बँकिंगचे अमर्याद विश्व पुस्तकाच्या प्रकाशनाचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न.




ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रकाशित बँकिंगचे अमर्याद विश्व तसेच हिंदी आवृत्ती बैंकिंग की अनंत सीमाएं या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष मुलाखत कार्यक्रम शनिवार, दि. ९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता ग्रंथाली-प्रतिभांगण, सरकार हेरिटेज समोर, बँड स्टँड, वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


या पुस्तकांचे लेखक माननीय श्री. मोहन वसंत टांकसाळे, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या मराठी व हिंदी भाषेतील समृद्ध लेखनप्रवास आणि भारतीय बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवांवर आधारित संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध नाटककार व लेखक श्री. राजीव जोशी तसेच बँकर श्री. शरद कुमार यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मुलाखत घेतली.



कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी पुस्तकाविषयी मनोगते व्यक्त करताना, गेल्या पाच दशकांतील भारतीय बँकिंग व्यवस्थेची वाटचाल, तिचे बदलते स्वरूप आणि वित्तीय क्षेत्रातील व्यापक घडामोडी यांचे वास्तववादी व सखोल चित्रण या पुस्तकात असल्याचे गौरवोद्गार काढले. बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील विद्यार्थी, संशोधक तसेच भावी नेतृत्व घडवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना हे पुस्तक निश्चितच दिशादर्शक ठरेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले.


आपले विचार मांडताना लेखक श्री. टांकसाळे यांनी, Banking is the Mother of Economy  अर्थात बँकिंग ही अर्थव्यवस्थेची जननी आहे, असे प्रभावी प्रतिपादन केले.


या कार्यक्रमास बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये श्री. नरेंद्र दामोदर जाधव, माजी अर्थतज्ज्ञ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया; श्री. किरण उमरूटकर, संचालक, सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक; श्री. रॉय चौधरी, माजी महाव्यवस्थापक, पंजाब नॅशनल बँक; श्री. सुनील चव्हाण, माजी महाव्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया; श्री. सतीश मुकटे, माजी सहाय्यक महाव्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया; श्री. मंदार म्हात्रे, इन्व्हेस्टमेंट बँकर; तसेच डॉ. रेवती कृष्णा आळवे, माजी सहाय्यक व्यवस्थापक, सेंट्रल बैंक ऑफ़ इंडिया यांचा समावेश होता.


टांकसाळे परिवारासह युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांच्या आजी-माजी अधिकाऱ्यांचीही उल्लेखनीय उपस्थिती लाभली. तसेच ग्रंथाली प्रकाशनचे श्री. सुदेश हिंगलासपुरकर, सौ. धनश्री धारप आणि श्री. अरुण जोशी हेही उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. अश्विनी भोईर, ग्रंथाली प्रकाशन यांनी प्रभावीपणे केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या