्रता फेरीच्या व सराव सामन्यांनी क्रिकेट रसिकांना क्रिकेटची आनंदमय मेजवानी लुटायला मिळत आहे. सोमवारी चार सराव व २ पात्रता फेरीचे मिळून सहा सामने खेळविण्यात आले. तीन सामने कडक उन्हात तर तीन सामने विद्युत प्रकाशात खेळविले गेले. 

                गतविजेता वेस्ट इंडिज व पाकिस्तान यांच्यात पहिला सामना झाला. पाकने विंडीज फलंदाजांना शेवट पर्यंत जखडून ठेवले व त्यांनी दिलेले लक्ष आरामात पार केले. या विजयाने पाकचा भारताविरूध्दच्या सामन्यापूर्वी आत्मविश्वास वाढणार आहे.

                दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेने अफगाणिस्तानच्या फलंदाजीचे पितळ उघडे पाडत आंतरराष्ट्रीय स्तरावर निव्वळ गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळविता येत नाही, हे त्यांना दाखवून दिले.

                तिसरा सामना पात्रता फेरीचा झाला. त्यात आयर्लंडने आपलाच शेजारी देश नेदरलँडचा एकतर्फी फडशा पाडला. आयरीश गोलंदाज कर्टीस कँफरने सलग चार चेंडूवर चार फलंदाज बाद करून लसिथ मलिंगानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर असा कारनामा सादर केला.

                 दिवसाच्या दुसऱ्या सत्रातही तिन सामने झाले. पात्रता फेरीच्या सामन्यात श्रीलंकेने नामिबियाचे आव्हान स्वस्तात मोडीत काढत विश्वचषकाच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळविण्याच्या आशा प्रखर केल्या.

                  न्यूझिलंड व ऑस्ट्रेलिया या शेजारी देशात झालेला सामना सराव सामना असला तरी अतिशय रोमहर्षक झाला. विजय न्यूझिलंडच्या पूर्ण कक्षेत असताना ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट झुंज देत विजयश्री खेचून नेली. त्याचबरोबर विजेतेपदाचे दावेदार असल्याचे दाखवून दिले.

                  तिसरा सामना भारत व इंग्लंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने टि२० स्पेशालिस्ट इंग्लंडला लिलया लोळविले. मात्र मुख्य स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारताला अजून बऱ्याचशा कमकुवत बाबींवर काम करावे लागणार असल्याचे दिसून आले.

                    कर्णधार कोहलीवर नाणेफेक नेहमी रूसत असते. मात्र या सामन्याच्या सुरुवातीलाच नाणेफेकीने कोहलीच्या बाजूने कौल दिला व स्वतःच्या मर्जी प्रमाणे चाली रचण्याची संधी भारताला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश फलंदाजांनी अपेक्षेनुसार शानदार खेळ करत आव्हानात्मक धावसंख्या रचली. भारताकडून मोहम्मद शमी व रविचंद्रन आश्विनची गोलंदाजी प्रभावी झाली. जसप्रित बुमराहानेही बऱ्यापैकी गोलंदाजी केली असून त्याला थोडीफार लय अजून मिळवावी लागेल. तर भुवनेश्वर कुमारने साफ निराश करताना बळींची पाटी कोरीच होती, शिवाय त्याने गोलंदाजीत अर्धशतकी धावा फक्त चार षटकात वाटल्या. पुढच्या सराव सामन्यात त्याने सुधारणा दाखविली नाही तर पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात त्याच्या ऐवजी शार्दूल ठाकूर आपल्याला मैदानात दिसेल.

                    लेगस्पिनर राहुल चहर युजवेंद्र चहलला डावलून संघात आला आहे. मात्र त्याचीही गोलंदाजी बरीचशी स्वैरच झाली. त्याला एक बळी मिळाला खरा पण मुख्य स्पर्धेत अंतिम अकरात त्याला संधी मिळण्याची शक्यता नसल्या सारखीच आहे.

                    इंग्लंडने ठेवलेले १८९ धावांचे लक्ष सलामीवीर केएल राहुल व ईशान किशनच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने सहज साध्य केले. राहुल ६५ धावांवर बाद झाला. तर ईशान किशनला ७० धावांवर निवृत्त करण्यात आले. इतर फलंदाजांना फलंदाजीची संधी मिळावी हा त्यामागचा उद्देश होता. परंतु सुर्यकुमार यादवच्या ऐवजी रिषभ पंतला पाठविणे हे जरा योग्य वाटले नाही. कारण रिषभ आयपीएलमध्ये चांगला खेळला होता तर त्या तुलनेत सुर्यकुमारचा फॉर्म विशेष चांगला नव्हता, त्यामुळे त्याला जास्त चेंडू खेळण्याची गरज होती. तर सध्या फिटनेस व फॉर्म या दोन्ही बाबतीत संकटात असलेल्या हार्दिक पांडयाला उशीरा फलंदाजीस पाठवून संघ प्रबंधनाने नेमके काय साधले हे तेच जाणो ? शिवाय हार्दिकला गोलंदाजी न देणे हा टिम मॅनेजमेंटचा निर्णयही संभ्रम व्यक्त करणारा आहे.

                   सराव सामन्यात कोणताही खेळाडू फलंदाजी -गोलंदाजी करू शकतो. मात्र संघ प्रबंधन अजून बऱ्याच बाबतीत गोंधळात असल्याचे जाणवले. ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या सराव सामन्यात भारताला चुका दुरूस्त करण्याची संधी मिळणार असून पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारत आपल्या सर्व कमकुवत बाबी दुरुस्त करील अशी अपेक्षा !

लेखक : -  

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

प्रतिनिधी भारत. 

Email:  dattavighave@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या