मुंबई पुन्हा एकदा सज्ज होतेय, पण ह्या वेळी आणखी भव्य अंदाजात. दर वर्षी ज्या उत्सवाची लाखो तरुणांना प्रतीक्षा असते, संत झेविअर्स महाविद्यालयचा वार्षिक उत्सव ‘मल्हार ’ आता २०२६ मध्ये परत येतोय पण नेहमीपेक्षा अधिक दणक्यात . मुंबईच्या या सांस्कृतिक महोत्सवाने कायमच तरुण पिढीचा आवाज आणि उत्साह यांना एक व्यासपीठ दिले आहे. यंदाही मल्हार तेच करणार आहे फक्त आणखी मोठ्या स्तरावर.
मल्हारचा इतिहास म्हणजे केवळ एका महाविद्यालय उत्सवाचा इतिहास नाही , तो भारतातील तरुणाईच्या सांस्कृतिक जाणिवेचा आरसा आहे. गेल्या अनेक दशकांपासून मल्हारने अनेक तरुण वर्गाला एकत्र आणले आहे. नृत्य, संगीत, नाटक, साहित्य, कला अश्या प्रत्येक क्षेत्रात मल्हारने एक वेगळा दर्जा निर्माण केला आहे.
मल्हारच्या प्रतिष्ठित कॉन्क्लेव्हने देशातील प्रचंड प्रभावी व्यक्तिमत्त्वांना एकाच छताखाली आणले आहे. हे केवळ भाषणांचे व्यासपीठ नाही, हे विचार, संवाद आणि प्रेरणेचे केंद्र आहे. अभिनेते आदित्य रॉय कपूर, नसीरुद्दीन शाह आणि शर्मिला टागोर यांच्यापासून ते राजकारणातील सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत, उद्योजक आणि बेणे चे संस्थापक अखिल अय्यर आणि श्रिया नारायण , क्रीडा क्षेत्रातील दिग्गज अमोल मुझुमदार, सुमा शिरूर आणि पॅरालिम्पियन भाग्यश्री जाधव, तसेच न्यायव्यवस्थेतील आदरणीय नावे , माननीय डॉ. न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि माननीय न्या. रेवती मोहिते ढेरे या सगळ्यांनी मल्हारच्या कॉन्क्लेव्हला एक वेगळीच उंची दिली आहे.
स्पर्धा आणि कार्यक्रमांव्यतिरिक्त, मल्हारने काही असे अनुभव निर्माण केले आहेत जे कायमच चर्चेत राहतात. 'मल्हार बाय द बे' आणि ‘मल्हार यार्डसेल’ हे दोन्ही कार्यक्रम आता मल्हारचे अविभाज्य भाग बनले आहेत आणि २०२६ मध्ये ते आणखी भव्य स्वरूपात परत येतील यात शंका नाही.
मे महिना म्हणजे 2026 च्या भव्य पर्वाची सुरुवात. आता एकेक पडदा उघडला जाईल . थीम, कलाकार, स्पर्धा, आणि बरंच काही. तरुणाईची बदल घडवण्याची ताकद बघून यंदाचा मल्हार एक पाऊल पुढे जाऊन उत्सवाच्या उत्साहासोबतच, सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून काही खास उपक्रमही राबवणार आहे . या वर्षी प्रेक्षक, स्पर्धक आणि, सगळ्यांसाठी मल्हार एक वेगळाच अनुभव घेऊन येणार आहे. जे आधी पाहिलं नाही ते यंदा दिसेल.
आता रंगणार उत्साह, कला आणि जल्लोषाचा महासोहळा - मल्हार 2026

0 टिप्पण्या