रणरणत्या उन्हात एसआरएवर निघाला धारावी झोपडपट्टीवासियांचा मोर्चा



'सर्व धारावीकर पात्र, अदानी फक्त अपात्र' च्या घोषणेने धारावी झोपडपट्टी दणाणली 

मुंबई,दि.४ (प्रतिनिधी)-- धारावीमधील प्रत्येक झोपडपट्टीवासियास ५०० चौ. फू.चे घर मिळालेच पाहिजे. याचे लेखी आश्वासन सरकार-अदानी कंपनीने द्यावे यासाठी आज सकाळी ११ वाजता तळपत्या, रणरणत्या उन्हात धारावी झोपडपट्टीवासियांनी एक विशाल मोर्चा वांद्रे पूर्व येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणावर (एसआरए) काढला. अदानी कंपनी विरोधात झोपडपट्टीवासियांमध्ये असंतोष-नाराजी खदखदत आहे. या नाराजीचा स्फोट  धारावी बचाव आंदोलन या संघटनेने काढलेल्या या मोर्चातून होऊ नये यासाठी दोन हजार झोपडपट्टीवासियांच्या या  मोर्चासाठी ३००  पेक्षा अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.             मोर्चेकर्‍यांनीही यावेळी शिस्त न तोडता शांततेत घोषणा दिल्या. 'संपूर्ण धारावी पात्र, गौतम अदानी  केवल अपात्र'   मोर्चेकर्‍यांनी एक स्वरात  दिलेल्या या  घोषणेने सर्वांचे लक्ष यावेळी वेधून घेतले. विधान परिषदेमधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, धारावी बचाव आंदोलनाचे नेते माजी आमदार बाबुराव माने, काँग्रेसच्या खासदार वर्षाताई  गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड  आदींसह हजारो धारावीकर या मोर्चात सहभागी झाले होते. धारावी कुंभारवाडा येथील हॉटेल बिस्मिल्ला येथून  हा मोर्चा धारावी कुंभारवाडा येथील बिस्मिल्ला हॉटेलपासून वांद्रे पूर्व येथील एसआरए कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. ३५ ते ३८ डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमान रणरणते ऊन असतानाही हा मोर्चा निघाला.'कोई नही धारावी के बाहर जायेगा, खाली अदानी धारावी के बाहर जायेगा',  'नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी', 'प्रत्येक धारावीकाराला ५०० चौरस फुटाचे घर धारावीतच मिळाले पाहिजे', 'पात्र-अपात्रचा खेळ बंद करा', 'सगळे धारावीकर पात्र- अदानी तेवढे  अपात्र ' अशा घोषणा देत  हा मोर्चा शिस्तीने चालत अर्धा पाऊण तास होत नाही तोच मोर्चा साहिल हॉटेल चौकात  रस्त्यावर पोलिसांनी  अडवीला. यामुळे मोर्चेकरी संतप्त झाले. यानंतर अंबादास दानवे यांच्यासह २५ जणांचे  शिष्टमंडळ पोलीस आणि खाजगी वाहनांमधून एसआरए कार्यालयांवर रवाना झाले. एसआरए कार्यालयावरही लपून-छपून आलेल्या मोर्चेकर्‍यांनी कोणत्याही प्रकारे अदानी कंपनी  विरोधात उद्रेक करू नये यासाठी या ठिकाणीही पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. अनिल देसाई, बाबूराव माने, ज्योती गायकवाड, वर्षा गायकवाड, महेश सावंत,माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी धारावी बचाव आंदोलन या संघटनेच्या वतीने एक निवेदन एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सादर केले. मोर्चातील शिष्टमंडळाचे म्हणणे एसआरएचे प्रमुख महेन्द्र कल्याणकर यांनी शांतपणे ऐकून घेतले.तसेच आपल्या मागण्याबाबत आपल्यासोबत धारावी बचाव आंदोलन या संघटनेसोबत एक बैठक घेण्याचे आश्वासन कल्याणकर यांनी यावेळी दिले.

       धारावी पुनर्विकास प्रकल्प अर्थात डीआरपीने धारावीचा एक परिपूर्ण आराखडा-मास्टर प्लॅन बनवावा.हा  मास्टर प्लॅन धारावीच्या चौका चौकात लावावा. लोकांच्या मोबाईलवर हा प्लॅन व्हाट्सअप वर टाकावा ही जोरदार मागणी खासदार अनिल देसाई यांनी याप्रसंगी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली. तसेच या प्लॅनवर धारावीमधील झोपडपट्टीवासियांना   आपल्या हरकती, सूचना  नोंदवण्यासाठी वेळ द्यावा. आणि सर्व पात्र अपात्र लोकांना धारावीतच ५०० चौरस फुटाचे घर द्यावे  या मागणीचा पुनरुच्चारही अनिल देसाई यांनी यावेळी केला.            आमदार महेश सावंत यावेळी बोलताना म्हणाले अदानी समूहाच्या मे. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने धारावीतील प्रत्येक झोपडपट्टीवासियाबरोबर एग्रीमेंट करावे ,करार करावा. तसेच धारावी मेघवाडीत बिल्डिंगचे काम रात्रीही सुरू असते. त्याचा त्रास आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या झोपेवर होत असल्याने मेघवाडीतील  रात्रीच्या कामावर बंदी घालावी.

