कोकणची संस्कृती आणि मानबिंदू असलेल्या प्राचीन ‘दशावतार’ कलेला जिवंत ठेवण्यासाठी आणि तिचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाटळ येथील कलावंत रवींद्र उर्फ वादळ मेस्त्री हे गेल्या चाळीस वर्षांपासून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या या निस्सीम कलासेवेमुळे कोकणात दशावतार कलेची नवी पालवी फुटली आहे.
रवींद्र उर्फ वादळ मेस्त्री यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुतार यांनी सुतारकामाचा व्यवसाय सांभाळत आपल्यातील कला जिवंत ठेवली. नृत्य दिग्दर्शक, सोंगी भारुड, भजन, रंगभूषा, वेशभूषा, दशावतार निर्माता, लेखक, दिग्दर्शक ते अगदी तमाशापर्यंत विविध कलाप्रकारांत त्यांचा हातखंडा आहे. विविध स्तरांवर त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि ‘कला भूषण’ उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे.
बालवाडीपासून ते प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांना अवघड वाटणारी दशावतार कला शिकवणे तसे जिकिरीचे काम. मात्र, विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्यांना त्यांच्याच ओढीने शिकवण्याची हातोटी सुतार यांच्याकडे आहे. एवढेच नव्हे, तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही आव्हान स्वीकारत त्यांनी चिमुरड्यांच्या मनात या पारंपरिक कलेची बीजे पेरली आहेत. समाजातील काहीसा विरोधाभास बाजूला सारत त्यांनी नेहमी कलेला न्याय दिला. गावागावांत होणारे शरदोत्सव, भजन सप्ताह, शाळांचे स्नेहसंमेलन किंवा सामाजिक उपक्रमांतून लहान मुलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विशेष म्हणजे, लहान मुलांच्या दशावतार प्रयोगासाठी लागणारी वेशभूषा आणि सर्व साहित्य ते स्वतःकडे उपलब्ध करून देत असून मुलांना ते मोफत वापरण्यासाठी देतात.
नुकत्याच झालेल्या शारदोत्सवात त्यांनी पहिली ते दुसरीच्या चिमुरड्यांना घेऊन "वराची प्रचिती अर्थात भस्मासूर" हे अफलातून दशावतार नाटक विविध ठिकाणी सादर करून रसिकांची मने जिंकली. या नाटकात खालील बालकलाकारांनी उत्तम अभिनय केला: भस्मासूर: करण सावंत, मोहिनी: वेदिका गावकर, नारद: राजकुमार सावंत, शंकर: ऋग्वेद मुंडे, विष्णू: अक्षता गावकर, पार्वती: यशस्वी गावकर, गणपती: आदिनाथ घाडीगावकर, रिद्धी-सिद्धी: मायरा घाडीगावकर तसेच श्रेयश सावंत (हार्मोनियम), विराज तेली (पखवाज) आणि यश देसाई (तालरक्षक) यांनी सांगीतिक साथ दिली. दिगंबर सावंत यांचे मार्गदर्शन तर वेशभूषेची जबाबदारी रवींद्र सुतार आणि विकास सुतार व रवींद्र उर्फ वादळ मेस्त्री यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. रवींद्र उर्फ वादळ मेस्त्री यांच्या या धडपडीमुळे कोकणातील ही लोककला केवळ टिकून राहिली नाही, तर ती नव्या दमाच्या मुलांच्या माध्यमातून अधिक समृद्ध होत आहे.



0 टिप्पण्या