राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेतील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ सोमवार, दिनांक १५ जून रोजी संस्थेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून इरा ग्लोबल स्कूल व इवा ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालक तथा संस्थापक सदस्या डॉ. सौ. अर्चना सनिल उपस्थित होत्या. व्यासपीठावर संस्था अध्यक्ष डॉ. श्री. संजय कुलकर्णी ,श्री. सनिल सर, संस्थेचे सहकार्यवाह श्री. प्रमोद उंटवाले आणि कोषाध्यक्ष श्री. संजय दीक्षित यांची उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्या डॉ. सौ. अर्चना सनिल यांनी संस्थेच्या सर्व शाळांचा उत्कृष्ट निकाल लागल्याबद्दल अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचे अशा प्रकारे कौतुक करणारी संस्था खरोखरच अभिनंदनास पात्र असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच संस्कार व संस्कृतीचे धडे देतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामागे गुरुजनांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. संस्थेने संस्कृती व मूल्यांची जपणूक केली असून ही परंपरा पुढेही कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. संजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी यापुढेही कठोर परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास आणि अनुभव यांच्या बळावर यशाची नवी शिखरे गाठावीत, असे सांगितले. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे योगदान यामुळेच विद्यार्थ्यांना हे यश मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना संस्थेच्या सर्व शाळांमधून प्रथम तसेच मुलींमधून प्रथम आलेली कु. काव्या एकनाथ सोनवणे आणि मुलांमधून प्रथम आलेला कु. गजेंद्र संजय साठे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या सर्व स्वामी विवेकानंद शाळा मधील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर, अरुणोदय, गोपाळनगर आणि रामचंद्रनगर इंग्रजी माध्यम शाळांचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल या शाळांच्या मुख्याध्यापकांना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
सर्व शाखांमधून प्रथम आलेल्या कु. काव्या सोनवणे हिने आपले मनोगत व्यक्त केले.
शिक्षिका सौ. मृणाल केळकर यांनी शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना ज्ञानमंदिराच्या यशाची परंपरा कायम राखत अधिक उंची गाठण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मोनिका पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. प्रमोद उंटवाले यांनी केले. स्वागतगीत व ईशस्तवन विष्णुनगर आणि दत्तनगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. यादी वाचन सौ. वैशाली निंबाळकर व श्री. लक्ष्मण शिंदे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ. रेखा गढरी यांनी करून दिला. सौ. भाग्यश्री दातार यांनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन स्वामी विवेकानंद दत्तनगर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गीतांजली मुणगेकर व स्वामी विवेकानंद विष्णूनगर माध्यमिक चे मुख्याध्यापक श्री रायसिंग यांनी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, मुख्याध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.



.jpeg)
0 टिप्पण्या