चेंबूरमध्ये शौचालयाचे बांधकाम पालिकेनेच बंद केल्याने खळबळ

 चेंबूरमध्ये शौचालयाचे  बांधकाम  
पालिकेनेच बंद केल्याने खळबळ 


*स्थानिक रहिवाशांचा 

आंदोलनाचा इशारा 



मुंबई- चेंबूरच्या   खारदेवनगरमधील अनंत मित्र मंडळाजवळच्या  अरविंद पाटीलवाडीत पालिकेतर्फे सुरू असलेले सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम काही दिवसांतच पालिकेने बंद केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.पालिकेच्या या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशी संतप्त झाले असून त्यांनी अरविंद व नागेश पाटीलवाडी स्थानिक कृती समितीच्या माध्यमातून उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. 


अरविंद व नागेश पाटीलवाडी स्थानिक कृती समितीचे पदाधिकारी दिनेश चिंदरकर,शरद मुंडे आणि मंगेश मुंडे यांनी सांगितले की,चेंबूरच्या घाटले गाव परिसरात असलेले हे एकमजली सार्वजनिक शौचालय पालिकेने धोकादायक घोषित करून २०२२ मध्ये पाडले.त्यानंतर त्याच जागेवर नव्याने अत्याधुनिक असे शौचालय उभारण्याचा पालिकेचा मानस होता. त्यासाठी निधीची मंजुरी, आराखडा तयार करण्यात आला.परंतु त्याच परिसरात होणार्‍या एका एसआरए प्रकल्पाच्या विकासकाने त्यास आक्षेप घेऊन इथल्या रहिवाशांना तात्पुरते शौचालय बांधुन देण्याची जबाबदारी उचलली.त्यानुसार तात्पुरते पत्र्याचे शौचालय उभारले.परंतु काही महिन्यांतच त्याची दुरवस्था झाल्याने त्याची  दुरुस्ती करण्यास नकार दिला.पालिका आणि विकासक दोघेही एकमेकांवर ही जबाबदारी ढकलू लागल्याने रहिवाशांनी पालिकेवर मोर्चा काढला.या आंदोलनाच्या दणक्याने पालिकेने स्वतः तात्पुरते शौचालय उभारण्याचे लेखी आश्वासन  रहिवाशांना दिले.काही दिवसानंतर पालिकेने पुन्हा निधी मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू केले. परंतु पालिकेने हे सुरू असलेले काम काही दिवसांपासून अचानक बंद केले आहे.


याबाबत रहिवाशी कृती समितीने पालिकेकडे विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर दिले गेलेले नाही. त्यामुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत.या रहिवाशांनी पुन्हा एकदा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या आठ दिवसांत पालिकेने पुन्हा काम सुरू केले नाही तर  प्रसंगी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला जाईल,

असा इशाराही कृती समितीच्यावतीने देण्यात आला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या