मुंबई : (प्रतिनिधी) राज्य सरकारच्या इतर विभागाच्यां पुरस्कार्थींप्रमाणे राज्यातील गुणवंत कामगारांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात अशी आग्रही मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्यावतीने, महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचेकडे प्रत्यक्ष भेटून व अनेक निवेदनाद्वारे केली आहे तसेच त्या निवेदनांच्या सर्व प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, कामगार राज्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव (कामगार) यांचेकडे सादर केल्या असल्याचे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
राज्य शासनाच्या कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा, संघटना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी भरीव कामगिरी करणाऱ्या नोंदीत कामगारांना 'विश्वकर्मा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार' महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री , कामगार राज्यमंत्री.
केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार , संचालक मंडळ तसेच प्रशासकीय अधिकारी आदींच्या हस्ते पुरस्कार गौरवण्यात येते . हा भव्य-दिव्य शानदार सोहळा म्हणजे, संबंधित कामगारांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो.
राज्य सरकारच्या इतर विभागातर्फे आण्णाभाऊ साठे पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र /समाजभूषण पुरस्कार, महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार, संत रोहिदास पुरस्कार आदींना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवासात सवलत तसेच इतर अनेक सुविधा दिल्या जातात. मात्र, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पुरस्कार्थींना आजअखेर कोणत्याही स्वरूपाचा लाभ दिला जात नाही. ही खेदाची बाब आहे.
" विश्वकर्मा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार ," प्राप्त पुरस्कार्थींना हा लाभ मिळावा, यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे योजना स्वरुपात प्रस्ताव, मंडळाच्या कल्याण आयुक्तांच्या वतीने मा. प्रधान सचिव कामगार यांना सादर करण्यात आला होता. त्यांनी सदर प्रस्ताव मान्य करून, अंतिम मंजुरीसाठी सदरचा प्रस्ताव कामगार मंत्र्यांकडे पाठविला आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने हा "योजना स्वरूपात प्रस्ताव" असल्यामुळे, राज्य सरकारवर कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक बोजा पडत नाही. सर्व खर्च कामगार कल्याण मंडळ करणार आहे. या सातत्यपूर्वक पाठपुराव्यास अनुसरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लवकरच राज्यातील गुणवंत कामगारांना सदर लाभ मिळावा यासाठी, सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन फेब्रुवारी महिन्यात दिले आहे.
राज्यातील गुणवंत कामगारांच्या कांही प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये राज्य सरकारच्या इतर विभागांच्या पुरस्कार्थींप्रमाणे, गुणवंत कामगारांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करताना सवलत मिळावी. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या "संचालक" पदी, महाराष्ट्रातील एका गुणवंत कामगाराची नियुक्ती करावी. ज्या आस्थापनेतील कामगाराला गुणवंत कामगार पुरस्कार मिळतो, त्याला एक वेतनवाढ मिळणेसाठी, संबंधित आस्थापनेला म. का. क. मंडळाच्यावतीने आवाहन करावे. ज्या जिल्ह्यात कामगार भवन नाही, तेथे शासन निर्णयाप्रमाणे कामगार भवन होणेकामी कामगार विभागाने प्रयत्न करावेत. राज्यातील कामगारांना शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकाच्यावतीने वेतन खात्याशी संलग्न अपघाती विमा योजना लागू करावी. या व अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे.
महत्त्वाचे म्हणजे राज्यातील गुणवंत कामगारांना शासनाच्या इतर विभागाच्या पुरस्कार्थीप्रमाणे लाभ मिळावेत .याकरीता अनेक आमदार महोदय, मंत्री महोदय तसेच खासदार महोदय अशा ७० लोक प्रतिनिधींनी देखील राज्याच्या कामगार मंत्री महोदयांना शिफारसपत्रे पाठविली आहेत. त्याचबरोबर राज्यातील इतर विभागाच्या पुरस्कार्थीप्रमाणे गुणवंत कामगारांना देखील शासनाकडून सुविधा मिळाव्यात याकरीता, संपूर्ण महाराष्ट्रातील दैनिक वृत्तपत्रांमधून सातत्याने बातम्या प्रसिद्ध होत आहेत, तरी कामगार मंत्री महोदयांनी याबाबतीत सकारात्मकता दर्शवित राज्यातील गुणवंत कामगारांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून त्यांना न्याय द्यावा, असे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे सचिव अच्युतराव माने, उपाध्यक्ष केरबा डावरे, दत्तात्रय शिरोडकर, मुकुंद कोकणे, दिलीप साटम, संजय सासने, अनिता काळे, भगवान माने, शिवाजी चौगुले, रघुनाथ मुधाळे, महादेव चक्के, संभाजी थोरात, विजय आरेकर, सुभाष पाटील प्रविण भिके, संतराम जाधव, संजय गुरव बाळकृष्ण तावडे ,भरत सपकाळ, संजय तावडे, विद्याधर राणे अजय दळवी, विनोद विचारे, राजेंद्र कांबळे आस्था दळवी आदी. गुणवंत कामगार उपस्थित होते.
0 टिप्पण्या