महिला व बाल विकास विभाग, अंतर्गत *९ वा राष्ट्रीय पोषण महिना राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न*




मुंबई (प्रतिनिधी )महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ९ व्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा यशवंतराव चव्हाण मुख्य सभागृह, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास राज्यभरातून आलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये  महिला व बाल विकास मंत्री मा.ना. आदिती ताई सुनील तटकरे,  विधानसभेचे अध्यक्ष मा.राहुल नार्वेकर व  एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्याच्या आयुक्त माधवी सरदेशमुख व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक दीपप्रज्वलनाने करण्यात आली असून या वर्षीच्या पोषण महिन्याचे मुख्य उद्दिष्ट हे ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, किशोरवयीन मुली, गरोदर माता व स्तनदा माता यांना पोषक आहार, आरोग्य सेवा आणि शिक्षण याबाबत जागरूक करणे हे आहे. "आमची अंगणवाडी - आमची जबाबदारी" आणि "पौष्टिक आहार - निरोगी जीवनाचा आधार" हा संदेश देण्यात आला.
       कार्यक्रमाची सुरुवात पोषण आरतीने करण्यात आली असून अंगणवाडी सेविकांनी काढलेली "पौष्टिक आहार" या विषयावरील आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या रांगोळीमध्ये धान्य, डाळी, फळे, भाज्या, दूध, अंडी यांचे महत्त्व सुंदररित्या दाखवण्यात आले होते. गुलाबी साडी परिधान केलेल्या सेविकांनी एकत्र येऊन या सोहळ्याची शोभा वाढवली.
       राष्ट्रीय पोषण  अभियानांतर्गत राज्यातील ९०,००० पेक्षा जास्त अंगणवाड्यांमध्ये संपूर्ण सप्टेंबर महिन्याभरात पोषण जनजागृती, आरोग्य तपासणी, अन्न प्रात्यक्षिके, गृहभेटी आणि समुदाय सहभागाचे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. "सुपोषित महाराष्ट्र - सशक्त महिला, सुदृढ बालक, समृद्ध महाराष्ट्र" हे ध्येय गाठण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
          या कार्यक्रमामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये नवीन ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण झाली असून पोषण अभियान यशस्वी करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.
    या कार्यक्रमाला  जोगेश्वरी व विक्रोळी भांडुप नागरी बालविकास प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी योगिता जोशी तसेच मुख्य सेविका नंदिता काळभोर ,सोनाली देशमुख ,सुषमा करमाळे व महाजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखालील अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी होऊन त्यांनी विविध पारंपरिक सकस व पौष्टिक आहार पदार्थाचे प्रदर्शन मांडून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले .
    " आमची अंगणवाडी--आमची जबाबदारी " या भावनेतून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बालकांचे पोषण ,आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी आपली  भूमिका प्रभावीपणे मांडली .पोषण अभिनयाच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलन योग्य आराबाबत जनजागृती आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
       नवव्या राष्ट्रीय पोषण  माह चे  उद्घाटन सोहळ्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा उत्साह वाढला असून पोषणमूल्य असलेल्या पारंपारिक आहाराच्या माध्यमातून " सुदृढ बालक --सुदृढ समाज"  निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



---

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या