सायंकाळ नंतर सुटणाऱ्या उग्र वासाने डोंबिवलीकर त्रस्त...रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट गटारात सोडल्याचा शिवसेनेचा आरोप..

 सायंकाळ नंतर सुटणाऱ्या उग्र वासाने डोंबिवलीकर त्रस्त...रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट गटारात सोडल्याचा शिवसेनेचा आरोप..                           


                                       प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)


दि.०६.०३.२०२१ -  गेल्या दोन दिवसापासून डोंबिवली व आसपासच्या  परिसरात संध्याकाळच्या वेळेला पुन्हा रासायनिक उग्र वासामुळे होणारे प्रदुषण अचानक वाढले आहे. औद्योगिक विभागातील  रासायनिक कंपन्यांमधून बाहेर पडणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेऊन त्यावर प्रक्रिया केल्यानंतरच खाडीत सोडाले पाहिजे. परंतू हे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेण्याची यंत्रणाच सदोष असल्यामुळे सांडपाण्याच्या वाहिन्या व चेंबर्स भरुन वाहतात व काही ठिकाणी हे सांडपाणी थेट गटारात सोडले जाते. त्यामुळे प्रदुषणात वाढ झाली आहे, व या सर्व प्रकाराकडे डोळेझाक करणारे प्रदुषण नियंत्रण मंडळ व एम.आय.डी.सी.चे आधिकारीदेखील जबाबदार आहेत. असा आरोप शिवसेनेच्या प्रदुषण शोध पथकाचे राजेश कदम यांनी केला आहे.                                  

  

  शुक्रवारी सायंकाळी संपूर्ण डोंबिवलीत विशेषतः ९० फुट रस्ता, पेंडसे नगर, सुनील नगर, डोंबिवली स्टेशन परिसर येथून नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. त्याची गंभीर दखाल घेत राजेश कदम यांच्या नेतृत्वाखाली एका शोध पथकाने या प्रदूषणामागचे रहस्य उलगडण्यासाठी शोध घेतला आणि शिवसेने तर्फे त्वरीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकारी वर्ग यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने या पथकाने डोंबिवली एमआयडीसी परिसरामध्ये गाडीने फिरुन त्या उग्र वासाचा शोध घेतला परंतु औद्योगिक परिसरात हा  संदिग्ध वास कमी प्रमाणात येत असल्याचे आढळले. कदाचित रासायनिक टाकाऊ पदार्थाचा, द्रव असलेला टँकर कल्याण दिशेला खाडीत किवा फेज १ जवळच्या नाल्यात रिता केल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही  असा प्राथमिक अंदाज होता. त्यामुळे शिवसेनेतर्फे डोंबिवलीतील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की जर असं काही आपल्याला संशयास्पद आढळल्यास किंवा वास येत असेल तर जवळच्या शिवसेना शाखेत त्वरित संपर्क साधावा, शनिवारी दुपारी शिवसेनेतर्फे या शिवसैनिकांच्या पथकाने पुन्हा संपूर्ण एमआयडीसी परिसरात प्रदूषण करणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीचा शोध घेतला असता अनेक ठिकाणी चेंबर भरुन सांडपाणी रस्त्यावर व थेट गटारातून वहात असल्याचे  आढळले. त्यामुळे प्रदुषण मंडळाचे नियम धुडकावून डोंबिवलीकरांना वेठीस धरणाऱ्यांना पकडून कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी  शिवसेना डोंबिवली शहर शाखेतर्फे व कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सुद्धा डोंबिवली येथील प्रदूषण व इतर समस्यांबाबत लवकरच भेट घेऊन या सततच्या प्रदुषणा बाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या