दुर्गाडी पुलाची मार्गिका प्रवाशांना खुली
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-भिवंडी जोडणाऱ्या दुर्गाडी पुलावरील वाहतूककोंडी आता संपुष्टात येणार आहे. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या सातत्याने सात वर्षांच्या प्रयत्नांनंतर दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिका सोमवारपासून प्रवाशांसाठी खुल्या होणार आहेत. अन्, प्रवाशांना दररोजच्या हालापासून दिलासा मिळणार आहे.
कल्याण व भिवंडी तालुक्याला जोडणारा दुर्गाडी पूल हा महत्वाचा आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये निवड झाल्यानंतर खासदार कपिल पाटील यांनी हाती घेतलेल्या महत्वाच्या प्रश्नांमध्ये नव्या दुर्गाडी पुलाचाही समावेश होता. दुर्गाडी येथे आणखी सहा पदरी नव्या पुलासाठी खासदार कपिल पाटील यांनी २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती. ती मंजूर झाली होती. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. फडणवीस यांच्या आदेशानंतर एमएमआरडीएने ९० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्यानंतर १८ सप्टेंबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले होते. या पुलाचे काम वेगाने होण्याची अपेक्षा होती. मात्र, कंत्राटदारामुळे काम थंडावले. त्यानंतर संबंधित कंपनीकडून काम काढून घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी कंत्राटदाराला ताकीद दिली होती. त्यानंतर त्याच्याकडून काम काढून घेण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये नव्याने कंत्राटदाराची नियुक्ती करून त्याला काम सोपविण्यात आले. कोरोना आपत्तीच्या काळात मजुरांअभावी काम थंडावले. मात्र, अखेर आता तब्बल सात वर्षांनंतर दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिका प्रवाशांसाठी खुल्या होत आहेत. या कामासाठी खासदार कपिल पाटील यांनी तयार केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे दररोज तासाभराहून अधिक काळ रखडणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
****************************************************************************
देवेंद्र फडणवीस यांचे योगदान महत्वाचे : कपिल पाटील
अरुंद दुर्गाडी पुलामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यांनी आपल्यालाही वाहतूककोंडीचा फटका बसल्याचे नमूद केले. आपण प्रचारसभेसाठी येताना वाहतूककोंडीत अडकलो होतो. त्यानंतर आपल्याला कार्यकर्त्याने मोटारसायकलवरून सभेच्या ठिकाणी नेल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे या पुलामुळे होणाऱ्या हालाची माहिती होती. त्यामुळे त्यांनी दुर्गाडी पुलाच्या कामाला महत्वाचे स्थान दिले होते. मात्र, कंत्राटदाराने काम रखडविल्यानंतर तातडीने नवा कंत्राटदार नेमण्यासाठीही मान्यता दिली होती. त्यामुळे दुर्गाडी पुलाच्या उभारणीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे योगदान महत्वाचे आहे, असे खासदार कपिल पाटील यांनी सांगितले.
0 टिप्पण्या