       आमदार अंबादास दानवे म्हणाले धारावीमध्ये झोपडपट्टीवासियांबरोबर पात्र- अपात्रेच्या खेळ करीत बसू नका. धारावी हे  श्रमिकांचे नगर असून सर्वांनाच या धारावीतच घरे द्या. कोणालाही धारावी बाहेर घर देण्याचे मनात आणू नका. नाही तर  या  विरोधात शिवसेना ठाकरे गट उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही अंबादास दानवे यांनी यावेळी दिला.

 एकही वीट अदानीस रचू देणार नाही 

 धारावी बचाव आंदोलनाचे नेते माजी आमदार बाबुराव माने म्हणाले धारावीला  अदानी कंपनीने आपल्या सोयीचे खेळणे बनवले आहे. ज्या जमिनीवर  एसआरए प्रकल्प तेथेच   झोपडपट्टीचा विकास हे सूत्र आहे. पण अदानी आले आणि अजब नियम आले. झोपडपट्टी धारावीत. पण अदानी कंपनीस  जमीन दहिसर,मुलुंड देवणारला  हे विसंगत आहे. जेथे जमीन तेथेच झोपडपट्टीचा विकास हे सूत्र मोडू नका. सर्व पात्र-अपात्र धारावीकरांना घराला घर, दुकानाला दुकान मिळाले  पाहिजे. नाहीतर येथील संतप्त लोक  एकही विट  अदानी कंपनीला येथे रचू देणार नाही असा इशाराही माने यांनी यावेळी दिला.  

      अदानी ग्रुप कंपनीतील लोक गुंडगिरी करीत आहेत. ही गुंडगिरी त्वरित थांबवा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी यावेळी केली. पूर्वी एफएसआय चार असताना एसआरएमध्ये लोकांना घरे  मिळत होती,आता अदानी कंपनीस घसघशीत बारा एफएसआय मिळालेला आहे. म्हणून त्यांनी धारावीत सर्व पात्र अपात्र लोकांना प्रत्येकी ५०० चौरस फूटाचे  घरे द्यावीत अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी केली.तसेच धारावी मध्ये सध्या अस्तित्वात असलेली सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे ही आबाधित राहिली पाहिजे.त्यांना धक्का लागता कामा नये.

 २०११च्या नियमानुसार धारावीकरांना पात्र केले पाहिजे. सर्वांना ५०० चौरस फुटाची घरे दिली पाहिजेत. यात कंजूशी करू नये, ही भूमिका हीरहिरीने आमदार ज्योती गायकवाड यांनी मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेस शपचे स्थानिक अध्यक्ष उलेश गजाकोश म्हणाले आमच्या मागण्यानुसार प्रत्येक झोपडपट्टीवासियास धारावीतच ५०० फुटाचे चौरस फुटाचे घर धारावीतच मिळाले पाहिजे. यासाठी  सरकारने नवीन जीआर काढावा.तर समाज सेवक गणेशभाऊ खेडेकर यांनी पहिल्या माळ्यावर राहणाऱ्यांना देखील धारावीतच ५०० चौ. फुटांचे घर मोफत मिळालेच पाहिजे अशी मागणी करत अदानीच्या दडपशाहीला धारावीकर भिक घालणार नाही असा इशारा दिला.

     या जनआक्रोश मोर्चात  शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक जोसेफ कोळी,टी.एम.जगदीश,नगरसेविका अर्चना शिंदे,नगरसेविका हर्षला मोरे, काॅग्रेसच्या नगरसेविका आशा दीपक काळे,नगरसेवक बब्बू  खान, विठ्ठल मोरे,राष्ट्रवादी शपचे धारावीचे अध्यक्ष उलेश गजाकोश,भाकपचे मुंबई  नसरुल हक, माजी नगरसेवक  प्रकाश नकाशे,सपाचे राहूल गायकवाड,असफाक खान, बिजनेस असोसिएशनचे समीर मंगरु,अन्सार शेख,मनसेचे आरिफ शेख,काँग्रेसचे दीपक खंदारे,शकील चौधरी,आपचे राफेल पाॅल, शिवसेनेचे शाखाप्रमुख विठ्ठल पवार ,महादेव शिंदे, किरण काळे,आनंद भोसले, मुन्ना शेख, सतिष कटके, मनी कडंन,गणेश तेवर, समन्वयक सुरेश सावंत, गंगा देरबर, विठ्ठल पवार, बसपाचे शामलाल जैस्वार, महादेव शिंदे, कुंचीकोरवे समाजाचे ज्येष्ठ नेते जगन भोसले आदींसह धारावीमधील  मोठा जनसमुदाय या मोर्चात सहभागी झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या